How to Pick a Perfect Mango: उन्हाळा आला की सर्वांची मजा असते, ती सगळं काही विसरून आंबे खाण्याची. संधी मिळेल तेव्हा आंब्यावर ताव मारला जातो. आंबा हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे सर्वात लोकप्रिय फळ आहे आणि बहुधा लोकांचेही आवडते फळ आहे. आंब्याचा गोडवाच असा आहे की, आंबा त्याच्या गोडव्यामुळे आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे फळांचा राजा मानला जातो. बाजारात आंबा विकायला येताच तो खरेदी करण्यासाठी सगळ्यांची झुंबड उडते. पण, आंबे विकत घेताना अनेकांची गल्लत होते. कृत्रिम रसायने, पावडर वापरून पिकवलेले आंबे बाजारात आले आहेत त्यामुळे रसदार आणि पूर्णत: गोड पिकलेले आंबे विकत घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. अशाप्रकारचे आंबे कसे ओळखायचे याबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) आणि डॉक्टरांनी टिप्स दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
आंबे विकत घेण्यासाठी उन्हाळ्याचा हंगाम सर्वांत चांगला, कारण त्याच वेळेस नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे बाजारात येत असतात. परंतु, आता याचदरम्यान कृत्रिम आणि रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे बाजारात मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आंबे खरेदी करताना ते नैसर्गिकरीत्या पिकलेले आहेत की कृत्रिम, हा प्रश्न प्रत्येक ग्राहकाला पडत आहे. त्यामुळे आंबे घेतानाही प्रथम ते कृत्रिम पिकविलेले आहेत का, हे बघूनच घ्यावे. कृत्रिम रसायनांनी पिकविलेल्या आंब्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे खाल्ल्यास आतड्यांचे गंभीर आजार, पोटातील अल्सर, डोकेदुखी, चक्कर, विस्मरण, झोप उडणे यांसारखे आजार होऊ शकतात.
FSSAI च्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर, कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे सुरक्षित पिकवण्याचे घटक वापरून केल्यास मानवी वापरासाठी सुरक्षित मानली जातात. मात्र, आंबा पिकवण्यासाठी वापरलेले घटक तुमच्या शरीरासाठी किती प्रमाणात सुरक्षित आहेत, हे ही तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. कॅल्शियम कार्बाइड, ज्याला ‘मसाला’ म्हणूनही ओळखले जाते, हे सामान्यतः आंबे पिकवण्यासाठी वापरले जाते; मात्र FSSAI च्या विक्री प्रतिबंध आणि निर्बंध नियमन, २०११ अंतर्गत हे सक्तीने प्रतिबंधित आहे. नोडल फूड एजन्सीनेदेखील इशारा दिला की, कॅल्शियम कार्बाइडसह आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान सोडला जाणारा ॲसिटिलीन वायू हाताळणाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकतो. मुंबईतील रेजुआ एनर्जी सेंटरचे निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. संतोष पांडे सांगतात की, “आदर्शपणे, आंबा अंडाकृती, बीनच्या आकाराचा असावा. म्हणून तुम्ही असे आंबे निवडावेत, जे भरदार आणि गोलाकार असतील. विशेषत: देठाभोवती वास घेतल्यावर गोड सुगंध जाणवला पाहिजे.
कृत्रिम रसायनांनी आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे कसे ओळखाल?
- एका पाण्याने भरलेल्या बादलीत आंबे टाका.
- तुम्ही पाण्यात टाकलेले आंबे बुडाले तर ते नैसर्गिकरीत्या पिकलेले आहेत असे समजा.
- जर ते पाण्यावर तरंगत असतील तर कृत्रिम रसायनांनी पिकवले आहेत असे समजा.
डॉ. पांडे सांगतात की, “कृत्रिम पद्धतीने पिकवलेल्या आंब्यात नैसर्गिक आंब्याच्या तुलनेत रस कमी असतो आणि तो चवीलाही तितकासा गोड नसतो. सुवास अजिबात येत नाही, तर सेंद्रीय आंब्यामध्ये भरपूर ‘नैसर्गिक रस’ असतो. तसेच आंबा अर्धा कापल्यानंतर कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांमध्ये, सालीजवळील गराचा रंग आतील गरापेक्षा वेगळा असतो, परंतु नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा हा सर्वत्र एकसमान पिवळा असतो.”
योग्य आंबा कसा निवडायचा?
- तुम्ही बाजारातून आंबे विकत घ्यायला जाल तेव्हा विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच आंबे खरेदी करा.
- तुम्ही बाजारातून आंबा खरेदी करता तेव्हा आंब्याच्या रिंगवर डाग किंवा काळे स्पॉट तर नाहीत ना हे पाहा.
- काळे डाग असलेली फळे विकत घेणे टाळा.
- आंबे खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने नीट धुवा.