तेलंगणा कमिशनर ऑफ फूड सेफ्टी टास्क फोर्सने नुकत्याच केलेल्या तपासणीत हैदराबादच्या रेस्टॉरंट्समध्ये अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे उल्लंघन उघडकीस आले. टास्क फोर्सने हैदराबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांतील ८३ रेस्टॉरंट्स आणि भोजनालयांवर तपासणी केली. धक्कादायक म्हणजे, यापैकी तब्बल ६८ आस्थापना सुरक्षा मानकांमध्ये कमी असल्याचे आढळून आले.

शिळे घटक, अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे कालबाह्य घटक आणि अस्वच्छ स्वयंपाकघर यांचा समावेश असलेल्या उल्लंघनांचे त्रासदायक मिश्रण निरीक्षकांना आढळले. या चिंताजनक निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांकडून १ जूनपासून कठोर उपायांची अंमलबजावणी सुरू होत आहे. रेस्टॉरंट्स स्वच्छता आणि अन्न सुरक्षेला प्राधान्य देऊन याची खात्री करणे हा या क्रॅकडाऊनचा उद्देश आहे. माणूस ज्या प्रकारचा आहार घेतो, त्याच प्रकारचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. अस्वच्छ आणि शिळे अन्न खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो, याच विषयावर नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन आणि मधुमेहतज्ज्ञ डॉ. निशांत सिंह यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ…

डॉ. सिंह म्हणतात, शिळे अन्न खाऊ नये, असं आपण नेहमी ऐकतो. शिळे अन्न अनेकदा हवा आणि आर्द्रतेच्या संपर्कात येते. त्यामुळे जीवाणू, मोल्ड्स आणि इतर सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. हे सूक्ष्म जीव वेगाने मल्टीप्लाय होऊन वाढ करू शकतात आणि मानवी आरोग्यासाठी हानिकारक विषारी पदार्थ तयार करू शकतात. शिळे व पौष्टिक नसलेले अन्न खाल्ल्याने आरोग्यावर सौम्य ते गंभीर परिणाम होतो. जळजळ होण्यापासून तर वात-पित्ताचे विकार, पोटाचे आजार यांसह विषबाधा होण्याची भीती असते.  शरीराला हवे असलेले पोषक तत्त्व नष्ट झालेले असल्याने, असे अन्न आरोग्यास अपायकारक ठरू शकते.

(हे ही वाचा : तासाभराच्या अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम? बरे होण्यासाठी किती कालावधी? जाणून घ्या…)

सध्याच्या तप्त उन्हात खाद्यपदार्थ खराब होण्याची प्रक्रिया जलद गतीने होत असल्याने अशा पदार्थांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे विषबाधा होण्यापासून अन्य दुर्धर आजार होण्याचा धोका बळावतो. अशा स्वरूपाच्या आरोग्‍याच्‍या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. उन्हाळ्यात तापमान अधिक असल्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये बॅ‍क्टेरिया लवकर पसरू लागतात. एक ते दोन तासांतच किटाणूंची संख्या तिप्पट वाढते, ज्यामुळे फूड पॉयझनिंग आणि लूज मोशनसारख्या समस्या होतात. 

शिळ्या पदार्थांच्या सेवनामुळे काय होते?

शिळे जेवल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे अपचन होऊ शकते. पोटाला सूज येणे, पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होणे अशा गोष्टी घडू शकतात. काही वेळेस यामुळे जुलाब, विषबाधा अशा समस्या उद्भवू शकतात. अन्नपदार्थ जर खूप दिवसांपूर्वी तयार केले असतील, तर त्याने स्वास्थ बिघडू शकते. जेवण ताजे, गरम-गरम असताना खाल्ल्याने शरीराला जास्त पोषण मिळते. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होत असल्याने केवळ ताजे आणि पौष्टिक अन्न खावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.