जेव्हा आपण फळ खरेदीसाठी जातो तेव्हा आपल्यापैकी अनेकांना फळ पिकले आहे की नाही हे समजत नाही. पिकलेल्या फळांची चव चांगली असते आणि ती फळे तुमच्यासाठी अधिक पौष्टिक आणि फायबरयुक्त असू शकतात. असेच एक फळ म्हणजे डाळिंब. “जेव्हा डाळिंब खरेदी करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा ते पिकलेले आहे हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण- पिकलेले डाळिंबच चवीला चांगले लागते.” असे दिल्ली टेंपल स्ट्रीट, शेफ बबेंद्र सिंग, यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
डाळिंब का खावे?
उन्हाळ्यात डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. कारण- ते पौष्टिकतेने आणि सी, ई, के या जीवनसत्त्वांनी, तसेच फोलेट व पोटॅशियमने समृद्ध असते. डाळिंबाचे पॉलीफेनॉल शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात. ते दाह किंवा सूज कमी करतात आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. डाळिंबाचा रस रक्तप्रवाह सुधारू शकतो आणि त्याच्या दाहकविरोधी गुणधर्मांमुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखण्यास मदत करतो,” असे न्यूट्रसी लाइफस्टाईलच्या पोषणतज्ज्ञ व संस्थापक डॉ. रोहिणी पाटील यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितले.
डाळिंबातील फायबर जळजळ कमी करून, पचनास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य जपण्यास मदत करते. जे IBS (इन्फ्लेमेटरी बोवेल सिंड्रोम) आणि Crohn’s disease यांसारख्या परिस्थितींसाठी फायदेशीर आहे. काही संशोधन अहवालांमध्ये असे सुचविले आहे, ‘डाळिंब स्मरणशक्ती वाढवू शकतात.’ त्याव्यतिरिक्त, संशोधन असे सूचित करते की, ‘डाळिंबाच्या रसाचे दररोज सेवन केल्याने प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी होऊ शकते.’ व्यायामापूर्वी डाळिंबाचा रस प्यायल्याने स्नायूंना ऑक्सिजनची पातळी सुधारून थकवा कमी होण्यास मदत होते,” असे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
हेही वाचा – तुम्ही फक्त ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेले अन्न खाता का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो माहित्येय का?
डाळिंबाचा आहारात समावेश कसा करावा?
तुमच्या उन्हाळ्याच्या आहारात सॅलड, स्मूदीज किंवा विविध पदार्थांवर सजावट म्हणून पिकलेले डाळिंबाचे दाणे वापरू शकता. डॉ. पाटील सांगतात, “तुम्ही त्यांच्या या ताज्या रसाळ डाळिंबाच्या चवीचा आनंद घेऊ शकता आणि त्यांचे असंख्य आरोग्य फायदे मिळवू शकता.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत शेफ दिव्या बुटानी यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत ज्या तुम्हाला योग्य डाळिंब निवडण्यात मदत करू शकतील.
उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे ओळखावे?
डाळिंबाचा आकार तपासा- पिकलेले डाळिंब निवडताना ते षटकोनी आकाराचे असावे; ज्यात त्याच्या कडा स्पष्टपणे दिसतात. जे पिकलेले नाही ते गुळगुळीत आणि गोलाकार असेल; ज्यामध्ये कोणतीही कडा स्पष्टपणे दिसणार नाही, असे बुटानी यांनी नमूद केले.
बुटानी सांगतात, “डाळिंबाचे वजन तपासले पाहिजे. सर्व रसदार बियांचे डाळिंब असेल, तर ते जड असते आणि नसेल, तर ते पिकलेले नसते. डाळिंब निवडताना त्याचे वजन आणि आवरणाच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करा.”
“डाळिंब त्याच्या आकारासानुसर जड वाटले पाहिजे. असे डाळिंब आतून रसदार बिया असल्याचे दर्शवते. तसेच, त्याचो बाह्य आवरण गुळगुळीत असावी,” असेही शेफ सिंग सांगतात.
बुटानी यांच्या मते- डाळिंबाचा आवाज तपासला पाहिजे. बुटानी सांगतात, “जेव्हा तुम्ही डाळिंब ठोकून बघता तेव्हा ते बियांनी भरलेले असेल, तर भरीव आणि कमी बिया असल्यास पोकळ आवाज येईल.