मेथी हा एक उत्तम औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. मेथी चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बहुतांश घरांमध्ये मेथीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. याशिवाय मेथीच्या बियांचादेखील विविध पदार्थांमध्ये वापर केला जातो. विशेषत: हिवाळ्यात मेथीच्या बियांपासून लाडू बनवले जातात.याच मेथीच्या फायद्याविषयी मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे एचओडी आणि आहारतज्ज्ञ डॉ. इलीन कॅंडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेथीच्या बियांमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी ६ सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समृद्ध स्रोत आहे, यामुळे शरीरात निरोगी ऊर्जा पातळी राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते, तसेच त्वचा आणि केसांचे आरोग्य राखण्यास मदत होते. मेथी फ्लेव्होनॉइड्ससारख्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, ज्या शरीराला फ्री रॅडिकल्सचे होणारे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास आणि हृदयरोग, कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

पण, जीवनशैलीत निरोगी बदल करण्याच्या नादात तुम्ही मेथीचे अतिसेवन करत तर नाही ना याबाबत काळजी घ्या, तुम्ही मनाप्रमाणे काहीही करू नका, मेथी तुमच्या आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे हे लक्षात घेऊन त्याचे सेवन करा. अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

मेथीचे फायदे

मेथी खाण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होते. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये मेथीच्या सेवनामुळे इन्सुलिनची पातळी सुधारून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जेवणापूर्वी मेथीचे सेवन केल्याने टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.

मेथीच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. मेथीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे आतड्यांसंबंधी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये अशी काही संयुगे असतात, जी पाचक एन्झाईम्सचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. यामुळे गॅसची समस्या कमी होते.

यामुळे पचनासंबंधित आजार आणि आतड्यांसंबंधी रोग (IBD) कमी करण्यास मदत होते. मेथी कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतात. यामुळे गरोदर मातांमध्ये दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी, सीरम कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

मेथी शरीरासाठी फायदेशीर असली तरी त्याचे जास्त सेवन करू नये, काही लोकांनी खरोखर मेथीचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. परंतु, एखाद्या व्यक्तीने मेथीचे किती प्रमाणात सेवन केले पाहिजे, याबाबत ठोस उत्तर देता येणार नाही. कारण मेथी ही बिया, ताजी पाने, वाळलेली पाने, चूर्ण फॉर्म, अर्क किंवा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही मेथी ज्या स्वरूपात वापरणार आहात त्यानुसार त्याचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे.

निरोगी व्यक्तींसाठी मेथीच्या बियांची पावडर दिवसातून दोनदा ८ ते १० ग्रॅम खाण्याची शिफारस केली जाते. परंतु, तुम्ही कोणत्याही प्रकारे मेथीचे सेवन करत असाल तरी आहारतज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

मेथीची शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीमवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अतिसार, गॅस आणि सूज येणे आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. मेथीच्या अतिरिक्त सेवनामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणात घट होऊ शकते. याशिवाय काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते, विशेषत: ज्यांना शेंगदाणे किंवा सोयाबीनची ॲलर्जी आहे. औषधी वनस्पतींबरोबर मेथीचा अतिवापर केल्यामुळे यकृतासंबंधित समस्या उद्भवण्याचीही शक्यता फार असते.

गर्भवती महिलांनी मेथीचे दाणे आणि कॉन्सन्ट्रेट्सचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण यामुळे गर्भाशयातील कार्यावर परिणाम होऊ शकते आणि अकाली प्रसूतीचा धोका वाढवू शकतो. मुलांना पूरक आहार म्हणून मेथी खायला देऊ नये. मेथीचे किती सेवन करावे याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, हेल्थकेअर प्रोफेशनल आणि योग्य आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

एकूणच, मेथी ही एक औषधी पदार्थ असल्याने त्याचे विविध प्रकारे आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु, याच्या सेवनानंतर कोणत्याही आरोग्यदायी समस्यांपासून वाचायचे असेल तर त्याचे कमी प्रमाणात सेवन करणे आणि आहारातज्ज्ञांनी सुचवलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

सप्लिमेंटेशन रूटीन बनवण्यापेक्षा तुम्ही रोजच्या आहारात मेथीचा वापर करा. दह्याची कढी बनवताना त्यात मेथीचे दाणे वापरू शकता. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवत त्यातील पाणी पिऊ शकता. मेथीच्या ताज्या पानांचा उपयोग तुम्ही पुलाव, पराठे, थेपला, मुठया आणि खाखरा बनवण्यासाठी करता येतो. तर मेथीच्या वाळलेल्या पानांचा वापर करी, सूप, भाज्यांमध्ये मसाला म्हणून केला जाऊ शकतो. मेथीच्या बिया अनेक चहा, इन्फ्यूजन, मॅरीनेड्स, सॉस आणि करी पावडर आणि गरम मसाला यांसारख्या मसाल्यांच्या मिश्रणाचा एक विशिष्ट घटक आहेत, ज्याचा वापर पदार्थांना चव येण्यासाठी केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to have fenugreek or methi in safe amounts for blood sugar heart disease how much fenugreek is safe sjr
Show comments