चिंच, जवस, पुदिना औषधी गुणधर्म असलेल्या तिन्ही गोष्टी विविध प्रकारात खाणं आपल्या तब्येतीसाठी अतिशय चांगलं आहे. जाणून घेऊया त्यांच्या उपयुक्ततेविषयी

चिंच

चिंच ही पाचक गुणाचे आरोग्य टिकविण्याकरिता खूप चांगले कार्य करू शकते. चिंच सर्वत्र सहज मिळते. तोंडाला चव आणणे, कमीजास्त खाल्ले तरी त्याचे पचन करणे, पोटात गुबारा धरून राहिलेला वायू मोकळा करणे, जेवणानंतर होणारी लगेचची मलवृत्ती थांबवणे, पाण्यासारख्या होणाऱ्या पातळ जुलाबांना आळा घालणे, कॉलरा, हगवण, अग्निमांद्य, विषुचिकासारख्या पोटात कळा मारून होणाऱ्या विकारात चिंच अतिशय उत्तम व तात्काळ काम देते. चिंचेचा कोळ करून त्यात मीठ मिसळून सरबत घेतल्याबरोबर उतार पडतो.
चिंचेच्या झाडाच्या सालीचे चूर्ण पोटदुखीवर उत्तम उपाय आहे. अंगावर पित्त उठल्यास चिंचेच्या पाल्याचा रस पोटात घ्यावा. उठलेल्या गांधीवर चोथा घासून लावावा. खाज, आग लगेच थांबते. बिब्बा, जमालगोटा किंवा सल्फा ड्रग अशा तीव्र औषधांनी अंगावर रॅश उठल्यास चिंचेच्या पाल्याचा बाह्योपचार व पोटात घेण्याकरिता उपयोग होतो. चिंचेचे पाणी कणभर मीठ, गोडेतेल यांच्या एकत्र मिश्रणाने ‘चिंचालवण तेल’ नावाचे एक अप्रतिम औषध, शौचाला होणे, तीव्र मलावरोध, उदरवात याकरिता घरच्याघरीसुद्धा करता येते.
कुपथ्य : कोड, शिबे, इसब, गजकर्ण, खरूज, नायटा, अम्लपित्त, सोरायसिस, सर्दी, पडसे, खोकला, दमा, हातापायांची व डोळ्यांची आग, कंड, केस गळणे, केस पिकणे, कोड, कृशता, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, घाम खूप येणे, जखमा, डोळ्यांचे विकार, तोंड येणे, नागीण, मूळव्याध, भगंदर, अल्सर, रक्ताचे विकार, सूज, महारोग या विकारांत आहारांत चिंच कटाक्षाने वर्ज्य करावी. चिंचेच्या अम्लाच्या अति वापराने आतड्यांना इजा पोहोचते.

जवस (अळशी)

जवस किंवा अळशी या नावाने ओळखले जाणारे कडधान्य आपणास फक्त पोटिसाला उपयुक्त एवढेच माहीत आहे. संस्कृतमध्ये उमा या नावाने जवसाचे वर्णन, उष्ण व त्वचारोग तसे कफपित्ताचे रोग वाढविणार असे केले आहे. आळशी किंवा जवसाच्या पाठीचे किंवा बिया पाण्यात वाटून पळीत गरम करून त्याचे पोटीस मार, मुरगळा, संधिवाताची किंवा आमवाताची सूज, वेदना असलेल्या फोडावर लावावे. फोड असले तर ते पिकून फुटतात. नुसती सूज किंवा ठणका असेल तर तात्पुरता ठणका थांबून सूज ओसरते.
लघवीच्या तक्रारीत जवसाचा लहान प्रमाणात घेतलेला काढा, लघवी साफ करून किडनीची सूज कमी करावयास मदत करतो. जवसाचा काढा मोठ्या प्रमाणावर घेतल्यास त्यापासून जुलाब होतात. लघवीच्या इंद्रियाची आग होत असल्यास जवसाचा काढा प्यावा. खडतर खोकल्यामध्ये, विशेषत: वृद्धाच्या खोकल्यात, कफ मोठ्या मुश्किलीने सुटतो. अनेक औषधे काम करत नाहीत. अशा वेळी पंचवीस-तीस ग्रॅम जवसाचा चार कप पाण्यांत काढा करून आटवून एक कप एकदा प्यावा. कफ पातळ होऊन खोकल्यास उतार पडतो.
त्वचा विकारात, विशेषत: महारोग्यासारख्या पू असणाऱ्या, फोड, सूज असणाऱ्या विकारांत जवसाच्या बिया वाटून त्यांचा लेप बाहेरून लावावा. जवसाच्या बियांचा पाक पौष्टिक आहे.
जवसाचे तेल मसाजाकरिता उपयुक्त आहे. तेल गरम करून किंचित मीठ मिसळून मसाजाकरिता वातविकारात वापरावे. याच तेलाची पिचकारी अर्धांगवात, संधिवात, पाठदुखी, कंबरदुखी या तक्रारींकरिता उपयुक्त आहे. लघवीच्या इंद्रियांची सूज पू, फोड या ठिकाणी जवसाच्या तेलाची पट्टी वारंवार ठेवावी. पू कमी होतो. सूज कमी होऊन ठणका थांबतो. वारंवार लघवी होत असल्यास सकाळी व सायंकाळी जवसाचे तेल दोन चमचे प्यावे.

पुदिना

पुदिना वात व कफ विकारात फार उपयुक्त आहे. सर्दी, पडसे, खोकला, कफ, दमा, फुप्फुसाचे विकार, टीबी, तीव्र श्वास लागणे या विकारांत नियमितपणे पुदिना चटणी खावी. जोडीला आले, लसूण किंवा ओली हळद वापरावी वा नुसता पुदिना रस प्यावा. छातीतील कफ मोकळा होतो. पुदिना पाचक आहे. पोटात वायू धरत असल्यास कमी होतो. पुदिन्याचे सरबत करावे. त्यात जिरेपूड व गूळ वापरावा.
पुदिना अरुची दूर करतो. उन्हाळ्यात खूप तहान लागते व अन्न नकोसे होते त्याकरिता पुदिना सरबत घ्यावे. उलट्या, कॉलरासारखे जुलाब याकरिता पुदिना उपयुक्त आहे. स्त्रियांचे दूध सुधारले की लहान बालकाला जुलाब होत नाहीत. त्याकरिता बाळंतिणींनी पुदिना चटणी अवश्य खावी. पोटदुखी, आतड्यांचे विकार, कृमी या विकारांत नियमितपणे पुदिना रस घ्यावा. गोवर, कांजिण्या व नियमित येणाऱ्या तापात पुदिना अवश्य वापरावा. ताजा पुदिना न मिळाल्यास पुदिन्याची वाळवून सुकलेली पाने वापरावी. औषधी बाजारात पुदिना अर्क किंवा मेन्थॉल क्रिस्टल या नावाने केमिकल मिळतात. या केमिकलला पुदिन्यासारखा वास येतो. एवढाच त्याचा पुदिन्याशी संबंध जोडता येईल.

Story img Loader