तुम्ही तुमचा टॉवेल किती वेळा धुता? बरेच लोक त्यांचा टॉवेल अनेक दिवस वापरतात आणि यामुळे ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या संपर्कात येऊ शकतात. डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’मधील त्वचा-सर्जन यांच्या मते, असं केल्याने त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात. आपला टॉवेल वारंवार धुणे ही केवळ ताजेपणाची बाब नाही, तर त्वचेचे चांगले आरोग्य आणि स्वच्छता राखण्यासाठी ते आवश्यक आहे.
आपल्याला आपला टॉवेल वारंवार धुण्याची का आवश्यकता आहे?
टॉवेल ओलावा आणि शरीरातील तेलांच्या संपर्कात येतात, ज्यामुळे बॅक्टेरिया, फंगस आणि इतर सूक्ष्म जीवांना वाढण्यासाठी चांगली जागा मिळते. अंघोळ केल्यानंतर तुमचा टॉवेल फक्त तुम्हाला कोरडे करत नाही; तर तो तुमच्या शरीरातील मृत त्वचेच्या पेशी (dead skin cells), घाम आणि नैसर्गिक तेलदेखील गोळा करतो. डॉ. कपूर यांनी स्पष्ट केले की, जर टॉवेल न धुता वापरला तर या घटकांमुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात.
१. जीवाणू संक्रमण (Bacterial Infections): बॅक्टेरिया ओलसर, उबदार वातावरणात वाढतात. न धुता टॉवेल वापरल्याने तुमच्या त्वचेवर बॅक्टेरिया पसरू शकतात, ज्यामुळे इन्फेक्शन, खाज किंवा पुरळ येऊ शकतात.
२. बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infections): बुरशी न धुतलेल्या टॉवेलवर वाढू शकते. या संक्रमणांमुळे त्वचेला खाज सुटणे, लालसरपणा येणे आणि वेगवेगळे त्वचेचे आजार वाढू शकतात, ज्यावर उपचार करणे अनेकदा कठीण असते.
३. त्वचेची जळजळ : टॉवेलवर घाण, घाम आणि तेल साचल्याने शरीरावरील छिद्रे बंद होऊ शकतात; ज्यामुळे बंप्स, रॅशेस किंवा पुरळ येऊ शकतात, ज्याला फॉलिक्युलायटिस म्हणतात.
४. दुर्गंधी : वारंवार न धुतल्या जाणाऱ्या टॉवेलमधून घाण वास येऊ लागतो, यामुळे तुमचा अंघोळीनंतरचा अनुभव आनंददायी होत नाही, तर यामुळे बॅक्टेरियाच्या उपस्थितीचा इशारा मिळतो.
टॉवेल किती वेळा धुतला गेला पाहिजे?
सर्वोत्कृष्ट स्वच्छतेसाठी, त्वचाशास्त्रज्ञ दर २-३ दिवसांनी तुमचा टॉवेल धुण्याची शिफारस करतात. हे खूप वाटत असले तरी, यामुळे तुमचा टॉवेल हानिकारक बॅक्टेरिया, फंगस आणि तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करू शकणाऱ्या इतर त्रासांपासून मुक्त राहील.
“जर हे शक्य नसेल तर टॉवेल किमान पाच दिवसांनी तरी धुण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे संसर्ग आणि त्रासाचा धोका कमी होईल,” असे डॉ. रिंकी कपूर म्हणाल्या.
(टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.)