Winter Less Workout : हिवाळ्यात अंथरुणातून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी व्यायामाकडे अनेकदा दुर्लक्ष होते; पण निरोगी जीवनशैली राखण्यासाठी व्यायामाचे महत्त्व समजून घेणे खूप आवश्यक आहे. पायी चालण्यापासून सुरुवात करणे फायद्याचे ठरू शकते. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आपल्याला आळस येतो; पण त्याचबरोबर घामसुद्धा कमी येतो. ज्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया मंदावते. ‘फित्र’चे सह-संस्थापक व संचालक बाळकृष्ण रेड्डी दब्बेडी सांगतात. त्यामुळे हिवाळ्यात फिटनेसवर कठीण परिश्रम घेणे महत्त्वाचे आहे.
मुख्य ट्रॅक-फील्ड प्रशिक्षक, मध्य रेल्वे आणि स्केचर्स गो रन क्लब, मुंबईचे मुख्य प्रशिक्षक मेल्विन क्रॅस्टो सांगतात, “काही अभ्यासानुसार दिवसाला ७,००० ते १०,००० पावले चालावे. कारण- त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच स्मृतिभ्रंश आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. क्रॅस्टो पुढे सांगतात, “दररोज १०,००० पावले चालण्याची क्रेझ फिटनेसप्रिय लोकांमध्ये दिसून येते; पण तुम्ही त्यापेक्षा कमी पावले चालूनसुद्धा आरोग्याचे फायदे मिळवू शकता.”
या व्यायामामध्ये ४५ मिनिटे वेगाने चालणे, व्यायाम करणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे किंवा नियमित योगा करणे यांसारख्या घरगुती वर्कआउटचा समावेश करू शकता. क्रॅस्टो सांगतात, “पुरेशी शारीरिक हालचाल फक्त हिवाळ्यात जाणवणाऱ्या शारीरिक आव्हानांचाच सामना करण्यास मदत करीत नाही, तर आतडेसुद्धा निरोगी ठेवण्यास मदत करते.”
बाळकृष्ण रेड्डी दब्बेडी यांनी सांगितलेले काही महत्त्वाचे वर्कआउट्स खालीलप्रमाणे :
वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग
हिवाळा असो वा कोणताही ऋतू व्यायाम करण्यापूर्वी वॉर्म-अप करणे महत्त्वाचे आहे; पण हिवाळ्यात वॉर्म-अप करण्याची आवश्यक जास्त भासते. थंड हवामानात व्यायाम केल्याने शरीर दुखणे, हाडांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. वॉर्म-अप केल्याने रक्तप्रवाह नियंत्रणात राहतो आणि स्नायूंचे तापमान वाढल्याने स्नायूदुखीचा कोणताही त्रास होत नाही. हिवाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही घरी काही वॉर्म-अपयुक्त व्यायाम करू शकता, ज्यामुळे तुम्हाला जास्त थंडी जाणवणार नाही.
घरात करता येईल असा व्यायाम
१० मिनिटे वॉर्म-अप केल्यानंतर ट्रेडमिलचा वापर करून, एक मिनीट वेगाने चाला. त्यानंतर शून्यावर सेटिंग करून एक मिनीट विश्रांती घ्या. त्यानंतर दोन मिनिटे वेगाने चाला आणि त्यानंतर दोन मिनिटे विश्रांती घ्या, असे पाच मिनिटांपर्यंत करा.
वेगाने चालणे
चालण्यामुळे तुमच्या सांध्यावर ताण कमी पडतो आणि तुमच्या शरीराच्या खालच्या अवयवांचे स्नायू काम करतात. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारते आणि हाडांचे आरोग्य निरोगी राहते.