Heat Stroke Or Food Poisoning : सध्या पावसाला सुरुवात झाली असली तरीसुद्धा अधूनमधून तापमानाचा पारा वाढल्याचे दिसून येते. खरं तर भरउन्हात घराबाहेर पडताना आपण खूप काळजी घेतो; पण तुम्हाला माहीत आहे का, अतिउष्णतेमुळे आपल्या पचनक्रियेवर परिणाम होतो. डिहायड्रेशन, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलित होणे आणि आहारात होणारे बदल यांमुळे आतड्यांचे आरोग्य बिघडते; ज्यामुळे उष्माघातच नाही, तर अन्नामधून विषबाधाही होऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उष्माघात आणि अन्न विषबाधा यातील फरक कसा ओळखायचा? दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

उष्माघात की अन्न विषबाधा; फरक कसा ओळखावा?

“उष्माघात आणि अन्न विषबाधा यांतील फरक ओळखण्यासाठी वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे आहे”, असे दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीनचे संचालक डॉ. राजीव गुप्ता सांगतात.

उष्माघाताच्या लक्षणांमध्ये शरीराचे तापमान वाढते, मानसिक स्थिती बदलते, त्वचा कोरडी पडते; ज्यामुळे घाम येत नाही. हृदयाचे ठोके वाढतात आणि काही प्रकरणांमध्ये व्यक्ती बेशुद्धसुद्धा पडू शकते.
अन्न विषबाधेमध्ये व्यक्तीला मळमळ वाटणे, उलटी होणे, अतिसार, ओटीपोटात दुखणे किंवा क्वचित प्रकरणात ताप येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

हेही वाचा : आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ५ पदार्थ? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या

उष्माघात आणि अन्न विषबाधा अशा दोन्ही परिस्थितींत व्यक्तीला डिहायड्रेशन होऊ शकते. डॉ. गुप्ता सांगतात, “उष्माघातामध्ये शरीराचे तापमान वाढते; पण व्यक्तीला घाम येत नाही. हे लक्षण अन्न विषबाधा झाल्यानंतर दिसून येत नाही.”

उष्माघात आणि अन्न विषबाधेचा धोका कोणाला जास्त असतो?

“लहान मुले, वृद्ध लोक, हृदयाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्ती, श्वासाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्ती, यकृताचे आजार असलेल्या व्यक्ती इत्यादी लोकांना उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका जास्त असतो. या लोकांमध्ये उष्णतेचा सामना करण्याची क्षमता कमी असते; ज्यामुळे त्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो”, असे डॉ. गुप्ता सांगतात

हेही वाचा : वयाच्या पंचविशीनंतर दुधात पाणी मिसळून का प्यावे? तज्ज्ञांनी केला खुलासा

उष्माघात आणि अन्न विषबाधा होण्यासून स्वत:ला कसे वाचवायचे?

जास्तीत जास्त द्रवपदार्थ प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा.
जेव्हा कमी ऊन असेल तेव्हाच घराबाहेर पडा.
हलके कपड्यांचा वापर करा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावा.
आजारी आणि वृद्ध लोकांची नियमित तपासणी करा. त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्या.