झोप (Sleep) आणि मानवी आरोग्याचा जवळचा संबंध आहे. दिवसभर आलेला थकवा, कंटाळा झोपल्यानंतर नाहीसा होतो. पूर्ण झोप ही कधीही आरोग्यासाठी लाभदायकच असते. माणसाने दिवसातून कमीत कमी आठ तास झोपायला हवे, असे सांगितले जाते. झोप ही माणसासहित सर्व सजीवांना निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. जर आपण पुरेशी झोप घेतली, तर अनेक आजारांपासून आपली सहज सुटका होते. म्हणूनच निरोगी शरीर आणि मनासाठी चांगली झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, नैराश्य इत्यादी अनेक आजारांचा धोका वाढतो.
रात्री झोप न लागणे, दिवसा झोप न लागणे, थकवा येणे, मूड खराब होणे यांमुळे अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. झोपेबाबतदेखील अनेक समज-गैरसमज पसरलेले आहेत. एखाद्या व्यक्तीने रात्री किती तास झोपावे, हा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. काही तज्ज्ञ म्हणतात की, व्यक्तीने दररोज आठ तास झोप घ्यावी, तर काहींच्या मते- नऊ तास झोपलं पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने तुमचे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, कॉग्निटिव्ह फंक्शन आणि एकूण दैनंदिन कार्यक्षमतेवर विविध नकारात्मक परिणाम होऊ शकतात. दरम्यान, जर तुमची फक्त एक तासाची झोप कमी झाली, तर ती बरी होण्यासाठी किती दिवस लागू शकतात? या विषयावर मणिपाल येथील हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजी विभागप्रमुख वरिष्ठ सल्लागार डॉ. शिवा कुमार यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ…
डाॅक्टर म्हणतात, “चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार, व्यायाम आदी गोष्टी जशा आवश्यक असतात, तशीच पुरेशा प्रमाणात झोपदेखील. दररोज पुरेशी झोप घेणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं असतं. परंतु, सध्याच्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे दैनंदिन झोपेचा कालावधी काहीसा विस्कळित झाल्याचं पाहायला मिळतं. शांत झोप येत नाही, झोपेत मधेच जाग येते, लवकर झोप लागत नाही अशा अनेक समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळतात. रात्री लवकर झोप न येणं आणि सकाळी लवकर न उठल्यानंदेखील आरोग्यविषयक तक्रारी सुरू होतात.”
(हे ही वाचा : तुम्ही रोज रात्री जेवल्यानंतर ३० मिनिटे शतपावली कराल तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या… )
स्लीप रिसर्च सोसायटीच्या संशोधनानुसार डाॅक्टर नमदू करतात की, निरोगी शरीरासाठी चांगली झोप चांगली मिळणं गरजेचं असतं. जर तुम्ही दररोज सात ते आठ तास झोपलात, तर तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता. निरोगी झोपणाऱ्यांच्या तुलनेत कमी झोप घेणाऱ्यांमध्ये हृदय आणि रक्तवहिन्यासंबंधीच्या रोगांचा धोका वाढल्याची बाब समोर आली आहे. जर तुमची फक्त एक तासाची झोप कमी झाली, तर ती बरी होण्यासाठी चार दिवस लागू शकतात.
थोड्या प्रमाणात झोप गमावण्याचा परिणाम महत्त्वपूर्ण ठरू शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, जेव्हा झोप विस्कळित होते, तेव्हा मेंदूत माहितीवर प्रक्रिया करणे आणि लक्ष ठेवणे या क्षमता बिघडतात. कित्येक दिवसांत थोड्या प्रमाणात झोप गमावण्याचा एकत्रित परिणाम एका रात्रीत कित्येक तास झोप गमावण्यासारखा असू शकतो. त्यासाठी उपाय म्हणून तुम्ही झोपेचे योग्य वेळापत्रक बनवून, त्याप्रमाणे नियोजन करू शकता.
त्याचप्रमाणे व्यक्तीनं रात्री झोपण्यापूर्वी जंक फूड खाऊ नये. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळतं. ते रक्तदाब वाढविण्याचं काम करते. त्यामुळे चहा वा काॅफीचं सेवन करू नये, मद्यपान करणं टाळा, अशाही सूचना डाॅक्टरांनी दिल्या आहेत.
ज्या कोणालाही आरोग्याबाबत तीव्र स्वरूपाचा त्रास असेल, जसे की, स्लीप अॅप्निया किंवा मानसिक आरोग्याचे विकार, झोपेचे नुकसान यांमुळे तीव्र लक्षणे दिसू शकतात. त्यांच्या शरीराची तणाव आणि ताजेतवाने होण्याची क्षमता यांमध्ये बर्याचदा तडजोड केली जाते; ज्यामुळे आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे ही अधिक आवश्यक व गंभीर बाब बनते.