कोविडची महासाथ ओसरली तशी मधुमेहींची त्सुनामी सुरू झाली आणि घराघरांत या गोड आजाराचीकटुता शिरली. दुसरीकडं साथीच्या आजारानं माघार खाल्ली तशी क्षयरोगानं (टीबी) पुन्हा आपली पाळंमुळं वेगानं पसरवायला सुरुवात केली. मधुमेहानं पोखरलेलं शरीर म्हणजे टीबीच्या जंतूसाठी आयतघर. त्यामुळं मधुमेहाकडं दुर्लक्ष केलेल्या अनेक जणांना आता टीबीनं घेरायला सुरुवात केलीयं. परंतुटी बीबाबत मुळातच असलेल्या सामाजिक अढीमुळं चाचणी न करण्याकडेच अधिक कल. परिणामी निदान उशीरा आणि उपचारही वेळेत नाहीत. त्यामुळं टीबीच्या जंतूला फोफावण्यास अधिकच वाव मिळालायं.मधुमेहाची कीड आता तरुणाईलाही लागलीयं. त्यामुळं टीबी आणि मधुमेह अशी दोन्हीची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये तरुणांचाही समावेश नोंद घेण्याइतपत दिसून येत आहे. परिणामी आता देशासमोर टीबी आणि मधुमेह असं दुहेरी आव्हान उभं ठाकलं आहे.

गोवंडीतील २९ वर्षाच्या सोनीचं वजन गेल्या काही दिवसांत अचानक कमी झालं. तापही अधूनमधून येत होता. खूप झोप यायची आणि सारखा थकवा. अनेक ठिकाणी औषधं केली काहीच फरक नाही. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यानं टीबीची चाचणी केली. टीबी असल्याचं निदान झालं. सोनी सांगते, “मला डॉक्टरांनी डायबिटीस आहे का विचारलं. तेव्हा मी लगेचच म्हटलं माझ्या आईकडे कोणाला नाही. नवऱ्याकडेही कोणाला नाही. मग मला कसा होणार डायबिटीस.” नियमानुसार टीबीच्या रुग्णांची मधुमेहाची चाचणी करणे आता बंधनकारक आहे. त्यानुसार सोनीची पण चाचणी केली आणि त्यात सोनीची साखर तीनशेच्यावर गेल्याचं समजलं. सोनीला तर हा धक्काच होता. मग हळूहळू सोनी आठवून सांगते, “मला गेल्या काही महिन्यांपासून सारखी तहान लागते आणि लघवीला पण सारखं होतयं पण मी लक्ष दिलं नाही. आता हा टीबी आणि डायबिटीस सोबतच झालायं.” सोनीला खरतंर मधुमेहाची लागण बऱ्याच आधीपासून झाली असण्याची शक्यता आहे. कारण तिला लक्षणं गेल्या अनेक महिन्यांपासून होती. परंतु तिनं दुर्लक्ष केल्यामुळं त्याचं निदान टीबीसोबत झालं असं म्हणणं योग्य ठरेल असं डॉक्टरांचं मत. सोनीसारख्या अनेक रुग्णांना आपल्याला मधुमेह असल्याचं माहीतच नसतं आणि मग टीबीच्या निदानासोबतच मधुमेह असल्याचं समजल्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. दोन्ही आजार एकदम कसे झाले हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत राहतो. एकीकडे मधुमेह असलेल्यांना टीबीचा धोका जास्त प्रमाणात आहे, तर दुसरीकडं टीबीची बाधा होत असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मधुमेही आहेत.

मधुमेह आणि टीबी

मधुमेह हा असंसर्गजन्य म्हणजे एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाला न होणारा आजार. तसा हा आजार गेल्या काही वर्षांमध्येच पाय रोवत आहे. टीबी हा याच्या एकदम उलट. हजारो वर्ष जुना संसर्गजन्य आजार. रुग्णाच्या थुंकीवाटे, खोकल्यावाटे याचे जंतू हवेत पसरतात आणि हे जंतू दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याला टीबीची बाधा होते. या दोन्ही आजारांची कुळ वेगवेगळी असली तरी एकमेकांशी मात्र घनिष्ठ संबंध आहे. मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात स्रवले जाते किंवा त्याचा योग्य वापर केला जात नाही. मधुमेहामुळं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळं शरीर कमकुवत झालेलं असतं. या स्थितीमध्ये हवेतील टीबीचे जंतू शरीराच्या संपर्कात आल्यास टीबी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं मग मधुमेहींना टीबीची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. मधुमेह नसलेल्यांच्या तुलनेत मधुमेहींना टीबीचा संसर्ग होण्याचा धोका दोन ते तीन पट जास्त असतो. केईम रुग्णालयाच्या फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अमिता आठवले सांगतात, मधुमेहाच्या रुग्णांना टीबीची बाधा होण्याचे प्रमाण सुमारे १३ ते ३० टक्के आहे. तर टीबीची बाधा झालेल्यांमध्ये मधुमेहींचे प्रमाणही साधारण इतकेच असते. मधुमेह आणि टीबी एकत्र कसे कार्य करतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. मधुमेह केवळ क्षयरोगाचा धोका वाढवत नाही, तर दोन्ही रोगांनी बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये टीबी बरा होण्यास मधुमेहामुळे अनेक अडथळे निर्माण होतात. तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये टीबीचे स्वरुपही काही अंशी वेगळे दिसून येते. त्यामुळे टीबीच्या रुग्णांमध्ये मधुमेहाचे निदान वेळेत करण्याच्या उद्देश्याने केंद्रीय आरोग्य विभागाने टीबीच्या रुग्णांच्या मधुमेहाची चाचणी करणे आता बंधनकारक केले आहे. याचे फायदे दिसून येत असून अनेक मधुमेही रुग्णांचे निदान वेळेत करण्यास मदत होत आहे.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे

मधुमेहामुळं टीबीचं निदान आव्हानात्मक

मधुमेहींना वजन कमी होणं, भूक न लागणं, ताप, खोकला ही लक्षणं दिसून आली तरी यासाठी रुग्ण बहुतांश वेळास्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतात. मधुमेहामध्येही वजन कमी होते. त्यामुळे या लक्षणाकडे अनेकदा मधुमेही दुर्लक्ष करतात. मधुमेहींमध्ये टीबीची लक्षणे, स्वरुप हे देखील अनेकदा बदलते. फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. विकास ओसवाल सांगतात, “टीबीच्या रुग्णांमध्ये बहुतांशपणे फुप्फुसाच्या वरच्या भागामध्ये जखम झालेली दिसून येते. परंतु मधुमेह आणि टीबी दोन्ही आजार असलेल्या रुग्णांमध्ये टीबीचे स्वरुपही बदलेले दिसते. या रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या खालच्या भागामध्ये जखम झालेली दिसते. या रुग्णांमध्ये बहुतांशवेळा टीबी हा न्युमोनियाप्रमाणे दिसून येतो. त्यामुळे अनेकदा स्थानिक डॉक्टर न्युमोनियाचे उपचार बराच काळ सुरू ठेवतात. त्यामुळे आजाराचे निदान आणि उपचारही चुकीच्या पद्धतीने केले जाते.” एका डॉक्टरांच्या उपचाराने आजार आटोक्यात येत नाही, मग दुसरा, तिसरा असे अनेक डॉक्टरांच्या चकरा रुग्ण मारत राहतात. लक्षणे अधिक तीव्र झाल्यावर रुग्ण मोठ्या रुग्णालयामध्ये दाखल होतो आणि मग टीबीचं निदान केलं जात. अशारितीनं मधुमेहींमध्ये बहुतांशवेळा टीबीचं निदान वेळेत केलं जात नाही. ग्रामीण भागामध्ये स्थानिक डॉक्टरांमध्ये जागृती फारशी नसल्यानं मधुमेहींमध्ये टीबीचं निदान उशीरा होत असल्याचं लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील फुप्फुसरोग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिजीत यादव यांनी नोंदविलं आहे. डॉ. यादव सांगतात, रुग्ण बराच काळ इतरत्र उपचार घेऊन अखेर वैतागून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. तेव्हा टीबीचं निदान केलं जातं. तोपर्यत मधुमेहानं त्याचं शरीर जर्जर झालेले असतं आणि टीबीही चांगलाच फोफावलेला असतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये टीबीचं निदान वेळेत न झाल्यानं याचे गंभीर परिणाम शरीरावर झालेले असतात. खूप धाप लागणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी गंभीर लक्षणेही रुग्णांमध्ये दिसून येतात. मधुमेहींमध्ये टीबीच निदान वेळेत न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे टीबीबाबतची सामाजिक अढी. मधुमेही हृदय तपासणीसह अनेक तपासण्या करून घेण्यास तयार असतात. परंतु टीबीची तपासणी करण्यास सांगितल्यावर आमच्या घरात कुणाला टीबी नाही. आम्हाला पण टीबी होणार नाही, या गैर समाजात तपासणी देखील करण्यास पुढे येत नाहीत. ही स्थिती केवळ ग्रामीण भागात आहे असे नाही. मुंबईसारख्या शहरांमध्ये जिथे टीबी मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे तिथे देखील हीच स्थिती असल्याचं टीबीच्या समुपदेशक प्रेरणा सणस सांगतात. त्या म्हणतात, “मुंबईचे बहुतांश टीबीचे दवाखाने हे रुग्णालयामध्ये आहेत. मधुमेहाच्या उपचार घेणाऱ्या, मधुमेह तीव्र प्रमाणात असलेल्या रुग्णांना डॉक्टर अनेकदा टीबीची तपासणी करून घेण्याचा सल्ला देतात. परंतु हे रुग्ण आम्हाला टीबी होऊच शकत नाही, असे सांगून तडक निघून जातात.” एकीकडे मधुमेहींमध्ये टीबीचं निदान तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहेच पण दुसरीकडे याबाबत असलेल्या अपुरी माहिती आणि जागरुकतेचा अभाव यामुळं देखील निदान होण्यात अडथळे येत असल्याचं प्रामुख्यानं दिसून येत आहे. ज्याप्रमाणं टीबीच्या रुग्णांना मधुमेहाची चाचणी करुन घेण बंधनकारक आहे. त्याचप्रमाण तीव्र लक्षणे असलेल्या मधुमेहींमध्ये टीबीची चाचणी बंधनकारक करणं गरजेचं आहे, असे डॉ. ओसवाल यांनी व्यक्त केलं आहे.

मधुमेहामुळं टीबीच्या उपचारातही अडचणी

मधुमेह शरीरातील कोणताही आजार बरा करण्याच्या स्थितीला अटकाव आणतो. याचा परिणाम टीबीवरही होतो. ज्याप्रमाणं शरीराला झालेली जखम मधुमेहामुळं बरी होण्यास बराच कालावधी लागतो. त्याचं प्रमाण टीबीही नियंत्रणात येण्यास मधुमेह हा बाधा ठरत असतो. रक्तातील साखरेची पातळी उच्च राहिल्यास टीबीमुळं झालेल्या फुप्फुसावरील जखम भरण्यासही बराच काळ लागतो. मधुमेह अनियंत्रित राहिल्यास टीबीच्या औषधांचा परिणाम शरीरावर फारसा होत नाही. त्यामुळं टीबी बरा होण्याचा कालावधीही वाढतो. डॉ. ओसवाल सागंतात, “मधुमेह नियंत्रणात आल्यानंतर मग टीबीच्या औषधांचा परिणाम दिसायला लागतो. यासाठी आधी मधुमेह नियंत्रणात ठेवणं गरजेच असतं.” मधुमेहामुळे टीबीच्या उपचारांवर गंभीर परिणाम होत असल्यान यामुळं होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून टीबीची पुनर्लागण होणे, उपचारांना यश न येणे याचे ही प्रमाण नोंद घेण्याइतपत वाढत आहे. एकूणच टीबीमुक्त होण्यासाठी मधुमेह नियंत्रणाशिवाय पर्याय नाही.

आकडेवारी काय सांगते?

जागतिक आरोग्य संघटनेन भारत २०२५ पर्यत मधुमेहाची राजधानी बनेल असं जाहीर केलयं.केंद्रीय आरोग्य विभागाच्या क्षयरोग अहवालानुसार, २०२२ मध्ये नव्याने निदान झालेल्या ९१ टक्के टीबी रुग्णांची मधुमेहाची तपासणी केली गेली आणि यामध्ये सुमारे आठ टक्के रुग्णांना मधुमेह असल्याचं आढळलयं. मात्र यातील ६३ टक्के रुग्णांनीच मधुमेहाचे उपचार सुरू केल्याचे अहवालात नमूद केले आहे. महाराष्ट्रात नव्याने आढळलेल्या टीबी रुग्णांपैकी सुमारे ९६ टक्के रुग्णांची मधुमेहाची तपासणी केली यामध्ये सुमारे ६ टक्के रुग्णांना मधुमेह असल्याचे आढळले आहे. परंतु यातील ६५ टक्के रुग्णांनी मधुमेहाचे उपचार सुरू केले आहेत. म्हणजे देशभरात सुमारे ३७ टक्के तर महाराष्ट्रात सुमारे ३५ टक्के टीबी रुग्णांना मधुमेह असूनही त्यांनी मधुमेहाचे उपचार सुरुच केलेले नाहीत.

Statistics of patients with TB and diabetes
टीबी आणि मधुमेह असलेल्या रुग्णांची आकडेवारी

मधुमेह नियंत्रणात ठेवणं आव्हानात्मक

मधुमेह नियंत्रणात आणण्यायासाठी दिवसातून तीन वेळा तपासण्या, इन्सुलिन आणि आहारात आवश्यक बदल करणे गरजेचे असतं. हे बदल करणं रुग्णासाठी बऱ्याचदा आव्हानात्मक असतं. ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालयात मधुमेहाचे उपचार मोफत असले तरी अनेकदा औषधे उपलब्ध नसतात. टीबीच्या बहुतांश रुग्णांमध्ये इन्सुलिन सुरू केले जाते. इन्सुलिन सरकारी दवाखान्यात उपलब्ध असतेच असे नाही. औषधं, इन्सुलिन विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसल्यानंही मग रुग्ण मधुमेहाचे उपचार बंद करतात. मधुमेहाच्या काही चाचण्या सरकारी रुग्णालयात उपलब्ध असल्या तरी एचबीए१सी या सारख्या चाचण्या होतातच असे नाही. या चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये करणही परवडणारं नसतं. खेड्यामध्ये इन्सुलिन कसं घ्यायचं, ते साठवण्याची फ्रिजची सुविधा अशा अनेक अडचणी असल्यानं मग अनेकदा रुग्ण मधुमेहाचे उपचार अर्धवट सोडून देतात. टीबीवरही याचा परिणाम व्हायला लागतो आणि टीबीचा जंतू अधिकच आक्रमक व्हायला लागतात. मधुमेह नियंत्रणासाठी केवळ औषध घेऊन उपयोग नसतो. आहारावरही नियंत्रण येणं आवश्यक असतं. आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणं, प्रोटीनचे प्रमाण वाढविणं गरजेचं असते. परंतु रोजंदारी काम करणाऱ्या किंवा कंत्राटी पद्धतीने नोकरी करणाऱ्या सर्वच रुग्णांना आहाराच्या पद्धती अवलंबणं परवडणारं नसतं. काही रुग्ण वडापाव, समोसापाव असं खाऊनही वेळ काढतात यांना आहारावर नियंत्रण ठेवा कसं सांगायचं हा ही एक प्रश्न असतो. त्यामुळं एकीकडे मधुमेह आणि दुसरीकडे टीबी असा दोन्हीशी लढणं यांच्यासाठी अधिकच आव्हानात्मक असल्याच डॉ. ओसवाल सांगतात. दुसरी बाजू म्हणजे टीबीच्या रुग्णांना मधुमेह नियंत्रणाचा सल्ला डॉक्टरांनी दिला असला तरी रुग्ण त्याकडं बहुतांशवेळा दुर्लक्ष करतात. लातूरचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रवीण नागुरे सांगतात की, बहुतांश रुग्णाची मानसिकता अशी असते की थोडं बरं वाटलं की औषधे बंद करणं, डॉक्टरांचा सल्ला न घेणं. यामुळं मग नियंत्रणात आलेली साखर पुन्हा अनियंत्रित व्हायला लागते. आणि परिणामी टीबीची औषधंही निकामी ठरायला लागतात.

टीबी आणि मधुमेह असल्यास वेळेवर मधुमेहाची तपासणी करून त्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं असतं. त्यानुसार टीबीच्या औषधेही काम करत आहे का याची वारंवार पाहणी करणं आवश्यक आहे. लातूरचे डॉ. यादव सांगतात, “रुग्णांना औषधांसाठी जिल्ह्याच्या रुग्णालयात यावं लागते. दर महिन्याला या फेऱ्या घालणं परवडणारं नसतं. त्यामुळे मग रुग्ण महिनोमहिने तेच उपचार घेत राहतात. त्यामुळे मधुमेहही नियंत्रणात राहत नाही आणि पर्यायाने टीबीदेखील आटोक्यात लवकर येत नाही.”

औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचा वाढता धोका

मधुमेह आणि टीबीची औषधं यामुळे दिवसभरातील गोळ्यांची संख्या वाढते. एवढ्या गोळ्या खाण्यासाठी रुग्ण कंटाळून जातात आणि उपचार मध्येच सोडून देतात. तर काही रुग्ण सुरुवातील काही काळ औषधे घेतात. परंतु थोडं बर वाटायला लागलं की दोन्हीची औषधे सोडून देतात. अर्धवट उपचार सोडल्यानं मग टीबी आणखीनच आक्रमक होतो आणि या रुग्णांना एमडीआर, एक्सडीआर अशा औषधांना दाद न देणाऱ्या टीबीची बाधा होते. मधुमेहाचे उपचार योग्यरितीने न घेतल्यामुळं औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचा धोका वाढत आहे. तसेच हे रुग्ण एमडीआर, एक्सडीआर या टीबींचा प्रसार करण्यासही कारणीभूत ठरत आहेत.

टीबीचा इतिहास असलेल्यांनाही धोका

टीबी पूर्ण बरा झाला तरी या रुग्णांमध्ये जंतू हे सुप्त अवस्थेत कुठे ना कुठे तरी राहिलेले असतात. रोगप्रतिकारक शक्ती सक्षम असेपर्यत हे कार्यरत होत नाहीत. परंतु जेव्हा शरीराला मधुमेहाची बाधा होते, तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमजोर व्हायला सुरुवात होते. याचाच फायदा घेत हे सुप्त अवस्थेतील टीबीचे जंतू शरीरावर ताबा घ्यायला लागतात आणि टीबी पुन्हा सक्रिय होतो. मधुमेह झाल्यानं टीबीची पुन्हा सक्रिय झाल्याचं अनेक रुग्णांमध्ये आढळत असल्याचं डॉ. ओसवाल यांनी नोंदविले आहे. त्यामुळं आधी टीबी झालेल्या रुग्णांनी मधुमेह झाल्यानंतर विशेष काळजी घेऊन मधुमेह नियंत्रणात ठेवणं जास्त गरजेचं आहे. कारण या रुग्णांमध्ये टीबी सक्रिय होण्याचा होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो. सोनीला आधी गाठीचा (लिम्फनोड) टीबी होता. मधुमेह झाल्यानंतर तिला पुन्हा टीबीची लागण झाली आहे. ही लागण तिच्या आधीच्या टीबीमुळं नाही तर तर तिची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यानं आजूबाजूच्या वातावरणातील टीबीच्या जंतूशी संपर्क आल्यानं झाली आहे. याला रिइनफेक्शन म्हणजे पुनर्लागण होणं असं म्हणतात.

५८ वर्षीय राकेश यांना मुधमेह असल्यांच निदान २०१२ साली झालं. तेव्हाच त्यांच्या रक्तातील मधुमेहानं ५०० मिलीग्रॅम/डेसीलीटर (mg/dl) ची पातळी गाठलेली होती. खरतंर इतक्या उच्च पातळीचा मधुमेह झाल्यानंतर वारंवार तपासण्या आणि औषधं घेऊन साखर नियंत्रणात ठेवणं गरजेचं होतं. परंतु निदान झाल्यानंतर आणलेल्या गोळ्यांची पाकिट पुढची तीन वर्ष राकेश नित्यनेमानं खात राहिले. त्यांनी कधी मधुमेहाची तपासणी केली नाही की कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. कोणताचा त्रास होत नाही, म्हणजे साखर नियंत्रणात असल्याचा त्यांचा गैरसमज. परंतु याचा मोठा फटका त्यांना तीन वर्षांनी बसला. मधुमेह नियंत्रणात न राहिल्यानं मूत्रपिंडावर परिणाम झाला आणि दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली. शेवटी मधुमेह नियंत्रणासाठी इन्सुलिन सुरू करावी लागली. मधुमेहाने खंगलेल्या त्यांच्या शरीराला आता टीबीनं घेरलंय. सुरुवातीला टीबीची औषध घेतली. परंतु मधुमेह नियंत्रणात नसला की टीबीच्या जंतूचं चांगलच फोफावतं. त्यांच्या शरीरातील टीबीच्या जंतूनं अक्राळविक्राळ रुप धारण केलयं. कोणत्यांही औषधांना दाद ने देणाऱ्या मल्टीड्रग रेझिस्टंट (एमडीआर) टीबीनं त्यांना ग्रासलयं. बेडाक्युलीन हे नवे औषध त्यांना सुरू केलयं. परंतु जोपर्यत साखर नियंत्रणात राहत नाही तोपर्यत टीबी आटोक्यात येणार नाही. त्यातच त्यांना आठवड्याला तीनवेळा डायलिसिस करावं लागतं. मधुमेहाने पोखरलेल्या शरीराला आता मूत्रपिंड, टीबी या अनेक आजारांनी घेरल्यानं वैतागून गेलेल्या राकेश यांची स्थिती पाहवत नाही. “मी दिवसाला २५ ते ३० गोळ्या खातो आणि तीन वेळा इन्सुलिनची इंजेक्शन टोचून घेतो. पाय तर काम करतच नाहीत. हातही आता फारसे चालत नाहीत. त्यामुळं मी आता घरात जवळपास निकामी झालोय. माझा आजाराचा महिन्याचा खर्च जवळपास ४० हजारापर्यत जातो. फ्रीज, टीव्ही दुरुस्त करणारा मी. एवढा पैसा आणणार कुठून. शेवटी आता बायकोला या वयात नोकरी करण्याची वेळ आलीयं.” राकेश जेव्हा हे सांगतात तेव्हा मधुमेह आणि टीबी केवळ माणसाचं शरीरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच जीवन कसं उध्वस्त करतात याची प्रचीती येते.

२०२५ पर्यत भारत ही मधुमेहाची राजधानी होणार असं जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. या वाढत्या मधुमेहामुळं आता टीबीच्या प्रसारालाही बळ मिळत आहे. सरकारने मधुमेहाची तपासणी मोफत उपलबध केली असली तरी मधुमेहाच्या उपचारांकडे अजूनही फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच निदान होऊनही सुमारे ३५ ते ३७ टक्के टीबी-मधुमेहाच्या रुग्णांना मधुमेहाचे उपचारच सुरू झालेले नाहीत. मधुमेहाशी टीबीच्या राक्षसाने एकदा का हातमिळवणी केली तर या दोन्ही राक्षसांना पराभूत करण अधिकच अवघड होईल.


शैलजा तिवले

shailajatiwale@gmail.com