How many hours of sleep do you need according to your age?: एकूण आरोग्य राखण्यात झोप महत्त्वाची भूमिका बजावते. झोप शरीराला रात्रभर स्वतःची दुरुस्ती करण्यास मदत करते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि मेंदूला योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करते. जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप किंवा विश्रांती मिळत नाही, तेव्हा तुम्हाला थकवा, चिडचिड, मूड स्विंग्स होणे, थकवा, निराशा, चिडचिडेपणा आणि अस्वस्थता जाणवण्याची शक्यता जास्त असते. म्हणून तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही दररोज रात्री किती तासांची अखंड झोप घ्यावी? ‘लोकल सर्कल’च्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की, सर्वेक्षण केलेल्या ५९ टक्के भारतीयांना दररोज सहा तासांपेक्षा कमी झोप मिळते. विविध पार्श्वभूमीतील १५,६५९ व्यक्तींच्या प्रतिसादांवर आधारित या अहवालात असे दिसून आले आहे की, ३९ टक्के लोक दिवसातून फक्त ४-६ तासच व्यत्यय न येता झोपतात; तर २० टक्के लोक चार तासांपेक्षा कमी अखंड झोप घेतात. मुंबईतील परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या औषध क्षेत्रातील वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिले की, झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. “त्यात उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, तीव्र स्वरूपात मूड स्विंग होणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांचा समावेश असू शकतो. एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की, दर्जेदार झोप म्हणजे फक्त तुम्ही किती तास झोपता यापेक्षा बरेच काही असते. दर्जेदार झोप म्हणजे रात्री वारंवार जागे होणे टाळणे. दिवसभर योग्यरीतीने कार्य करण्यासाठी एखाद्याला किमान सात ते आठ तासांची दर्जेदार झोप मिळणे आवश्यक आहे,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

काम आणि जीवनातील ताणतणाव या परिस्थितींसारख्या अनेक घटकांमुळे झोपेत व्यत्यय येतात. “नियमितपणे कॅफिन व अल्कोहोलचे जास्त सेवन आणि झोपण्यापूर्वी जास्त स्क्रीन टाइम यांसारख्या जीवनशैलीच्या निवडी या घटनेला कारणीभूत आहेत,” असे बंगळुरूच्या रमैया मेमोरियल हॉस्पिटलचे कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. प्रसन्न कुमार टी. म्हणाले. पुढे त्यांनी, “दीर्घकाळ झोपेमध्ये व्यत्यय, हृदयरोग, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, चयापचय विकार, संज्ञानात्मक घट, चिंता, नैराश्य सारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा धोका वाढवतो,” असेही स्पष्ट केले.

तुमच्या वयानुसार तुम्हाला किती तास झोपेची गरज

निरोगी व्यक्तीसाठी आवश्यक असलेली झोपेची मात्रा व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असली तरी ताजेतवाने वाटण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दररोज रात्री किमान ७-८ तासांची अखंड झोप घेण्याची शिफारस केली जाते, असे डॉ. प्रसन्ना यांनी आवर्जून सांगितले. लक्षात ठेवा की, झोपेच्या गरजा आयुष्यभर सातत्याने विकसित होत असतात, असे डॉ. प्रसन्ना म्हणाले. पुढे ते म्हणाले, “किशोरवयीन मुलांना ८-१० तासांची आवश्यकता असते; तर वृद्धांना प्रमाणाच्या बाबतीत थोडी कमी वेळ लागू शकतो. तुमच्या जागे होण्याच्या वेळेची गुणवत्ता तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते, त्यामुळे अखंड झोपेला प्राधान्य दिले जाते.”

तुमची झोप सुधारण्यासाठी शिस्तबद्ध झोपेची पद्धत तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “दररोज एकाच वेळी उठण्याचा आणि झोपण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी तुमचा स्क्रीन वेळ टाळा किंवा मर्यादित करा. रात्री कॅफिन किंवा कॅफिनयुक्त पेये टाळणे चांगले. कारण- त्यामुळे तुमच्या झोपेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.