Minimum Time Women & Men Should Exercise In A Week: आज उठायला उशीर झाला, उद्यापासून व्यायाम नक्की! मैत्रिणींनो रोज झोपेतून उठल्यावर तुम्ही सुद्धा असंच म्हणून तुमच्या व्यायामाला पुढे ढकलतंय का? आज आपण असे एक संशोधन पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा व्यायामाचा उत्साह व ऊर्जा दोन्ही वाढायला मदत होऊ शकते. अलीकडेच एका यूएस अभ्यासात असे आढळून आले आहे की दर आठवड्याला महिलांनी पुरुषांपेक्षा कमी जरी व्यायाम केला तरी त्यांना समान फायदे मिळू शकतात. या अभ्यासात ४ लाख प्रौढांचे निरीक्षण करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी व्यायामाला किती वेळ द्यायला हवा व कशा प्रकारचा व्यायाम करायला हवा यासंदर्भात सुद्धा काही खुलासे समोर आले आहेत. चला तर मग ही माहिती तपशीलवार जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्सस्प्रेससह बोलताना एम्समधील कार्डिओलॉजीचे प्राध्यापक डॉ राकेश यादव सांगतात की, “एखादी स्त्री जेव्हा एखादे काम करते तेव्हा ते काम करण्यासाठी ती तिच्या कुटुंबाला सुद्धा सक्षम करत असते त्यामुळे महिलांनी विशेषतः व्यायामासाठी थोडा वेळ काढायलाच हवा. यासाठी प्रोत्साहन देणारा हा एक सकारात्मक शोध आहे.”

महिलांना नियमित व्यायामाचा फायदा जास्त का होतो?

संशोधकांनी सांगितले की, शरीरविज्ञानातील फरकामुळे महिलांमध्ये व्यायामाचे फायदे पुरुषांपेक्षा जास्त असतात. लेखकांचे म्हणणे आहे की, पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त व्यायाम करण्याची क्षमता असते, तुलनेने मोठे हृदय, विस्तीर्ण फुफ्फुस वायुमार्ग आणि मोठे स्नायू असल्याने सरासरी, पुरुषांच्या शरीरात महिलांपेक्षा ३८ टक्के अधिक बॉडी मास असते. याचा अर्थ असा होतो की स्त्रियांच्या हृदय, स्नायू आणि वायुमार्गांना आकार लहान असल्याने समान हालचाली पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.

संशोधकांनी असेही म्हटले आहे की स्त्रिया आणि पुरुषांच्या स्नायूंचे प्रतिसाद वेगवेगेळे असतात. पुरुषांच्या तुलनेत महिला जेव्हा स्नायूंचा वापर करत नाहीत तेव्हा स्नायूंचा आकार वेगाने कमी होतो मात्र जेव्हा स्नायूंचा वापर केला जातो, त्याला व्यायाम दिला जातो तेव्हा तितक्याच वेगाने स्नायूंची रचना सुधारू शकते. डॉ यादव म्हणतात, “अभ्यासात असे दिसून आले की, ज्या स्त्रिया नियमितपणे व्यायाम करतात त्यांची जीवनशैली निरोगी राहू शकते. तसेच त्यांना धूम्रपान आणि मद्यपान करण्याची इच्छा कमी व निरोगी खाण्याची इच्छा जास्त होऊ शकते, हे सगळं एकत्रित जमल्यास आरोग्यात महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात.

अभ्यासात काय आढळले?

अभ्यासात असे आढळून आले की २७.८ टक्के पुरुषांच्या तुलनेत केवळ १९.९ टक्के महिला नियमित स्नायूंचे व्यायाम करतात. महिलांच्या व्यायामाच्या सत्रांची सरासरी संख्या देखील कमी होती. आठवड्यात दोन तासांच्या वेगवान शारीरिक हालचालींमुळे, पुरुषांमधील मृत्यू दर १९ टक्क्यांनी कमी झाला होता तर महिलांनी एक तासापेक्षा किंचित कमी प्रयत्न करून समान फायदा मिळवला. आठवड्याला जवळजवळ दोन तास वेगवान शारीरिक हालचाली करणाऱ्या महिलांमधील मृत्यूचा धोका व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत २४ टक्क्यांनी कमी झाला होता. तर आठवड्यातून पाच तास मध्यम ते वेगवान तीव्रतेचा शारीरिक व्यायाम करणाऱ्या पुरुषांमधील मृत्यूचा धोका व्यायाम न निर्णयांच्या तुलनेत १८ टक्क्यांनी कमी झाला होता. जर हे व्यायाम सत्र नियमितपणे पाळले गेले तर मृत्यूचा धोका कमी होण्याची टक्केवारी २४ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

हे ही वाचा<< रिकाम्या पोटी ‘या’ पाच भारतीय पदार्थांचं सेवन केल्याने प्रत्येक सकाळ होईल सुंदर; पोट स्वच्छ होत नसेल तर पाहाच

एका आठवड्यात तुम्ही किती व्यायाम करावा?

डॉ. यादव यांनी सांगितले की, प्रत्येकाने दिवसातून ४० ते ४५ मिनिटे व्यायाम करायला हवा. यासाठी हळूहळू सुरुवात करणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे कसरत न केल्यावर अचानक धावणे किंवा वजन उचलणे यासारखे उपक्रम हाती घेऊ नयेत. यासाठी योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. सर्व वयोगटातील प्रत्येकासाठी चालणे सोपे आणि चांगले आहे. पाच मिनिटे चालणे हे एक मिनिट धावण्यासारखे असू शकते. एखाद्या वेळी वयस्कर व्यक्ती कदाचित धावू शकणार नाही पण ते चालण्यास नक्कीच सक्षम असू शकतात. योगासुद्धा सुदृढता राखण्यासाठी मदत करू शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How long men women shall exercise in a week to reduce threat of death by 24 percent new study us suggest how to live long svs