How to improve your sleeping: थकवा नाहीसा करण्यासाठी प्रत्येकजण ठराविक काळासाठी विश्रांती घेत असतो. मनुष्याला निरोगी राहण्यासाठी किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असते. असे न झाल्यास त्याच्या परिणाम शरीरावर व्हायला लागतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना निरनिराळ्या समस्यांनी ग्रासलेले आहे. ताणतणाव, टेंशन अशा काही मानसिक समस्यांचा परिणाम आपल्या निद्रेवर होत असतो. तर काही वेळेस सकस आहार न घेतल्याने झोप लागत नाही. झोपेशी संबंधित निद्रानाशासारखे आजार देखील गेल्या काही वर्षांमध्ये बळवले आहेत. शांत झोप यावी यासाठी काही सोपे उपाय करता येतात.
मेलाटोनिन बूस्ट करणारे पदार्थांचे सेवन करा.
मेलाटोनिन हे मानवी शरीरातील एक हार्मोन आहे. रात्रीच्या वेळी या हार्मोनचे उत्पादन होत असते. झोप लागण्यासाठी मेलाटोनिन हार्मोनची मदत होत असते. काही ठराविक पदार्थांमुळे मेलाटोनिन बूस्ट होत असते. दूध, दुग्धजन्य पदार्थ. चिकन, अंडी, मासे यांमध्ये ट्रिप्टोफॅन (Tryptophan) हे अमिनो अॅसिड आढळले जाते. हे अमिनो अॅसिड शरीरातील सेरोटोनिनच्या सूत्राचे महत्त्वपूर्ण घटक आहे. सेरोटोनिनचे कालांतराने मेलाटोनिनमध्ये रुपांतर होत असते. त्यामुळे पास्ता, ब्रेड, बटाटे अशा ट्रिप्टोफॅनयुक्त पदार्थांचा समावेश आहारामध्ये असणे फायदेशीर ठरु शकते. याने झोप लागण्यास मदत होईल.
मध्यरात्री काहीही खाणे टाळावे.
काहीजणांना रात्री-अपरात्री उठून काहीही खाण्याची सवय असते. यामुळे शरीराला एक विशिष्ट सवय लागते आणि त्याने मध्यरात्री भूक लागू शकते. असे दररोज होत असल्यास झोपमोड होऊ शकते. पुढे जाऊन निद्रानाश देखील उद्भवू शकतो. भविष्यामध्ये त्रास होऊ नये यासाठी मध्यरात्री उठून खाण्याची सवय सोडून द्यावी. यासाठी काही दिवस लागू शकतात.
रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नका.
जेवण केल्यानंतर पचनक्रियेला सुरुवात होत असते. खाल्लेले अन्नपदार्थ पचण्यासाठी ठराविक कालावधी जावा लागतो. बऱ्याचजणांना जेवल्या-जेवल्या झोपायची सवय असते. या सवयीमुळे पचनक्रिया व्यवस्थितपणे पूर्ण होण्यास अडचणी येतात. याने वजन वाढणे, लठ्ठपणा अशा समस्या संभावतात. रात्री जेवल्यानंतर झोपायचा प्रयत्न केल्याने शांत झोप लागत नाही. याने निद्राचक्र बिघडते आणि अधिकचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळावे किंवा झोपायच्या वेळेच्या काही तासांपूर्वी जेवण करावे.
झोपण्याआधी एक ग्लास दूध प्यावे.
शरीराच्या स्लीप हार्मोनला उत्तेजना देण्यासाठी दूध प्यायले जाते. दूधामध्ये असलेल्या तत्वांमुळे विश्रांती घेण्यास मदत होते. याच्या सेवनाचे इतर फायदेही आहेत. सकस आहार घेतल्यानंतर दूधाचे सेवन केल्यास निद्राचक्र सुधारले जाते. झोपण्याआधी एक ग्लास दूध घेतल्याने काही कालावधीनंतर मेंदूमध्ये स्लीप हार्मोन म्हणजे मेलाटोनिनचे उत्पादन व्हायला सुरुवात होते. यामुळे ताणतणाव, चिंता देखील दूर होऊ शकतात असे म्हटले जाते.
आणखी वाचा – पुरुष नपुंसक होण्याचं प्रमाण का वाढतंय? लठ्ठपणा तर कारणीभूत नाही…
सुका मेवा आहारात समाविष्ट करावा.
बदाम, खारीक, पिस्ता, काजू असा सुका मेवा खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक यांसारख्या घटकांचा समावेश असतो. पचनक्रियेसाठी या पदार्थांची मदत होते. यांच्या सेवनामुळे मेंदूमध्ये मेलाटोनिनचे प्रमाण वाढते असे म्हटले जाते. निद्राशक्ती वाढवण्यासाठी सुका मेवा खाण्याचा सल्ला डॉक्टर्स देखील देतात. सकाळी उठल्यावर/ सायंकाळी नाश्ता म्हणून काजू, बदाम खाल्याने रात्री झोप लागण्यास मदत होते.