तोंडाला येणारी दुर्गंधी ही आपल्या समाजामधली एक लाजिरवाणी आरोग्य-समस्या आहे. पान-तंबाखु-गुटखा खाणार्या, धूम्रपान करणा-या माणसांबद्दल मी बोलत नसून सर्वसाधारण निर्व्यसनी लोकांबद्दल बोलत आहे. समाजामधील अर्ध्याहून अधिक लोकांच्या तोंडाचे आरोग्य व्यवस्थित नसते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.” आम्ही नियमितपणे दात घासतो, म्हणजे आमचे मौखिक-आरोग्य उत्तम आहे”, अशाच गैरसमजामध्ये लोक असतात.
मौखिक आरोग्याविषयीच्या लोकांच्या बेफिकीरीचा तोटा त्यांना स्वतःलाच होत असला तरी समाजामधील दोन घटक यामुळे खुश राहतात, एक दंतरोगतज्ज्ञ आणि दुसरे टुथपेस्ट्चे निर्माते. एवढ्या मोठ्या संख्येच्या देशामधील लोक आपल्या तोंडाच्या आरोग्याबद्दल निष्काळजी असतील तर त्याचा फायदा उठवायला व्यापारी पुढे सरसावणारच ना ! भारतीयांचे मौखिक आरोग्य बिघडण्यास तशी अनेक कारणे आहेत, मात्र आयुर्वेदिय पद्धतीने दंत धावन न करता आधुनिक टुथपेस्ट्सचा वापर हे त्यामागचे एक मुख्य कारण असावे अशी शंका येते.
मुळात आपले पूर्वज खैर, करंज, वड, उंबर, पिंपळ, कडूनिंब, बाभूळ, वगैरे झाडाची लहानशी काडी घेऊन ती चावूनचावून अधिक मृदु करुन त्याने आपले दात व हिरड्या साफ करायचे. कडू-तिखट व तुरट चवीच्या या वनस्पती आपल्या गुणांनीच तोंडामधील घातक रोगजंतुंचा नाश करायाच्या, हिरड्या सुदृढ करायच्या व दातांवरील इनॅमलला मजबूत ठेवायच्या. इतकंच नव्हे तर गोडाच्या सेवनाचे शरीरावर होणारे विविध दुष्परिणाम नियंत्रणात ठेवण्याचा तो प्रभावी उपाय होता. कडू-तिखट-तुरट चवीच्या त्या वनस्पतींची वास्तवात आजच्या स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या आजच्या समाजाला अधिक गरज आहे.
मात्र पुढे त्या झाडाच्या काडीची जागा ब्रशने घेतली . त्या ब्रशने दातांच्या फटींमध्ये अडकलेले कण सहज काढता येतात ,हे खरे. मग त्या ब्रशवर एखादे लोण्यासारखे मऊ क्रिम असले तर ब्रशने घासताना दात व हिरड्यांना इजा होणार नाही व दात घासणे सोपे जाईल या हेतूने पेस्ट आली. मग त्या टुथपेस्टमध्ये वेगवेगळी केमिकल्स मिसळली गेली. ज्यांचे फायदे कमी आणि तोटे जास्त असल्याचे पुढे पुढे लक्षात आले. पण तोपर्यंत टूथपेस्ट उत्पादकांचा धंदा चांगलाच वधारला होता, तो कसा बंद करणार? मग दातांसाठी फारशा उपयोगी नसलेल्या त्या टूथपेस्टने तोंड सुगंधी होते, असा प्रचार सुरू झाला , जो आज २१व्या शतकातही आपल्याला मूर्ख बनवत आहे !
खरं सांगायचं तर आजची टूथपेस्ट मौखिक आरोग्याकडे नाही, तर शरीर(म्हणजे तुमचे दात व तोंड) कसे आकर्षक भासेल, याकडे अधिक लक्ष देत असल्याने या टुथपेस्टला एक सौंदर्यप्रसाधनच म्हटले पाहिजे.
“दातांसाठी कोणती टूथपेस्ट चांगली?”, हा प्रश्न नेहमीच रुग्णांकडून डॉक्टरांना विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे…कोणतीही ! खरोखरच बाजारात उपलब्ध असणा-या टुथपेस्टच्या कपाटात हात घालून जी टूथपेस्ट तुमच्या हाताला लागेल ती टूथपेस्ट उचला आणि तीच योग्य आहे, असे समजून वापरा. कारण दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये टूथपेस्टची फारशी भूमिका नसतेच मुळी ! “आमच्या टूथपेस्टमध्ये हे आहे आणि आमच्या टुथपेस्टमध्ये ते आहे”, असे कितीही दावे उत्पादकांना करू देत, प्रत्यक्षात तुम्ही दात कसे घासता हे अधिक महत्त्वाचे असते .
सर्वसाधारण लोक बाथरुमच्या टाईल्स घासाव्या त्याप्रमाणे जोरजोरात टूथब्रश दातांवरुन खसाखसा याच पद्धतीने दात घासण्याचे कर्तव्य पार पाडतात व आपले दात स्वच्छ झाले असे समजतात. त्यामुळे दात स्वच्छ झाल्यासारखे वाटले तरी दातांवरचे इनॅमल त्यामुळे हळूहळू निघून जाते. प्रत्यक्षात समाजामधील शेकडा पन्नास लोकांना तरी दात कसे घासावे याचे शास्त्रीय ज्ञान नसते.
दात घासताना ब्रश दातांवरुन आडवा न फिरवता उभा ( वर-खाली) हळुवारपणे फिरवा. त्याशिवाय ब्रश दातांवरुन गोलाकार गतिने हळूवार फिरवणे, दातांच्या फटींच्या कडेने दात वर-खाली घासणे, दातांच्या फटींमधील अन्नाचे कण ब्रशच्या केसांनी प्रयत्नपुर्वक हळुवारपणे काढणे अशाप्रकारे दात घासायला हवे. दातांच्या चारही कोप-यातून ब्रश व्यवस्थित फिरवा. वरच्या रांगेतले मागचे दात व अगदी कोप-यातल्या दात आणियांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सकाळी व रात्री झोपण्यापुर्वी दात घासलेच पाहिजेत, तर मुलांनी सायंकाळीसुद्धा घासणे योग्य. महत्त्वाचं म्हणजे ब्रश दातांवर जोरात दाबू नका, अलगद फिरवा आणि हो, मऊ केसांचा ब्रश वापरा. आत म्हणजे टॉयेलटची टाईल्स नाही जी कडक केसांच्या ब्रशने कशीही घासता येईल. टुथपेस्टमधील केमिकल्सचे प्रमाण पाहता अगदी वाटाण्याच्या आकाराऐवढीच पेस्ट ब्रशवर घ्या, केमिकल्सविरहित वापरलीत तर उत्तम, पण दात नीट घासा आणि व्यवस्थित चूळा भरा.
रात्री झोपताना त्रिफळाच्या काढ्याने गुळण्या करा. सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे आठवड्यातून निदान एकदा कडुनिंबाची काडी चघळण्याची सवय लावा. इतकं केलंत तरी तुमचे दात आणि मौखिक आरोग्य तर सुधारेलच, पण परदेशी टुथपेस्टची खरेदी केल्याने रोजच्या रोज परकियांकडे जाणारा अब्जावधी रुपयांचा प्रवाहसुद्धा आटोक्यात येईल.