डॉ. जाह्नवी केदारे, मनोविकारतज्ज्ञ
‘जे.ई.ई. चा रिझल्ट लागल्यापासून सुशांत अगदी गप्प गप्प झाला आहे. मला खूप काळजी वाटते त्याची’, सुशांतची आई सांगत होती.’ प्राची आईला म्हणाली, ‘आई, मला बरं वाटत नाही. मला डॉक्टरकडे घेऊन चल.’ आईने चौकशी केली,
‘काय होतंय? कुठे दुखते खुपते आहे का? ताप वगैरे येतो का?’ प्राची म्हणाली. ‘हो, माझे मन दुखतंय, ते आजारी पडलंय असं मला वाटतं.’ आईला काही कळेचना. पण थोडा विचार करून ती प्राचीला माझ्याकडे घेऊन आली.
असाच शंतनुचा फोन आला, ‘अगं, हल्ली माझी आई थोडं थोडं विसरायला लागली आहे. सुरुवातीला मला काही विशेष वाटले नाही. ८२ वर्षांची झाल्यावर थोडेसे विस्मरण येणे स्वाभाविक आहे, नाही का? पण अग, काल ती परकराला शिवण कशी घालायची ते लक्षात येत नाही म्हणाली! मला भयंकर आश्चर्य वाटलं. हे काय आहे? डिमेन्शिया वगैरे तर नाही ना?’
हेही वाचा >>> Health special: नेटफ्लिक्सवरील मालिकांचा आणि डोपामिन व व्यसनाचा काय संबंध?
‘इतका गोड आहे सुजाताचा मुलगा! पण एक क्षण स्थिर बसत नाही, सारखा गोल गोल फिरत असतो स्वतःभोवती. काय भानगड आहे कळत नाही.’
असे अनेक प्रश्न घेऊन येणारे सगळेजण खरं तर विचारत असतात, ‘हा मानसिक आजार तर नाही?’ आपल्याकडे वाढत चाललेल्या सजगतेचे हे लक्षण आहे. माझे ‘मन दुखतंय’ म्हणणारी प्राची असेल, सुशांतच्या काळजीने त्याच्याविषयी चौकशी करणारी त्याची आई असेल, किंवा आपल्या आईचे विस्मरण हे डिमेन्शियाचे लक्षण आहे असा विचार करणारा शंतनू असेल यांचे आपल्या जवळच्या व्यक्तीकडे सूक्ष्म लक्ष आहे आणि मदत घेण्याची तयारी आहे.
सगळ्याना जाणून घ्यायचे आहे, नॉर्मल काय नि ॲबनॉर्मल काय? वागण्यातला तात्पुरता बदल की मानसिक विकार?
‘देवराई’ चित्रपटातल्या नायकाला मनोरुग्ण म्हणणे सोपे वाटते, कारण त्याचे वागणे सगळ्यांपेक्षा अतिशय भिन्न आहे, विचित्र आहे, अनपेक्षित आहे आणि त्याच्या मनातले विचार, विश्वास हे प्रत्यक्षात खरे नाहीत हे लगेच लक्षात येते. त्याच्या वर्तणुकीचा, रागावण्याचा, गप्प बसण्याचा, काही न करण्याचा इतरांना त्रास होतो. एका कर्तृत्ववान तरुण मुलाच्या आयुष्याची घसरण झालेली लगेच समजते. त्याला ‘स्किझोफ्रेनिया’ हा मानसिक आजार झाला आहे, असे सांगितले तर सहज पटते.
हेही वाचा >>> Health special: ऊन वाढले की, शरीरात नेमके कोणते व कसे बदल होतात?
सगळ्यांच्या मनात ज्या भावना निर्माण होतात, आनंद, चिंता, दुःख त्याच भावना जेव्हा तीव्र स्वरूपात, सलग काही काळपर्यंत मनात राहतात, त्यांच्यामुळे एखाद्याच्या दैनंदिन आयुष्यावर, सामजिक नातेसंबंधांवर आणि कामकाजावर विपरीत परिणाम होतो तेव्हा या दुःखाच्या अनुभवाचे रुपांतर उदासीनतेच्या (डीप्रेशन) आजारात होते. जेव्हा अचानक किंवा दिवस भर छातीत धडधडते, दरदरून घाम फुटतो, हात पाय गारठतात आणि थरथरायला लागतात, असे रोज काही दिवस होत राहते आणि कशात लक्षच लागू शकत नाही तेव्हा अतिचिंता(अॅन्झायटी डिसॉर्डर) असलेला विकार झाला असे म्हटले जाते.
व्यवस्थितपणा, टापटीप, स्वच्छता हे खरे तर चांगले गुणधर्म. पण तेच जेव्हा अतिरेकी प्रमाणाबाहेर वाढतात आणि पुन्हा पुन्हा हात धुणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच त्याचा त्रास होऊ लागतो, तेव्हा मंत्रचळ (ऑब्सेसिव्ह कम्पल्सरी डिसॉर्डर) झाला आहे असे निदान करावे लागते. विचार, भावना आणि वर्तणूक यांचे सर्वसाधारणपणे संतुलन असते. मनातल्या विचारांवर योग्य वेळी आपण लगाम घालतो. ‘कित्येक दिवस सासूबाईंचे आजारपण सुरू आहे. इतके टेन्शन असते. पण कामात व्यग्र राहिले किंवा थोडा वेळ टीव्ही बघितला तरी मन रमते. नाहीतर सतत विचार, विचार.’ असे मार्ग आपण सगळेच शोधतो. शिक्षक रागावले की त्यांचा राग येतो. वर्गाबाहेर गेल्यावर मनातला राग व्यक्त करण्यासाठी दप्तर टाकून देऊ, पण शिक्षकांच्यासमोर गप्प बसण्याचा संयम दाखवतोच आपण.
हेही वाचा >>> Health special: तृणधान्ये कोणती एकत्र करावीत? कोणती करू नयेत?
विचारांवर नियंत्रण राहिले नाही, की मंत्रचळ झाल्यावर एकच विचार पुनः पुनः मनात येत राहतो. मग अशा व्यक्तीला सतत मनात शंका येते, आजूबाजूचे वातावरण दूषित तर नाही ना, माझ्या हाताला काही घाण तर लागली नाही ना? अशा विचारांच्या अतिरेकाचा परिणाम प्रचंड चिंता, भीती निर्माण होण्यात आणि एकच कृती उदा. हात धुण्याची, जमीन पुसण्याची, परत परत करण्यात होतो. उदासीनतेच्या (डीप्रेशन) आजारात मनात अतीव उदासपणा, दुःख असते, त्याच बरोबर मनात निराशेचे विचार असतात, काही करण्यात रस वाटत नाही. अशा प्रकारे विचार-भावना- वर्तणूक यांच्या संतुलनाचा त्रिकोण जेव्हा दुभंगतो, तेव्हा मानसिक संतुलनाला छेद जातो. ही स्थिती म्हणजे मानसिक विकार! या मनोविकारांचे विविध पैलू आहेत, वेगवेगळे स्वरूप आहे, विभिन्न निदाने आहेत, अनेक कारणे आहेत आणि अनेकानेक प्रकारचे उपचारसुद्धा आहेत. म्हणूनच कोणी तज्ज्ञ व्यक्तीने मनोविकार असल्याचे निदान करणे आणि उपायांची योजना करणे महत्त्वाचे!