Suryanamaskar and Pranayama : सध्या वसंत ऋतू सुरू आहे. वसंत ऋतूमध्ये झाडाला पालवी फुटते. हळू हळू थंडी कमी होते आणि वाढत्या उष्णतेचा शरीरावर परिणाम दिसून येतो. अचानक वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अनेकांना ताप, खोकला, सर्दी, दम्याचा त्रास होतो. गरम वातावरणामुळे अन्न खराब होण्याची शक्यता असते. अशा अन्नाचे सेवन केल्याने संसर्गाचा धोका आणखी वाढतो. अशावेळी काही योगासनाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी कामिनी बोबडे यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे.
सूर्यनमस्कार – सूर्यनमस्कार आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. नियमित पाच ते दहा वेळा सूर्यनमस्कार घालावे, यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते. जर तुम्ही सूर्यनमस्काराची पूर्ण प्रक्रिया करत नसाल तर ताडासन आणि पर्वतासन करा.
प्राणायाम – प्राणायामचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कपालभाती आणि भस्त्रिका हे दोन खूप प्रभावी प्राणायामचे प्रकार आहेत, जे पचन क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. प्राणायाममुळे रक्त शुद्ध करण्यास मदत होते आणि मन स्थिर राहते.
कपालभाती – कपालभाती हा श्वासोच्छवासाचा एक प्रभावी व्यायाम आहे. या प्राणायाममध्ये खूप वेगाने श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा असतो, ज्यामुळे फुफ्फुसातील विषारी घटक बाहेर पडतात आणि तुम्हाला चांगल्याप्रकारे श्वास घेता येतो. दम्याच्या रुग्णांसाठी कपालभाती अधिक फायदेशीर आहे.
कपालभाती कसे करावे?
- कपालभातीसाठी पद्मासनात बसा.
- तुमची पाठ सरळ ठेवा.
- तुमचे डोके आणि पाठीचा कणा सरळ रेषेत आहे का तपासा.
- हात गुडघ्यावर ठेवा आणि शरीर आरामदायी स्थितीत ठेवा.
- डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.
- वेगाने श्वास सोडण्यास आणि घेण्यास सुरुवात करा.
- प्रत्येक श्वासोच्छवासाच्या वेळी तुमचे पोट आत जाईल.
- सुरुवातीला दहा वेळा श्वासोच्छवास घ्या, त्यानंतर हळूहळू आकडा ५० पर्यंत आणा.
भस्त्रिका – भस्त्रिका हा प्राणायामचा प्रभावी प्रकार आहे. वात, कफ, पित्त यांसारख्या आरोग्याच्या समस्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
भस्त्रिका कसे करावे?
- भस्त्रिका करताना पद्मासनात बसावे.
- कपालभातीने सुरू करा.
- जलदगतीने श्वास आत-बाहेर करावा.
- श्वास आत-बाहेर करताना योग्य गती द्या.
- आधी दहा वेळा करा, त्यानंतर हळूहळू आकडा ५० पर्यंत आणा.
नाडी शोधन – नाडी शोधन प्राणायामात डाव्या आणि उजव्या नासिकेने आलटून-पालटून श्वास घ्यावा, यामुळे मेंदूच्या कार्यात समतोल राखण्यास मदत होते.
नाडी शोधन कसे करावे?
- पद्मासनात बसा आणि शरीर ताठ ठेवा.
- डोळे बंद करा आणि हळूहळू श्वास घ्या.
- उजव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट यांची टोके भुवयांच्या मध्यभागी ठेवा.
- अनामिका आणि करंगळी डाव्या नाकपुडीवर आणि अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा.
- अनामिका आणि करंगळी डावी नाकपुडी बंद करण्यासाठी किंवा उघडण्यासाठी वापरा आणि अंगठा उजव्या नाकपुडीसाठी वापरा.
- हळूहळू श्वास आत-बाहेर करावा.
- पाच ते सात वेळा करा.
नोट – ज्या लोकांना हृदय, उच्च रक्तदाब, रेटिनाची समस्या, काचबिंदू, स्ट्रोक एपिलेप्सी किंवा ज्या लोकांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी सूर्यनमस्कार, कलापभाती किंवा भस्त्रिका करणे टाळावे. नाडी शोधन कोणीही करू शकतो.