How To Control Diabetes Sugar level: व्यायाम हा प्रत्येकासाठीच आवश्यक आहे, परंतु जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही व्यायामाला विशेेष महत्त्व दिलं पाहिजे. तुमची रक्तातील साखर कमी करण्याव्यतिरिक्त, व्यायामामुळे रक्तदाबही कमी होतो. तसेच चांगल्या झोपेसाठीही व्यायामाची मदत होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना व्यस्त जीवनशैलीमुळे वेळ काढणे कठीण होते, परंतु व्यायामाला पर्याय नाही. त्यामुळे कितीही व्यस्त असाल तरी काहीवेळ व्यायामाला दिलाच पाहिजे.
डायबिटीस ही सध्या अतिशय मोठी समस्या झाली आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना डायबिटीस असतो. एकदा डायबिटीस मागे लागला की तो नियंत्रणात ठेवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. कारण डायबिटीस ही शरीरात अतिशय हळूवारपणे पसरणारी समस्या आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर विविध अवयवांवर त्याचा परिणाम होतो आणि शरीरिक गुंतागूंत वाढत जाते. म्हणूनच साखर नियंत्रणात ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे पाच प्रकारचे व्यायाम सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवू शकता.
आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही व्यायामांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
एरोबिक व्यायाम : एरोबिक स्वरूपाचे व्यायाम किंवा कार्डिओ व्यायाम, मधुमेह आणि प्री-डायबेटिस परिस्थितींमध्ये फायदेशीर आहेत. या व्यायामांमध्ये होणाऱ्या तालबद्ध हालचाली हृदयाची गती वाढवतात आणि श्वाच्छोसश्वास सुधारतात. ज्यामध्ये जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणे समाविष्ट असू शकते. एरोबिक व्यायामामुळे प्रतिकारशक्ती वाढते, शिवाय वजन कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते. एरोबिक व्यायाम तुम्ही घरात किंवा घराबाहेर दोन्ही ठिकाणी केले जाऊ शकतात. जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी आठवड्यातून किमान १५० मिनिटे एरोबिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
योग : संशोधनातून असे दिसून आले आहे की, योगासने आणि प्राणायाम मधुमेह व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रक्तातील साखरेची पातळी कमीदेखील करतात. काही आसनांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.
त्रिकोनासन, ताडासन, सुखासन, पद्मासन, मंडुकासन, भस्त्रिका प्राणायाम, अर्धमत्स्येंद्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, वज्रासन आणि धनुरासन यासारखी विशिष्ट योगासने मधुमेहासाठी फायदेशीर आहेत.
सूर्यनमस्कार : सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. त्यामध्ये पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो. सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या संपूर्ण शरीराची स्थिती सुधारते. हे तुमच्या स्नायूंसाठी फायदेशीर आहे. मणक्याचे दुखणे, मानदुखी आणि पाठदुखीपासूनही आराम मिळतो. दररोज सूर्यनमस्कार केल्याने मणक्याचे संरेखनदेखील सुधारते, ज्यामुळे शरीराची मुद्रा चांगली राहते. लवचिकतादेखील वाढते आणि स्नायू मजबूत आणि चांगल्या स्थितीत दिसतात. सूर्यनमस्कार करताना श्वासोच्छ्वासावर विशेष लक्ष द्यावे लागते. प्रत्येक स्थितीत दीर्घ श्वास घ्यावा लागेल आणि हळूहळू श्वास सोडावा लागेल. यामुळे तुमचे फुफ्फुस मजबूत होते आणि तुमच्या फुफ्फुसाची क्षमताही वाढते.
स्ट्रेंथ ट्रेनिंग : स्ट्रेंथ ट्रेनिंग हा एक प्रकारचा शारीरिक व्यायाम आहे, जो स्नायूंच्या वाढीसाठी, चयापचय सुधारण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. हे ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना स्नायू कमकुवत होणे, ऑस्टिओपोरोसिस आणि वजन वाढणे यासारखे वृद्धत्वाचे परिणाम टाळण्यास मदत करू शकते. यामुळे पोश्चर, संतुलन, गतिशीलता आणि आत्मविश्वासदेखील सुधारू शकते. मधुमेह आणि पूर्व-मधुमेह असणाऱ्यांसाठी या प्रकारचा व्यायाम खूप फायदेशीर आहे.
हेही वाचा >> कितीही काम असू दे, स्वतःच्या आरोग्याची हेळसांड नको; आहारात करा या पाच पदार्थांचा आवर्जून समावेश
उच्च-तीव्रता व्यायाम : यामध्ये थोड्या काळासाठी तीव्र व्यायाम आणि त्यानंतर विश्रांतीचा कालावधी समाविष्ट असतो. कॅलरी बर्न करण्याचा आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. तथापि, दुखापत टाळण्यासाठी हळूहळू सुरुवात करणे आणि हळूहळू तयार होणे महत्त्वाचे आहे. उदाहरण म्हणजे धावणे, सायकल चालवणे किंवा बॉडीवेट व्यायाम. हा व्यायाम मधुमेह आणि पूर्व-मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरू शकतो.
हे व्यायाम प्रकार किमान आठवड्यात पाच दिवस, दिवसातून ३० मिनिटे केल्याने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करू शकता.