पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, पण पावसासोबत काही संसर्गही येतात. त्यामुळे या ऋतूत स्वत:ला निरोगी ठेवणे हे एक आव्हान असते. पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढतात. कधी कधी डोळ्यात घाण पाणी आल्याने इन्फेक्शन आणि डोळे लाल होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. डोळे सर्वात संवेदनशील आणि नाजूक असतात त्यामुळे त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश पवार यांनी पावसाळ्यात डोळ्याची काळजी घेण्याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या जाणून घेऊया.
पावसाळ्यामध्ये एकूणच आजारांचे प्रमाण वाढलेले असते. पाणी आणि पाण्यापासून होणारे आजार उद्भवतात. यात डोळ्यांमध्ये जंतूचा संसर्ग होऊन डोळे येणे, डोळे लाल होणे, खाजणे इत्यादी लक्षणे उद्भवतात.
- यासाठी डोळ्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्यास पुन्हा डोळे साध्या पिण्याच्या पाण्याने धुवावेत.
- डोळ्यांत चिकटपणा, घाण येत असल्यास मात्र नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आणि वेळेतच योग्य तो औषधोपचार करावा.
- पावसाळ्यामध्ये पापण्यांवर रांजणवाडीचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात येते. रांजणवाडी झाल्यास कोमट पाण्यात कापूस किंवा स्वच्छ कापड बुडवून त्या गरम कापसाने रांजणवाडीची गाठ शेकावी.
हेही वाचा – Health special: डोळा आळशी का होतो?
- त्याचप्रमाणे इतर कोणतेही घरगुती उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधे वापरावीत.
- पावसाळ्यात जंक फूड खाण्याची इच्छा होत असली तरी सकस आहार घ्यावा. कारण रस्त्यावरचे पदार्थ अपायकारक असू शकतात.
- डोळ्यांचा मेकअप टाळा कारण पावसाळ्यात संसर्गांसाठी तो उत्प्रेरक ठरु शकतो.