डॉ. वैभवी वाळिम्बे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी कधी तरी झालेली एखादी वेदना किंवा त्रास याच्या आठवणीही अनेकदा त्रासदायी असतात. एवढा त्रास होतो की, त्यामुळे त्या हालचालींच्या संदर्भात एक भीती मनात घर करते. खाली दिलेले काही मुद्दे समजून घेतले तर कायनेसिओफोबिया म्हणजेच वेदनेची भीती नियंत्रणात तर ठेवता येईलच पण त्यावर मातही करता येईल. यापूर्वीच्या भागात आपण वेदनेच्या आठवणी त्रासदायी का असतात ते पाहिले. आता आपण उपायांबद्दल बोलणार आहोत.

१. मनमोकळा संवाद: पेशंटने डॉक्टरांना हे विचारायला हवं की, एखादी क्रिया मी किती दिवस, महिने, वर्षे बंद करणं अपेक्षित आहे; शिवाय ही क्रिया पूर्णतः बंद करण्याची गरज आहे की फ्रिक्वेन्सी, इन्टेन्सिटी, टाइम आणि टाइपमधे योग्य बदल केले तर ती करण्यासारखी आहे, पेशंट ने हे प्रश्न विचारले नाहीत तरीही या दोन गोष्टींची उत्तरं ओर्थोपेडीक डॉक्टर तसंच फिजिओथेरपिस्ट यांनी देणं अपेक्षित आहे, यामुळे पेशंटच्या मनातील हालचालीच्या भीतीला आळा बसेल.

२. भीती वाटणारी हालचाल छोट्या छोट्या भागांत करणं, याने पेशंटचा आत्मविश्वास तर वाढतोच शिवाय हालचाल पूर्णपणे बंद होत नाही.

३. मानवी शरीर हे वेगवेगळ्या हालचालींसाठी निसर्गाने निर्मिलेलं असल्याने त्या हालचाली केल्याने शरीराची हानी होणार नाही. हालचालींचा सुलभपणा हा आपल्या स्नायूंची शक्ती, त्यांचा लवचिकपणा, वेदना, हाडांची स्थिती, आपलं वजन, वय यांवर अवलंबून असतो, यापैकी वय आणि हाडांची स्थिती सोडता बाकी गोष्टी सुधारणायोग्य आहेत आणि त्यात सुधारणा केल्याने हालचाल अगदी सुलभ होऊ शकते. म्हणून हालचाली किंवा क्रिया ही समस्या नसून त्यासाठी लागणार्‍या शारीरिक बाबींची पूर्तता नसणं ही समस्या आहे.

हेही वाचा… Health Special: फॅट्स (स्निग्धांश आणि स्निग्धाम्ले)- शत्रू नव्हे मित्र?

४. मूवमेंट इज नॉट ऑल्वेज इक्वल टू पेन- प्रत्येक वेळी प्रत्येक हालचालीमुळे वेदना होईलच असं नाही. त्याहीपुढे जाऊन जरी एखादी हालचाल वेदनादायक वाटली तरीही ती डॉक्टरला न विचारता बंद करणं योग्य नाही, यामुळे समस्येवर उपाय निघणार नाहीच पण अवास्तव भीती मात्र वाढेल.

५. कुणाचं तरी ऐकून एखादी हालचाल पूर्ण बंद करण योग्य नाही तसंच कुणाचं तरी ऐकून एखादी हालचाल किंवा व्यायाम एकदम सुरू करणंदेखील योग्य नाही, कोणत्या हालचालींचे व्यायाम करायला हवेत आणि कोणते नाही याचा निर्णय हा व्यक्तिनुरूप असतो. म्हणजेच पेशंट स्पेसिफिक असतो जो ओर्थोपेडीक डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट घेऊ शकतात.

६. एखाद्या शस्त्रक्रियेनंतर काही विशिष्ट हालचाली करण्यासाठी बंधनं येऊ शकतात आणि ती आवश्यक असतात, पण त्यानंतर त्या हालचाली हळूहळू पूर्ववत कराव्या लागतात. हे व्यक्तिनुरूप वेगळं तर आहेच शिवाय झालेल्या शस्त्रक्रियेवरही अवलंबून असतं. खूप दिवसांनंतर सुरू केल्यामुळे या हालचाली साहजिकच वेदनादायी असतात पण त्या सुरू करणं आणि हळूहळू वाढवणं आवश्यक असतं यासाठी फिजिओथेरपिस्टची मदत घेणं आवश्यक ठरतं.

हेही वाचा… Health Special: वाताचा संचय उन्हाळ्यात व प्रकोप पावसाळ्यात का होतो?

७. रिसपेक्ट पेन: वेदनादायी हालचालींचे निरीक्षण करून ज्या पॉइंट ला वेदना सुरू होते त्याधीच ही हालचाल थांबवता येते, याला रिसपेक्ट पेन असं म्हणतात, यात पेशंटला पेन फ्री रेंज मधे व्यवस्थित हालचाल करता येते आणि पेन पॉइंट यायच्या आधीच तो थांबतो, यात पेशंटचा आत्मविश्वास टिकून राहतो आणि हालचाल पूर्णपणे बंद होत नाही.

८. शारीरिक हालचाल ही सरळ सरळ आपल्या ‘क्वालिटी ऑफ लाइफ’शी निगडीत आहे. सुलभ हालचाल ही आपली फक्त वैयक्तिकच नाही तर सामाजिक गरज देखील आहे व म्हणून त्याकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. योग्य हालचाल, योग्य प्रमाणात, योग्य वेळी केल्याने वेदना तर कमी होतेच त्याशिवाय व्यवस्थित भूक लागणं, अन्नाचं पचन होणं, हृदयाचं आणि फुप्फुसांचं आरोग्य नीट राहणं, मेंदू तरतरीत राहणं, मूड सुधारणं, शांत झोप लागणं असे अनेक फायदे होतात म्हणूनच म्हणतात ‘मोशन इज लोशन’!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How can you avoid the painful fear of movement that is even remembered hldc dvr
Show comments