डॉ. जाह्नवी केदारे, मनोविकारतज्ज्ञ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अध्यात्म- ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतःकडे पाहणे. अर्थातच स्वतःकडे पाहण्यात आत्मपरीक्षण येते. आत्मपरीक्षणातूनच आपल्या जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ काय, याचा विचार सुरू होतो आणि मग एक ‘पूर्णत्वा’ची आस निर्माण होते. मी आणि इतर यांच्यातला एकमेकांना जोडणारा एक दुवा, धागा सापडतो. आपल्या दैनंदिन आयुष्यापेक्षा, त्यातल्या अनेक ऐहिक गोष्टींपेक्षा मोठे काहीतरी , परिपूर्ण असलेले, खोलवर अर्थ प्राप्त करून देणारे आयुष्यात काही आहे याची जाणीव निर्माण होते. आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे त्याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय, कार्य काय हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे अध्यात्मिकता.

अध्यात्म आणि धर्म या गोष्टी समान नाहीत. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव, अशी शक्ती किंवा असे ‘कोणीतरी’, असते हे आध्यात्मिक माणूस मानतो अथवा मानत नाही. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा धार्मिकता ही रूढी-परंपरा, परमेश्वरस्तुती, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते. या उलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात.

आणखी वाचा-Mental Health Special: डिजिटल पालकत्व- मुलांसमोर आपण कोणत्या सवयींचा आदर्श ठेवतोय?

अध्यात्माकडे ओढा असलेले अनेकदा धर्मिकसुद्धा असतात. धार्मिक ग्रंथांचे वाचन, निरुपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभाग घेणे, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनःशक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी ‘स्व’ चा शोध घेतला जातो. ही सगळी चर्चा करण्याचे कारण असे की आजच्या संघर्षमय जीवनात, मनःशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. जीवनातला आनंदच हरवून बसेल की काय अशी भीती वाटू लागते. कौटुंबिक जीवन, व्यावसायिक जीवन आणि सार्वजनिक जीवन या सर्व आघाड्यांवर लढता लढता आबालवृद्ध थकून जातात. मनात निर्माण होणाऱ्या चिंता, विषाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वांचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे अध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो. आत्तापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून हे लक्षात आले आहे.

एखादे संकट आले की परिस्थितीला दोष देत बसले की मन निराश होते. पण, ‘देवाला बहुधा या प्रसंगातून मला काहीतरी शिकवायचे आहे’ किंवा ‘ देव जे करतो ते भल्याकरताच’ असे म्हणणाऱ्या व्यक्तीला पटकन निराशा येत नाही. अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्यात बदल होतात. अंतःस्राव करणाऱ्या संस्था आणि प्रतिकारशक्ती यांमध्ये अनुकूल बदल घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून (शारीरिक आणि मानसिक) संरक्षण होते. वार्धक्यामध्ये येणाऱ्या विषादाच्या मनोविकाराचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून सामना केला, (coping strategy), तर उदासपणा कमी होतो. ‘माझ्या कुठल्यातरी चुकीची किंवा पापाची मला शिक्षा मिळते आहे’ किंवा ‘माझे निरोगी असणे माझ्या हातात नाही, तर काही दुष्ट शक्तींच्या हातात आहे’ असे मानणाऱ्याला जास्त निराश वाटते. याउलट आयुष्यात समाधानी असलेला आणि ‘आपल्या जीवनात काही शुद्ध हेतू आहे’ असे मानणारा कमी निराश होतो.

आणखी वाचा-Health Special: मानसिक आघाताची लक्षणे कोणती? तो कसा ओळखावा?

कॅन्सरसारख्या विकाराचा सामना करताना किंवा हृदयरोग स्वीकारताना किंवा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतून बरे होताना जी अतिचिंता निर्माण होते ती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो. आपत्तीनंतरच्या काळात आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या उपदेश- प्रवचनांचा अतिशय सकारात्मक उपयोग होतो हे आपल्याकडच्या लातूर आणि कच्छच्या भूकंपानंतर अनुभवायला आले आहे. या प्रक्रियेत सामूहिकतेची भावना आणि एकमेकांना मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. मानसिक विकारांची रुग्णाकडून माहिती घेताना त्याचा धार्मिक, अध्यात्मिक दृष्टीकोन समजून घेणे दिवसेंदिवस महत्त्वाचे ठरते आहे.

मानसिक उपचारांमध्येदेखील अध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे. देऊळ, देवळातले वातावरण, भजन-कीर्तन , नामस्मरण, चर्च- मशिदीतील वातावरण या सगळ्याचा आध्यात्मिकता वाढण्यासाठी उपयोग होतो. आमच्या ओपीडीत येणाऱ्या मंगलाताई दरवर्षी वारीतून आषाढी एकादशीला पंढरपूरला जायच्या, कार्तिकी एकादशीपर्यंत तिथे राहायच्या आणि एक मानसिक बळ प्राप्त करून परत यायच्या. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा चिंता, उदासपणा, हृदयरोग, अतिरक्तदाब अशा अनेक विकारांमध्ये उपयोग होतो. स्वतःकडे ‘पाहण्याची’ सवय होते. लक्ष केंद्रित करता येते. वर्तमानात जगण्याची शिकवण मिळते. अशा गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते.

आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कलाविष्कारातूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. निसर्गाच्या सान्निध्यातही एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते. प्रार्थनेतही अंतर्मुख करण्याची, लीनता निर्माण करण्याची, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते. मोठ्याने उच्चारलेले मंत्रोच्चारण, एखादे ठेक्यात आणि तालात एकत्र म्हटलेले भजन, चर्चमध्ये गायली जाणारी ईशस्तुती, प्रवचन या सगळ्यातून अमाप मनःशांती आणि समाधान मिळते.

आपल्याकडे संतसाहित्य आपला प्रपंच करताना आध्यात्मिकतेचा अवलंब कसा करायचा याची शिकवण देते. समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’च लिहिले. आपले दुःख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतः पलीकडचा व्यापक विचार करण्याचा सल्ला ते देतात. म्हणूनच ते म्हणतात,

मना मानसी दुःख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी

संत ज्ञानेश्वर म्हणतात,

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
अवघेची जाले देह ब्रह्म

…अशा वेळेस येणारी अनुभूती स्वतःचा शोध घ्यायला लावणारी असते. अशी अनुभूती मनाला उभारी देते, भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करते आणि अर्थातच मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much mental strength does spirituality really provide hldc mrj
Show comments