डिजिटल जगावरचं अवलंबत्व हे बऱ्याचदा प्रत्यक्ष जगातल्या अपेक्षाभंगातून आलेलं असू शकतं. मुलांच्या बाबत समवयीन मुलांनी सामावून घेणं, आपण ट्रेंडी आहोत हे सिद्ध करणं ही कारणं असतातच पण त्याचबरोबर प्रत्यक्ष जगात काहीतरी खटकत असतं जे दुरुस्त करण्याची सोय त्यांच्याकडे नसते. अशावेळी येणारा ताण हाताळण्यासाठीही मुलं ऑनलाईन जगावर अवलंबून राहायला सुरुवात करतात. आईबाबांची भांडणं, शाळा कॉलेजमधलं बुलिंग, भविष्याचा ताण, आजूबाजूच्या वातावरणाचा ताण असे अनेक मुद्दे असतात ज्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही रस्ता मुलांकडे नसतो. त्या अर्थाने मुलं पालकांवर आणि कुटुंब व्यवस्थेवर पूर्णपणे अवलंबून असतात आणि दरवेळी पालक आणि कुटुंब व्यवस्था त्यांच्या स्वास्थ्यासाठी काम करत असतेच असं नाही.
अशावेळी प्रत्यक्ष जगातला ताण, प्रश्न, समस्या विसरण्यासाठी मुलं ऑनलाईन जगात वावरायला, रमायला सुरुवात करतात. ते जग त्यांना अधिक चांगलं वाटायला लागतं. पॉर्न आणि गेमिंगच्या बाबतीतही कमी अधिक प्रमाणात हेच घडतं. स्वतःच्या देहाविषयी, लैंगिक अवयवांविषयी या वयात अनेक प्रश्न असतात, संकोच असतो. अशावेळी ऑनलाईन जगात जे दिसतंय त्यानं सुखावल्याचा आभास होतो. आपण तसे होऊ शकत नाही तर निदान बघून समाधान मिळवूया ही भावना तीव्र असते. पॉर्न बघणाऱ्या बहुतेकांमध्ये ही भावना तीव्र असू शकते. त्यातून पॉर्न बघण्याचं प्रमाण वाढतं, ‘टॉलरन्स’ वाढतो.
अशावेळी पालक/शिक्षकांनी काय केलं पाहिजे?
१) पॉर्न बघण्याचं आणि गेमिंग करण्याचं प्रमाण जास्त आहे असं लक्षात आलं तर त्याचं मूळ प्रत्यक्ष जगातल्या प्रश्नात आहे का हे शोधलं पाहिजे. घरात, शाळेत, कॉलेजमध्ये काहीतरी चुकीचं घडतंय का, असं काहीतरी जे त्या मुलाला आवडत नाहीये, पटत नाहीये पण त्यातून स्वतःची सुटकाही करुन घेता येत नाहीये. हा शोध अतिशय गरजेचा आहे. अनेकदा मुलं नैराश्यात असतात. मुलांचं नैराश्य पालक/शिक्षकांना चटकन लक्षात येत नाही किंवा अनेकदा मुलांमध्ये नैराश्य असू शकतं हा विचारच पालक/शिक्षकांना पटत नाही आणि दुर्लक्ष होतं. तसं होऊ देऊ नका. आरडाओरडा करण्याआधी मूल असं का वागतेय याचा शोध आवश्यक आहे.
२) मुलांचा सोशल मीडिया वापर तपासा. अनेकदा सोशल मीडिया शरीर प्रतिमेचे प्रश्न तयार करतं. इन्स्टा आणि इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर बॉडी शेमिंग चालतं. त्यातून स्वतःविषयी प्रश्न, शंका उपस्थित राहू शकतात. त्याचबरोबर स्वतःच्या लैंगिकतेला धरुन, देहाच्या आकाराला धरुन प्रश्न निर्माण होऊ शकतात ज्यांची उत्तरं शोधायला मुलं पॉर्न साइट्सकडे वाळलेली असू शकतात. त्यामुळे मुलांशी सोशल मीडियाबद्दल बोललं गेलं पाहिजे. तिथे काही गडबड नाहीये ना हे तपासून बघितलं पाहिजे.
हेही वाचा >>>जेवताना टीव्ही पाहता का? लगेच थांबवा; तज्ज्ञांनी सांगितलेले दुष्परिणाम जाणून घ्या
३) काही मुलामुलांच्या लैंगिक जाणिवा खूप लवकर जाग्या होतात. पण जाग्या झालेल्या या जाणिवांचं करायचं काय हे त्यांना लक्षात येत नाही. लैंगिकतेबद्दलचा संवाद नसल्याने आपल्याला जे काही वाटतंय ते काय आहे हे शोधायला मुलं ऑनलाईन जगात आणि पॉर्नवर जातात आणि रमायला लागतात. त्यामुळे मुलांशी लैंगिकतेबद्दल बोलणं, हस्तमैथुनाबद्दल बोलणं आवश्यक आहे. पॉर्न बघून तिथले प्रकार प्रत्यक्ष मुलांनी करून बघू नयेत, स्वतःला आणि इतर मुलांना धोक्यात आणू नये असं वाटत असेल तर सेक्सबद्दल बोलायला आजच्या काळात तरी पर्याय नाही.
४) पॉर्न बघितलं म्हणून मुलांना मारझोड करु नका. रागावू नका. टाकून बोलू नका. ते अपराधी आहेत, गुन्हेगार आहेत अशी वागणूक देऊ नका. त्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करुन त्यांची उलट तपासणी घेऊ नका. मुलांनाही आत्मसन्मान असतो. या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या मुलांचे वर्तन सुधारेल अशी ज्यांना खात्री असते ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने मुलांच्या प्रश्नांकडे बघत असतात. मोठ्या अधिकारपदावर असतात म्हणून मुलं काहीही करु शकत नाहीत, बोलू शकत नाहीत हे पालक आणि शिक्षकांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मुलांच्या मनात भावनांचा उद्रेक होण्यापेक्षा त्यांच्या मनातल्या भावनांना वाट करुन देण्याची अधिक गरज असते.
हेही वाचा >>>तीन महिने ‘सोडा’ टाळल्याने शरीरात कोणते फरक दिसतील? प्रसिद्ध रॅपरचा २५ किलो वजन कमी करताना फक्त..
५) पॉर्न बघणाऱ्या मुलांशी बोलताना अवघडलेपण नको. मुलं आधीच अवघडलेली असतात. त्यांना हा संवाद नको असतो. त्यात मोठेही अवघडलेले असतील तर संवादाच्या शक्यता कमी होतात. जे काही बोलायचं आहे ते उपदेश ना करता संवाद साधण्याच्या भूमिकेतून असेल तर मुलांपर्यंत ते पोहोचतं. अन्यथा सगळे शब्द नुसते हवेत विरुन जातात हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.