किडनीचे म्हणजेच मूत्रपिंडाचे वेगवेगळे आजार होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. हृदयरोगाप्रमाणेच कमी वयातच आता किडन्यांचे आजारही गाठत आहेत. किडनी हा शरीरातील एक लहानसा अवयव होय; पण तो आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. किडनी निकामी होण्याची समस्या गेल्या काही वर्षांत प्रमाणात अधिक दिसून येत आहे. किडनीचा आजार जितका धोकादायक आहे, तितकाच हा आजार उशिरा ओळखला जातो,.त्यामुळे किडनीची थोडीशी समस्यादेखील किडनी पूर्णपणे खराब होण्याचे कारण बनते. जर तुम्हाला तुमची किडनी खराब होऊ द्यायची नसेल, तर तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कर्मा आयुर्वेदाचे संस्थापक व संचालक डॉ. पुनित यांनी किडनीच्या आरोग्याला चालना देण्यासाठी सात आयुर्वेदिक औषधी वनस्पतींविषयी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूत्रपिंडाचे कार्य वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती

१. कोथिंबीर

कोथिंबीर आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. कोथिंबिरीमध्ये असलेल्या पोषण तत्त्वांमुळे किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकते. कोथिंबिरीच्या वाळलेल्या बिया म्हणजे धणे आणि पाने दोन्ही मूत्रपिंडासाठी अनुकूल औषधी वनस्पती म्हणून वापरली जाऊ शकतात. हा लघवीचे प्रमाण वाढविणारा पदार्थ असल्याने, तो शरीराला अतिरिक्त सोडियम आणि पाणी बाहेर काढण्यास मदत करतो. त्यामुळे ज्यांना किडनीचे आजार आहेत, अशा लोकांनी त्यांच्या आहारात कोथिंबिरीचा समावेश जरूर करावा.

(हे ही वाचा: रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ ४ आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा; फक्त तज्ज्ञांकडून सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या  )

२. तुळस

तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म असतात. तुळशीमुळे चयापचय वाढवून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत मिळते. तुमच्या नित्यक्रमात तुळशीचा समावेश करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुमच्या नेहमीच्या चहामध्ये दोन पाने वापरणे किंवा पाण्यात उकळून दिवसभर ते पाणी पिणे.

३. पुनर्नवा

ही वनस्पती किडनीच्या आजारांवर प्रभावी आहे. पोटॅशियम नायट्रेट, क्लोराईड नायट्रेट व क्लोरेट पुनर्नवा वनस्पतीमध्ये आढळतात. या औषधी वनस्पतींचे सेवन, आहार आणि व्यायामाने रोगाच्या वाढीचा वेग कमी करता येतो. लक्षणे दूर होऊ शकतात. ही एक उत्कृष्ट दाहकविरोधी आणि लघवीचे प्रमाण वाढविणारी औषधी वनस्पती आहे.

४. गोखरू

गोखरू ही एक आयुर्वेदिक औषधी आहे; जी ट्रिब्युलस टेरेस्ट्रिस नावाने ओळखली जाते. ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती चयापचय क्रियांच्या दोन्ही पैलूंना चालना देण्यास मदत करते. ही एक लघवीचे प्रमाण वाढविणारी औषधी वनस्पतीही आहे; ज्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते.

(हे ही वाचा: हिमोग्लोबीन वाढविणारे बीट ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक; तुम्हाला आहेत का असे त्रास? )

५. आले

आले त्याच्या दाहकविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. आले किडनीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. आले किडनी, तसेच यकृतामधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. हे दैनंदिन चहामध्ये सहजपणे किसून घेतले जाऊ शकते.

६. लसूण

लसूण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात; जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. लसणामध्ये सोडियम, पोटॅशियम व फॉस्फरसचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आपली किडनी निरोगी राहण्यास खूप मदत होते.

७. हळद

हळद ही शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी करू शकते. हळदीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात; जे आजारांशी लढण्यासाठी खूप मदत करतात. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे एक संयुग असते; ज्यामध्ये मजबूत दाहकविरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. किडनीला होणारा संसर्ग, तसेच मूत्रमार्गाला होणारा संसर्ग आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी हळद उपयुक्त ठरते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to keep your kidneys healthy seven ayurvedic herbs to boost kidney health pdb
Show comments