सोरियासिस ह्या त्वचारोगाचे नाव हल्ली बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे. आज आपण या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत. हा आजार आपल्या रोगप्रतिकारक शक्तीतील बदलामुळे होतो व त्यामध्ये बऱ्यापैकी अनुवंशिकता असते. भारतातील साधारण एक ते दोन टक्के लोकांना हा आजार होतो. हा आजार कुठल्याही वयात होतो, पण जास्त करून वयाच्या विशी ते चाळीशी मध्ये सुरु होतो.

आणखी वाचा : Health special: निरोगी आयुष्यासाठी मीठ किती खावे? किती खावू नये?

Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया
Need for expansion of palliative care services in state
राज्यात ‘पॅलिएटिव्ह केअर’ सेवेच्या विस्ताराची गरज!

सोरियासिस हा आजार पुरुषांना होण्याची शक्यता स्त्रियांपेक्षा दुप्पट असते. सोरियासिस हा हल्ली जीवनशैलीचा आजार मानला जातो व जसं ब्लडप्रेशर, मधुमेह व हृदयरोग हे आजार जीवनशैली आरोग्यदायी ठेवल्यास बऱ्यापैकी आटोक्यात राहतात तसेच या आजाराचेही आहे. या आजाराबद्दल एक चांगली गोष्ट अशी आहे की हा आजार संसर्गजन्य नाही.

आणखी वाचा : Health special: आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असावे?

आजाराची कारणे: या आजारामध्ये आपल्या बाह्यत्वचेच्या पेशी या काही आठवड्यांऐवजी काही दिवसांमध्ये तयार होतात. पेशींच्या जलद वाढींमुळे त्यांची योग्य वाढ होत नाही. जिकडे सोरियासिसचे चट्टे असतात तिकडची त्वचा खरवडली तर अभ्रकासारखे पापुद्रे निघतात व जास्त खरवडल्यास रक्तही येऊ शकते. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पांढऱ्या पेशींपैकी टी लिम्फोसाईट या पेशी बॅक्टेरिया व व्हायरस मारण्यासाठी तसेच आपल्याला कॅन्सर होऊ नये यासाठी कार्यरत असतात. ज्या व्यक्तीला सोरियासिस होतो त्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक शक्तीमध्ये थोडा बिघाड होतो व या टी लिम्फोसाईट आपल्या त्वचेविरुद्धच काम करावयास लागतात.

आणखी वाचा : Health special: त्वचेचा कर्करोग कसा टाळाल? (भाग दुसरा)

सोरियासिसमध्ये कधीकधी संधिवात देखील होऊ शकतो. हा आजार अचानक निर्माण होण्यासाठी किंवा असलेला आजार वाढण्यासाठी खालील गोष्टी कारणीभूत होऊ शकतात. मानसिक ताण-तणाव, त्वचेला होणारी जखम किंवा त्वचेवर काही ठिकाणी वारंवार येणारा दाब, (उदाहरणार्थ ढोपर, कोपर, तळहात, तळपायांवरील दाब), जंतुसंसर्ग (स्ट्रेप्टोकोकस जिवाणू मुळे होणारा घसादुखीचा आजार), काही औषधे, (उदाहरणार्थ लिथियम, स्टिरॉइड्स, Hydroxychloroquin), हवामान विशेषतः थंड व कोरडी हवा, सिगारेट, बिडी, तंबाखू सेवन, दारूचे व्यसन इत्यादी.

आजाराची लक्षणे:

प्लाक सोरियासिस: या प्रकारामध्ये डोके, कोपर, ढोपर, पाठ व इतर ठिकाणीही जाड, लालट रंगाचे व अभ्रकासारखे पापुद्रे असणारे चट्टे येतात. त्यांना बहुतेक वेळा खाजही भरपूर असते.
पामो प्लांटार सोरियासिस: काही जणांना फक्त तळहात, तळपाय व हातापायांची बोटे यावरच हा आजार होतो. तळहात व तळपायांवर त्वचा जाड होऊन भेगा पडतात, खाज येते व दुखतेदेखील.
गटेट सोरियासिस: हा प्रकार विशेषतः लहान मुलांमध्ये पहावयास मिळतो. अशा मुलांना Streptococcus या जिवाणूपासून घसादुखी होते व त्यानंतर अंगावर थेंबासारख्या बारीक सोरायसिसच्या पुळ्या येतात. हा आजार मात्र इतर सोरियासिस प्रमाणे जास्त दिवस राहत नाही.
सोरियाटिक एरीथ्रोडर्मा: जेव्हा सोरियासिसचा आजार फार जास्त होतो तेव्हा संपूर्ण अंग बऱ्यापैकी लाल होते व संपूर्ण अंगाचीच त्वचा पापुद्र्या-पापुद्र्यामध्ये निघते. अंथरुणात देखील पापुद्रे पडतात. अशा व्यक्तींना थंडी वाजते व पायाला सूजही येते. सोरियासिस मधील हा गंभीर प्रकार समाजला जातो व क्वचितच होतो.
पश्च्युलार सोरियासिस: हाही फार कमी व्यक्तींना होतो. यामध्ये पू भरलेल्या पुळ्या अंगावर येतात व काही ठिकाणी सोरियासिसचे नेहमीचे चट्टे देखील असतात. हाही प्रकार गंभीर मनाला जातो.
सोरियाटिक आर्थ्रोपाथी: ज्या व्यक्तींना सोरिअसिस असतो त्यापैकी काहींचे हातापायाचे बारीक सांधे दुखू लागतात व संधिवात होतो. याला सोरायसिस मुळे होणारा संधिवात म्हणतात.
सोरियासिस व एक्झिमा मध्ये काय फरक आहे: एक्झिमा हा हळवी किंवा नाजूक त्वचा असल्यामुळे होणारा आजार आहे. एक्झिमांमध्ये ढोपर आणि कोपराच्या आतल्या बाजूला पुरळ उठते व सोरियासिस पेक्षा एक्झिमाला खाज जास्त असते. तसेच एक्झिमामध्ये लस येण्याचे प्रमाण जास्त असते.
सोरियासिसच्या रुग्णांनी घरी करण्याजोगे उपचार: आंघोळीला कोमट पाणी घेणे, जास्त तीव्र साबण टाळावा, पिअर्स डव असे साबण वापरावेत. आंघोळ केल्यावर लगेच व्हॅसलीन किंवा मॉईश्चरायझर लावावे. केसांमध्ये सोरियासिस असल्यास पापुद्रे निघण्यासाठी टार किंवा सॅलिसिलिक अॅसिड असलेला शाम्पू वापरावा. रोज चालण्याचा किंवा इतर एरोबिक व्यायाम
करावा. चट्ट्यांना जास्त खाजवू नये किंवा ते कोचू नयेत. जास्त खाज आल्यास स्वच्छ कपडा थंड पाण्यात भिजवून तो चट्ट्यांवर पसरून ठेवावा, जेणेकरून गारवा वाटेल.

मन आनंदी ठेवावे व सारखे या आजारात गुंतून न राहता बाकी गोष्टींमध्ये जास्त मन गुंतवावे, जेणेकरून हा आजार कमी होण्यास मदत होईल. मानसिक ताण-तणावाचा रोगप्रतिकारशक्तीशी संबंध आहे. त्यामुळे ताण-तणावाने सोरीयासिसची सुरुवात होऊ शकते किंवा तो अचानकवाढण्याचे ते एक कारण असू शकते. त्यामुळे योगासने व एकाग्रतेने केलेली ध्यानधारणा (mindfulness meditation) यांचा सहाय्यक उपचार म्हणून उपयोग होऊ शकतो. लाल मांस (कोंबडी व्यतिरिक्त इतर मांस), सोडा असलेली शीत पेये, साखर, मिठाई, अतिसफेद तांदूळ, सफेद पाव, तळलेले पदार्थ, चिप्स, बिस्किटे, केक, फास्ट फूड आदी पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. दारू, धुम्रपान व इतर प्रकारातील तंबाखू या व्यसनांमुळे सोरियासिस एक तर सुरु होतो किंवा चालूच राहतो. त्यामुळे अशा व्यसन व सवयींपासून दूरच राहणे चांगले.

या आजारावर अॅलोपथीमध्ये हल्ली नवीन नवीन उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. त्यामध्ये त्वचेवर लावण्याची मलमे व पोटात घ्यायच्या गोळ्या असतात. हा आजार प्रतिकारशक्तीतील बदलामुळे झाल्यामुळे यातील
बरीचशी औषधे ही प्रतिकारशक्तीचे दमन करणारी असतात. त्यामुळे ही औषधे सुरू असताना डॉक्टरांच्या सल्ल्याने ठराविक कालावधीनंतर रक्त तपासणी करणे आवश्यक असते. या आजारासाठी न्यारोबँड अल्ट्राव्हायोलेट बी ही एक किरणोपचार पद्धती उपलब्ध आहे. त्याचे दुष्परिणाम कमी आहेत. ज्यांचा आजार नेहमीच्या उपचारांनी आटोक्यात येत नाही त्यांना बायोलॉजिक्स किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडी ही उपचार पद्धती उपलब्ध आहे. ही औषधे म्हणजे एक प्रकारचे प्रोटीन असते, जे रोगप्रतिकारशक्तीतील बदलामुळे झालेल्या सायटोकाइन्स रसायनांना अटकाव करते व त्यामुळे सोरिअसिस आजार आटोक्यात येतो. पण ही औषधे महाग आहेत व त्याचेही काही दुष्परिणाम आहेत.

दुसरी चांगली गोष्ट म्हणजे मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाप्रमाणे या रोगाची औषधे सतत किंवा कायम घेण्याची आवश्यकता नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अॅलोपॅथी, होमिओपॅथी किंवा आयुर्वेद यापैकी कुठलीही उपचार पद्धती केलीत तरी हा आजार परत उदभवू शकतो. पण तसे झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे स्वतःहून घेऊ नका. सोरियासिस आटोक्यात ठेवण्याची औषधे उपलब्ध असली तरी देखील जीवनशैलीतील बदल हाही तितकाच महत्वाचा आहे. आनंदी व सकारात्मक जीवनशैली, रागावर नियंत्रण, रोज काहीतरी एरोबिक व्यायाम करणे, योगासन, प्राणायाम, मेडीटेशन करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, मिताहार, चट्ट्यांवर रोज थोडे ऊन घेणे, अति तिखट, अतितेलकट, अति गोड पदार्थ टाळणे, जेवणा खाण्याच्या वेळा पाळणे, जागरण टाळणे, रोज कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणे व तंबाखू, सिगारेट, दारू या सवयी व व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहणे या गोष्टी आत्मसात करू शकलात तर सोरियासिस नक्की नियंत्रणात येऊ शकेल.