Heart Attack At Gym : सध्या धावपळीच्या आयुष्यात चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. तरुण वयात रक्तातील साखरेची पातळी वाढणे, वजन वाढणे, रक्तदाब किंवा खराब कोलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी आरोग्याच्या समस्यांमुळे अनेक तरुण मंडळी जिमकडे वळतात. जिममध्ये जाऊन वजन कमी केल्यामुळे या सर्व समस्या दूर होतील, असा अनेकांचा समज असतो. जिममध्ये गेल्यानंतर अचानक शारीरिक क्रियांमध्ये बदल होतो, ज्यामुळे हृदयावर ताण निर्माण होऊ शकतो. याच कारणांमुळे जिममध्ये व्यायाम करताना अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहेत. याविषयी फोर्टिस हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजीचे अतिरिक्त संचालक डॉ. अरुण कोचर यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
शारीरिक क्रियांमध्ये अचानक होणाऱ्या बदलांचा हृदयावर काय परिणाम होतो?
जिममध्ये व्यायाम करताना शरीरावर अति प्रमाणात ताण पडत असेल तर हृदयाला थकवा जाणवू शकतो. रक्तदाब वाढल्यामुळे हृदयापर्यंत रक्त पुरवठा करण्यास अडचण येऊ शकते. यालाच कार्डियाक हेमोडायनामिक्स (abnormal cardiac haemodynamics) म्हणतात ज्यामुळे व्यक्तीचा अचानक मृत्यू होऊ शकतो. भावनिक आणि शारीरिक तणावामुळेसुद्धा हृदयविकाराचा धोका वाढतो.
हृदयाशी संबंधित आजारांमुळे अचानक हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, ज्यामुळे अचानक व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काही तरुणांना हायपरट्रॉफीक कार्डिओमायोपॅथी ( Hypertrophic Cardiomyopathy) असू शकतो, हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. या आजारामध्ये व्यक्तीच्या हृदयाचे स्नायू मोठे आणि घट्ट होत जातात.
रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियमित तपासणे गरजेचे आहे, कारण यामुळे थेट हृदयाला धोका निर्माण होतो. व्यसन आरोग्यासाठी चांगले नाही, त्यामुळे व्यसन करणे टाळा. जिममध्ये वजन उचलताना काळजी घ्या. व्यायाम करताना मध्ये मध्ये विश्रांती घ्या. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्टॅमिना वाढवण्याचा प्रयत्न करा.
HIIT म्हणजे काय?
HIIT म्हणजे हाय इन्टेसिटी इन्टरवल ट्रेनिंग (High-Intensity Interval Training) होय. हा व्यायामाचा एक प्रकार आहे. या व्यायामामुळे कमी कालावधीत शरीरावर जास्त परिणाम दिसून येतो. हल्ली तरुण मंडळी या व्यायामाच्या प्रकाराकडे जास्त आकर्षित होतात. पण, लक्षात ठेवा की ॲथलेटिक्स कधीही अशा व्यायामाचा अवलंब करत नाही. नवीन लोकांनी व्यायामाचा हा नवीन प्रकार कधीही करू नये.
२२० वजा वय हे तुमच्या एका मिनिटामध्ये हृदयाच्या ठोक्याचा जास्तीत जास्त आकडा असू शकतो. हे गणित नेहमी लक्षात ठेवावं. त्यामुळे व्यायाम करताना हृदयाचे ठोके तपासणे गरजेचे आहे.
व्यायाम कसा करायचा?
१. काय करावे?
- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्टॅमिना वाढवण्याचा प्रयत्न करा.
- हृदयाशी संबंधित आजार होऊ नये म्हणून नियमित आरोग्य तपासणी करा.
- चांगले पोषक तत्वे असलेला आहार घ्या.
- भरपूर पाणी प्या .
- व्यायाम नेहमी दिवसा करा. रात्रीचा व्यायाम करणे टाळा.
- भरपूर सूर्यप्रकाश घ्यावा.
हेही वाचा : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
२. काय करू नये?
- व्यायाम करताना शारीरिक क्रिया किंवा हालचालींचा अतिरेक करू नये.
- हृदय गती तपासत राहा.
- व्यायाम करताना धूम्रपान किंवा मद्यपान करणे टाळा.
- जर तुम्हाला व्यायाम करताना श्वास घेताना त्रास होत असेल, तुमच्या छातीत किंवा डाव्या खांद्यामध्ये दुखत असेल, तुमचा घसा दुखत असेल किंवा तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करा.