Onion In Summer : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात अनेकांना वाढत्या उष्णतेमुळे शारीरिक थकवा आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवत आहे. यामुळे उष्माघातच नव्हे तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोकासुद्धा वाढू शकतो. त्यामुळे आधीच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार असलेल्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अति उष्णतेमुळे थकवा,चिडचिड आणि मानसिक आरोग्यावरही याचा दुष्परिणाम दिसून येतो. ही उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात सॅलेड आणि जेवणामध्ये तुम्ही कांद्याचा समावेश करू शकता. द इंडियन एक्स्प्रेसनी नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ कनिका नारंग यांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदे कशी मदत करतात?
कांदा हा नैसर्गिकरित्या थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात आहारामध्ये याचा समावेश महत्त्वाचा मानला जातो. कांद्यामध्ये असलेले पाणी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतात. याशिवाय यात सोडियम आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतात. यामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे विशेषत: व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. या घटकांमुळे शरीराला पोषक घटक मिळतात आणि आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते.
कांद्यामध्ये क्वेर्सेटिन (querceti) आणि सल्फर (Sulphur) सारखे पदार्थ असतात, जे शरीरातील घाम शोषून घेऊन शरीराला थंड करतात आणि उष्णता कमी करतात. क्वेर्सेटिन हिस्टामाइन्सला दूर पळवते. हिस्टामाइन्स या रसायनामुळे उष्णतेपासून आपल्याला ॲलर्जी होऊ शकते.
कांदा पचनक्रियेशी संबंधित एन्झाइम्स सक्रिय करतात आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते. कांदा हा फायबर आणि प्रीबायोटिक्सचा चांगला स्त्रोत आहे, जे आतड्यांमधील बॅक्टेरियाला पोषक तत्वे पुरवतात. या बॅक्टेरियांमुळे फॅटी ॲसिड तयार होते, जे पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे.
कांद्यामधील क्रोमियम रक्तातील साखरेला नियंत्रित ठेवते. कांद्यामुळे वारंवार
वॉशरूम लागते, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. एका अभ्यासात सांगितल्याप्रमाणे कांद्याच्या अर्काच्या सिस्टीन सल्फोक्सिड (cysteine sulfoxides) या गोळ्या घेतल्यामुळे झोप सुधारते.
नियमित आहारात कांद्याचा समावेश कसा करावा?
- उन्हाळ्यात कांद्याचा समावेश सॅलेड आणि कोल्ड सूपमध्ये करू शकता. चांगल्या चवीसह तुम्ही पौष्टिक आहार घेऊ शकता.
- दररोज जेवणात कांद्याचा समावेश करा. सॅलेड्स, सँडविच आणि इतर पदार्थांमध्ये कांद्याचा समावेश करा.
- शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी काकडी आणि टरबूज यांसारख्या पाणीयुक्त पदार्थांसह कांद्याचे सेवन करा.
- जेवण करताना तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये कांद्याचे काप घ्या.