पावसाळा जवळ आला आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा वातावरणात गारवा आणतो, त्यामुळे अनेकांना पावसाळा हा ऋतू खूप आवडतो पण त्याचबरोबर पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा धोकाही वाढतो. हे आजार विशेषत: दूषित पाण्यामुळे होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते , ८० टक्के आजार हे पाण्यापासून पसरतात. याविषयी हैदराबाद येथील कामिनेनी हॉस्पिटलचे वरिष्ठ जनरल फिजिशियन डॉ. जे. हरिकिशन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’बरोबर बोलताना सविस्तर माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. जे. हरिकिशन सांगतात, “पाण्यापासून होणारे आजार हे विशेषत: पाण्यात होणारे बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोआ यांसारख्या अनेक रोगजनकांमुळे होऊ शकतात. यामुळे कॉलरा, टायफाइड, हिपॅटायटिस ए, जिऑर्डिआसिस आणि डायरियासारख्या आजारांचा धोका वाढतो.”

हेही वाचा : Heart Attack : हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत दुखणे नव्हे! ही लक्षणेही जाणून घ्या; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… 

पावसाळ्यात आपल्याला पाण्यापासून आजार का होतात?

पावसाळ्यात आपल्याला पाण्यापासून मोठ्या प्रमाणात आजार होण्याचा धोका असतो. याविषयी डॉ. हरिकिशन सांगतात, “पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा अनेक ठिकाणी पाणी साचते. सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठ्याची योग्य सुविधा नसणे आणि स्वच्छतेच्या अपुऱ्या सुविधांमुळे पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. याशिवाय पावसाळ्यातील वातावरणामुळे पाण्यात निर्माण होणारे रोगजनक घटक आणखी वाढतात, ज्यामुळे पावसाळ्यात अनेक लोक आजारी पडतात.”

पावसाळ्यात हे आजार होऊ नयेत, म्हणून कशी काळजी घ्यायची?

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे, खूप गरजेचे आहे. योग्य काळजी घेऊन तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि स्वत:ला आजारांपासून वाचवू शकता. यासाठी UNDAC आणि जिनिव्हा येथील सार्वजनिक आरोग्यप्रमुख डॉ. सबिन कापासी यांनी पावसाळी आजारांपासून स्वत:ला कसे वाचवायचे, यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. चला तर जाणून घेऊ या.

नळाचे पाणी वापरू नका –
पावसाळ्यात सर्वात जास्त आजार हे नळाच्या पाण्यापासून होतात. नळाचे पाणी पिणे टाळा. याशिवाय दात घासण्यासाठी आणि भांडी धुण्यासाठी शुद्ध पाणी किंवा उकळलेले पाणी वापरा. जेवणापूर्वी किंवा टॉयलेटवरून आल्यानंतर साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धूवा.

भाजीपाला आणि फळे धूवा –
पावसाळ्यात आहार घेतानाही विशेष काळजी घ्यावी. मार्केटमधून आणलेला भाजीपाला किंवा फळे स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतरच खा.

परिसर स्वच्छ ठेवा –
पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे, खूप जास्त गरजेचे आहे. नियमित तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि पावसाळ्यात कुठेही पाणी साचलेले असेल तर लगेच स्वच्छ करा, कारण साचलेल्या पाण्यामध्ये डास असू शकतात, ज्यामुळे पावसाळ्यात आजारांचे प्रमाण वाढते.

हेही वाचा :जर एक महिना साखर खाल्ली नाही तर तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

पूरग्रस्त भागात जाणे टाळा –
पावसाळ्यात अनेकदा पूरग्रस्तस्थिती निर्माण होते. रस्त्यावर साचलेले पाणी, नदी नाल्यांवर पूर येतो. अशा वेळी पूरग्रस्त भागातून जाऊ नका. पुराचे पाणी हे खूप दूषित असते, ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

मॉस्किटो रिपेलेंट्स (mosquito repellents) वापरा-
पावसाळ्यात डासांपासून स्वत:ला वाचविण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. अशा वेळी मॉस्किटो रिपेलेंट्सचा वापर करा. त्वचेवर मॉस्किटो रिपेलेंट्स लावल्याने डासांपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. याशिवाय झोपताना डासांपासून दूर राहण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करा.

लक्षणांपासून सावध राहा –
पाण्यापासून होणाऱ्या आजारांच्या लक्षणांपासून सावध राहा. जर तुम्हाला पावसाळ्यात डायरिया, उलटी, ओटीपोटात दुखणे, ताप किंवा इत्यादी आसामान्य लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जा.

पाण्यापासून दूर राहा –
पावसाळ्यात स्वीमिंग किंवा बोटिंग करताना काळजी घ्या. अशा ॲक्टिव्हिटीज स्वच्छ आणि चांगल्या सुविधा असलेल्या ठिकाणी करा. पूरग्रस्त किंवा अतिवृष्टी झालेल्या दूषित पाण्यात पोहणे टाळा.

हेही वाचा : दुधी भोपळ्याचे सेवन करताना कोणती काळजी घ्यावी, ते कसे करावे? जाणून घ्या, काय सांगतात डॉक्टर…

लसीकरण (Vaccinations)-
कॉलरा, टायफाइड आणि हिपॅटायटिस ए यांसारख्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी जवळच्या हेल्थ केअरमध्ये जा आणि लसीकरण करा. अशा आजारांचा धोका असणाऱ्या भागात तुम्ही जर दररोज प्रवास करत असाल तर तुम्ही लसीकरण करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन द्या-
पावसाळ्यात पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारी उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमध्ये सहभागी होणे आणि अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे, गरजेचे आहे.

डॉ. कापसी पुढे सांगतात, “स्वच्छ पाणी पिणे, नियमित स्वच्छता राखणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि लसीकरण घेणे, इत्यादी गोष्टींची काळजी घेतली तर पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. या सोप्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य चांगले राहू शकते.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to prevent from waterborne diseases in rainy season healthy lifestyle monsoon health news ndj