Sleep Deprivation : धापवळीच्या आयुष्यात अनेकदा आपण वेळेवर जेवण करीत नाही किंवा झोपत नाही; ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. चांगली झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी चांगले आहे; पण जर तुम्ही नीट झोप घेत नसाल, तर त्यामुळे आरोग्याच्या दीर्घकालीन समस्या जाणवू शकतात. जर तुम्ही वयाच्या तिशीत शांत आणि चांगली झोप घेत नसाल, तर त्याचा परिणाम तुमच्या उर्वरित आयुष्यावर होऊ शकतो.
अनेक संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे जाणवले की, जे लोक वयाच्या तिशीत किंवा चाळिशीत नीट झोप घेत नाहीत. त्यांना काही काळानंतर निश्चितच स्मरणशक्ती किंवा विचारशक्ती मंदावण्याची समस्या जाणवू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुग्राम येथील पारस हेल्थच्या न्यूरोलॉजीचे चेअरपर्सन डॉ. एम. व्ही. पद्म श्रीवास्तव सांगतात, “झोपेची समस्या काही काळानंतर अल्झायमरसारख्या मेंदूच्या आजारांची शक्यता वाढवू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूतील बीटा अ‍ॅमिलॉइड प्रोटीनची पातळी वाढते; ज्यामुळे अल्झायमरवाढीसाठी कारणीभूत असलेले अमिलॉइड प्लेक्स तयार होतात. हे प्लेक्स नंतर झोपेशी संबंधित मेंदूच्या भागावर परिणाम करतात; ज्यामुळे आपल्याला नीट झोप येत नाही.”

वयाच्या तिशीत सतत अपुरी झोप घेत असाल, तर त्याचा थेट परिणाम वयाच्या पन्नाशीत होऊ शकतो. स्मरणशक्तीवर याचा खोलवर परिणाम होतो. विशेषत: त्यामुळे एखादी गोष्ट शिकणे किंवा आठवणे अवघड जाते. अपुऱ्या झोपेमुळे ध्येयप्राप्ती आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. झोपेच्या अभावामुळे मेंदूचा महत्त्वाचा भाग प्रीफंटल कॉर्टेक्सवर प्रभाव पडतो; जो खोलवर विचार करण्यास मदत करतो आणि त्यामुळे क्रिएटिव्हिटी व एखादी समस्या सोडविणे कठीण जाते. जर कायम झोपेशी संबंधित आजार असेल, तर अल्झायमरसारखे मेंदूचे आजार होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय झोपेचा थेट परिणाम आपल्या मनस्थितीवर झाल्यामुळे तणाव, चिंता आणि सतत मूड बदलण्याचा त्रास होतो.

अपुऱ्या झोपेचा परिणाम हृदयआणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांवर होऊ शकतो. झोपेच्या अभावामुळे लठ्ठपणा वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी समस्या वाढू शकतात.

हेही वाचा : धूम्रपान न करणार्‍यापेक्षा धूम्रपान करणार्‍याला मधुमेह होण्याचा धोका तिप्पट का असतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…

वयाच्या तिशीत किती वेळ झोपायला पाहिजे?

निरोगी आरोग्यासाठी सात ते नऊ तास झोपणे आवश्यक आहे; पण हार्मोन्स तयार होताना शरीरात जे बदल होतात, त्याचा थेट झोपेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

वेळेवर कसे झोपावे?

झोपण्यापूर्वी तुम्हाला किती वाजता सकाळी उठायचे ते ठरवून घ्या. झोपेचे तास मोजून त्यानुसार जेवणाची वेळ ठरवा आणि इतर गोष्टी करा.

जर तुम्हाला वेळेवर झोप येत नसेल, तर खालील गोष्टी करा.

१) कोमट पाण्याने अंघोळ करा, पुस्तक वाचा.

२) झोपण्याच्या तीन तासांपूर्वी अल्कोहोल, कॅफिनचे सेवन करू नका आणि जेवण करणे टाळा.

३) झोपताना फोन आणि लॅपटॉपचा वापर करू नका. या वस्तू दूर ठेवा.

४) दिवसा झोपणे टाळा. कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा.

५) झोपेच्या वेळेपूर्वी मेंदूला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी करणे टाळा. तसे केल्यामुळे तुम्हाला शांत झोप घेता येईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How poor sleep in 30s cause memory loss in 50s how long should people in their 30s sleep read what health expert said ndj