संपूर्ण वर्षाच्या ऋतूचक्राचा विचार करता शरद हा असा ऋतू आहे, जेव्हा अग्नी मंदावलेला असतो, जेवणही व्यवस्थित जात नाही,आजारही वाढलेले असतात. शरीरबल  खालावलेले असते, पावसाळ्याच्या तुलनेमध्ये बरे असते, एवढेच म्हणता येईल. त्यात पावसाळ्यामध्ये (वर्षा ऋतूमध्ये) ज्या वात दोषाचा प्रकोप झालेला होता व त्याच्या परिणामी वातविकार त्रस्त करत होते, त्या वात दोषाचे शरद ऋतूमध्ये निसर्गतः शमन झालेले दिसते. त्यामुळे वातविकारांचा जोर या ऑक्टोबर हिटच्या दिवसांमध्ये कमी झालेला दिसतो. वात दोष शमन (कमी होण्याच्या) अवस्थेमध्ये, तर कफदोष सम अवस्थेमध्ये अशी एकंदरच स्थिती असल्याने शरद ऋतू स्वास्थ्यप्रदान करणारा असा ऋतू होतो का? तर नाही, कारण  जी महत्त्वाची शरीरविकृती शरद ऋतुमध्ये  तयार होते ती म्हणजे पित्तप्रकोप. शरीरामधील पित्त या शरीरसंचालक उष्ण तत्त्वाचा या शरद ऋतुमध्ये प्रकोप होतो. साध्या भाषेमध्ये या ऑक्टोबरच्या उन्हाळ्यामध्ये पित्त स्वभावतः उसळते व विविध प्रकारच्या पित्तविकारांनी समाज त्रस्त होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वातशमन
शरीरामधील वात या तत्वाचा ज्या ग्रीष्म ऋतू (उन्हाळ्या) मध्ये संचय झाला होता, वर्षा ऋतू (पावसाळ्या)मध्ये प्रकोप झाला होता, त्या वाताचा या शरद ऋतूमध्ये स्वाभाविकरित्या शम होतो (म्हणजे वाताचा जोर् कमी होतो), ज्याचे महत्त्वाचे कारण असते शीत गुणांच्या वाताला नियंत्रणात आणणारे शरदातले उष्ण वातावरण आणि वातविरोधी खारट रस. अष्टांगसंग्रहानुसार खारट रस हा आद्य वातनाशक रस आहे. प्रकुपित वाताचे नैसर्गिक शमन झाल्याने ज्या वातविकारांनी पावसाळ्यात त्रस्त केले होते, ते रोग आपसूकच या शरद ऋतुच्या दिवसांमध्ये कमी होताना दिसतात. सुजणारे स्नायू,आखडणाऱ्या नसा, दुखणारे सांधे बरे होतात, वाहणारी सर्दी कमी होते, कोरडा खोकला व दमा कमी होतो वगैरे. अर्थात शरद ऋतूचा प्रभाव सुरू असल्याने या ऋतूसंबंधित विकृती मात्र नव्याने सुरु होतात.त्यातलीच सर्वात महत्त्वाची विकृती म्हणजे पित्तप्रकोप.

शरदातल्या उन्हाळ्यात – अग्नी स्थिती
“शरद ऋतूमध्ये अग्नीची स्थिती कशी असते?” या प्रश्नाचे उत्तर “पावसाळ्यापेक्षा बरी पण हिवाळ्यापेक्षा वाईट”, असे द्यावे लागेल. पावसाळ्याच्या अंतिम दिवसांमध्ये साधारण श्रावण महिन्यात पाऊस कमी होऊन ऊन पडू लागले की भूक हळुहळू सुधारु लागते, ती शरदामध्ये ऊन पडू लागले की वाढते. मात्र जसा हेमंत किंवा शिशिर ऋतूमध्ये अग्नी प्रखर असतो तसा तो शरदात होत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात शरीरामध्ये वाढलेली आर्द्रता (ओलावा) हा ओलावा (जलांश) शरद ऋतूमध्ये सुद्धा काही प्रमाणात शरीरामध्ये राहतो, जो अग्नीला मंद करतो. या दिवसांमध्ये हिवाळ्यासारखी भूक लागत नाही , अन्नाचे नीट पचन होत नाही त्याचे कारण म्हणजे अग्नी हिवाळ्यासारखा सक्षम नसतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How human body functions in winter season hldc psp
Show comments