Perfect Heart Beats Per Minute & How To Measure: थंडीच्या दिवसांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असताना आपल्या हृदयाचे काम समजून घेणे हे अत्यावश्यक ठरत आहे. आपल्यापैकी अनेकजण हृदयाच्या गतीकडे नीट लक्ष देत नाहीत, खरं तर ही गती म्हणजेच हृदयाची धडधड अनेक समस्या समजून घेण्यास मदत करू शकते. हृदय गती म्हणजे काय तर किमान पाच लिटर रक्त पंप करण्यासाठी एका मिनिटात हृदय किती वेळा धडकते याचे मोजमाप. यालाच आपण कार्डियाक आउटपुट म्हणतो. साधारणपणे, आवश्यक रक्त पंप करण्यासाठी हृदयाचे एका मिनिटात ६० ते ७० ठोके पडतात किंबहुना तसे अपेक्षित आहे. पण हे ध्येय पूर्ण करण्यासाठी जर हृदयाला अधिक ठोक्यांची आवश्यकता असेल, असं म्हणूया मिनिटाला जर १०० पेक्षा जास्त ठोके पडत असतील तर तुमचे हृदय पूर्णपणे कार्यक्षम आहे असं म्हणता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाडी तपासून हृदयाच्या गतीचा अंदाज कसा घ्यावा?

विश्रांती करत असताना किंवा फार दगदग होत नसताना हृदयाची गती तपासण्यासाठी तुम्ही एक सोपी पद्धत वापरू शकता, ती म्हणजे. मनगट हलक्या हाताने दाबल्यावर एका मिनिटात नाडीचे बिट्स तुम्हाला किती वेळा जाणवतायत हे पाहणे. नाडीचा अंदाज तुम्हाला गळ्यापाशी, कोपराच्या व गुडघ्याच्या मागील बाजूस सुद्धा येऊ शकतो मात्र मनगट तपासल्यावर येणारा अंदाज अधिक स्पष्ट असतो. १५ सेकंदात बिट्स मोजून नंतर त्याचा चारने गुणाकार करून आपण हृदयाच्या गतीचा अंदाज घेऊ शकता. योग्य हृदय गती रेकॉर्ड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी लवकर, अगदी तुम्ही अंथरुणावरून उठण्याआधी नाडी तपासावी.

विश्रांती घेत असताना हृदयाची गती किती असावी?

हे तुमच्या आरोग्याच्या स्थितीवर, तंदुरुस्तीवर आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, प्रशिक्षित खेळाडू, ज्यांच्या हृदयात सहनशक्ती आणि पंपिंग क्षमता चांगली आहे, त्यांचे हृदय ४० ठोके प्रति मिनिटात रक्त पंप करण्याचे लक्ष्य साध्य करू शकतात. याचा अर्थ हृदयाची स्थिती चांगली आहे आणि स्थिर पंपिंग क्रिया चालू ठेवण्यासाठी त्याला जास्त मेहनत करावी लागत नाही.

परंतु जर तुम्ही शारीरिक दृष्टीने फार सक्रिय नसाल आणि तरीही तुमच्या हृदयाचे ठोके कमी असतील, तर तुम्ही हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, विशेषत: तुम्हाला अशक्त वाटत असल्यास वेळीच तज्ज्ञांशी चर्चा करावी. जर विश्रांती घेत असताना तुमच्या हृदयाची गती प्रति मिनिट १०० बीट्सच्या वर सातत्याने असेल, तर ही चिंताजनक बाब आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की विश्रांतीच्या वेळी जास्त असणारी हृदयाची गती कमी शारीरिक तंदुरुस्ती, उच्च रक्तदाब आणि शरीराचे अधिक वजन यांच्याशी संबंधित आहे.

वय, तणाव, चिंता, हार्मोनल असंतुलन, तुमची शारीरिक हालचालींची पातळी आणि औषधोपचार यासारख्या घटकांचा तुमच्या हृदयाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. काही औषधे तुमची विश्रांती स्थितीतील हृदयाची गती कमी करू शकतात (उदाहरणार्थ, बीटा ब्लॉकर्स), तर इतर औषधे ते वाढवू शकतात (उदाहरणार्थ, थायरॉईड औषधे).

हृदयाची गती जास्त म्हणजे किती असणे?

१०० बीट्स प्रति मिनिट (BPM) पेक्षा जास्त हृदय गतीमुळे टाकीकार्डिया होऊ शकतो. उपचार न केल्यास, टाकीकार्डियामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते, ज्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या, हृदय बंद पडणे, वारंवार मूर्च्छा येणे किंवा अचानक मृत्यू यांचा समावेश होतो. थकवा, चक्कर येणे, धडधडणे (तुमच्या हृदयाचे ठोके अचानक प्रचंड वाढणे) अशा लक्षणांकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. यानंतर तुमची पहिली चाचणी ईसीजी आणि इकोकार्डियोग्राम असावी.

हृदयाची गती व वय

अचूक हृदयाची गती वयानुरूप सुद्धा बदलायला हवी उदाहरणार्थ, प्रौढांसाठी, दर ६० ते १०० बीट्स प्रति मिनिट दरम्यान असावा. मुलांसाठी १००-१५० बीट्स प्रति मिनिट, एक ते तीन वर्षांच्या मुलांसाठी ७०-११० बीट्स प्रति मिनिट आणि १२ वर्षांच्या मुलांसाठी ५५-८५ बीट्स प्रति मिनिट असते.

हे ही वाचा << रात्री १०- ११ वाजता झोपत असाल तर जेवणाची योग्य वेळ कोणती? आहारतज्ज्ञांनी सोडवलं कोडं, जाणून घ्या पचनाचा फंडा

हृदयाची गती व व्यायाम

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हृदय हे इतर कोणत्याही स्नायूंसारखे असते आणि त्याने प्रभावीपणे कार्य करण्यासाठी नियमित शारीरिक हालचालींची आवश्यकता असते. तुमच्या हृदयाची स्थिती मोजण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे टॉक टेस्ट करणे. तुम्ही व्यायाम करताना किंवा सक्रिय असताना नीट न दमता बोलू शकत असाल तर तुमचे हृदय सुस्थितीत आहे असे म्हणता येईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to check heart beats at home ideal heart beats per minute why 100 is dangerous number signs of heart disease high bp svs
Show comments