स्मार्ट फोन, लॅपटॉप, टीव्ही, स्क्रीन या सर्व उपकरणांचे आपल्या आयुष्यात एक अविभाज्य स्थान निर्माण झाले आहे. आवडते कार्यक्रम पाहण्यापासून, सोशल मीडियावर स्क्रोल करणे ते दिवसभर ऑफिसची कामे करण्यासाठी आपण स्क्रीन समोर कितीतरी वेळ खर्च करतो. मात्र, त्याचा परिणाम साहजिकच आपल्या डोळ्यांवर होत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या स्क्रीनच्या अतिवापरामुळे ‘डिजिटल आय स्ट्रेन’ म्हणजेच, डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर ताण येणे ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. असे ‘ऑर्बिस’चे कंट्री डायरेक्टर डॉक्टर ऋषी राज बोराह यांचे मत आहे, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.

त्यालाच ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’, असेही म्हटले जाते. त्यामध्ये डोळे कोरडे होणे, डोळे किंवा डोके दुखणे, अस्पष्ट दिसणे यांसारख्या दृष्टीसंबंधीच्या समस्यांचा समावेश होतो.

हेही वाचा : ग्रीन टी पिण्याने वजन अन् चरबी कमी होत नाही? नेमके काय म्हणतात आहारतज्ज्ञ जाणून घ्या..

मात्र, वाढत्या डिजिटल यंत्रांच्या, स्क्रीनच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य झाले आहे. त्यातही कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे ते पाहू.

१. २०-२०-२० नियम

ऑफिसमध्ये किंवा घरून काम करताना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा आपण सगळे जण वापर करीत असतो. मात्र, काम करताना लॅपटॉपची स्क्रीन ही आपल्या अगदी डोळ्यांसमोर असावी. तसेच हातदेखील शरीराला समांतर राहतील अशा उंचीच्या टेबल आणि खुर्चीचा वापर करावा. तसेच लॅपटॉप स्क्रीन एक हात अंतरावर ठेवावा. मात्र, जर तुम्ही कामादरम्यान विश्रांती घेत नसाल, तर त्या सवयीमुळे डोळ्यांवर अधिक ताण पडू शकतो. असे होऊ नये यासाठी २०-२०-२० नियमाचे पालन करा; मात्र २०-२०-२० नियम म्हणजे नेमके काय ते पाहा.

त्यामध्ये प्रत्येक २० मिनिटांनी, २० सेकंदांसाठी स्क्रीनवरील लक्ष काढून, साधारण २० फूट दूर असणाऱ्या वस्तूकडे पाहावे. असे केल्याने तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज या २०-२०-२० नियमाची सवय केल्यास डोळ्यांच्या आरोग्यास फायदा होईल.

२. स्क्रीन ब्राईटनेसची पातळी

सतत स्क्रीनच्या प्रकाशाने आपल्या डोळ्यांवर प्रचंड ताण पडतो. मात्र, असे होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी तुम्ही करून पाहा. सर्वांत पहिल्यांदा तुम्ही वापरत असलेल्या उपकरणाचा ब्राईटनेस डोळ्यांना त्रासदायक राहणार नाही, असा ठेवावा. तसेच आता प्रत्येक ब्राईटनेस सेटिंगमध्ये डार्क मोड किंवा नाईट मोड हा पर्याय उपलब्ध असतो. त्याचा वापर करून तुम्ही स्क्रीनच्या निळ्या आणि त्रासदायक प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करू शकता.

हेही वाचा : योगा डाएट : आसनांचा आरोग्याला पुरेपूर फायदा व्हावा यासाठी आहार कसा असावा? पाहा या पाच टिप्स….

३. डोळे मिचकावणे आणि त्यांचा ओलावा

डोळ्यांचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी मधूनमधून डोळे मिचकावणे फार महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा आपण एकटक स्क्रीनकडे पाहताना डोळे मिचकावत नाही. परिणामी डोळे कोरडे होणे किंवा त्यांची जळजळ अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे स्वतःहून लक्षात ठेवून वरचेवर डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने डोळ्यांतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. अगदीच गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने साध्या आयड्रॉप्सचा वापर करावा.

४. चांगल्या स्क्रीनचा वापर करावा

सतत पाहिली जाणारी स्क्रीन ही चांगल्या दर्जाची, रिझोल्युशनची असावी. तसेच स्क्रीन अँटी-ग्लेअर असावी. अँटी-ग्लेअर ही आपल्या डोळ्यांचे ब्राईटनेस, स्क्रीनचा प्रकाश यांपासून रक्षण करते. मात्र, आपल्या डोळ्यांची अधिक काळजी घेण्यासाठी वेळोवेळी डोळे तपासून घ्यावेत. तसेच डोळ्यांना काही त्रास होत असल्यास त्वरित त्यावर उपाय करावेत.

बंगळुरूमधील नेत्रधामा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्री गणेश यांनी डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि डोळ्यांचा ताण किंवा कोणताही त्रास कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही लहान बदल करण्याबाबत काही सल्ले दिले आहेत ते पाहू.

“स्क्रीनचा वापर मर्यादित वेळेसाठी करा. तसेच नेहमी योग्य ब्राईटनेस आणि प्रकाशात काम करावे. त्याचप्रमाणे चांगल्या दृष्टीसाठी योग्य, सकस आहार घ्यावा. भरपूर पाणी प्यावे, नियमित व्यायाम करणे आणि रात्री चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे. धूम्रपान टाळावे. त्याचबरोबर संरक्षणात्मक चष्म्याचा वापर करावा. डोळ्यांची योग्य ती स्वच्छता करावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करावी,” असे डॉक्टर गणेश यांनी म्हटले असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या लेखावरून समजते.

यापुढे स्क्रीन वापरताना, तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी या लहान लहान गोष्टी फायदेशीर ठरू शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to protect your eyes from computer vision syndrome for healthy eye sight try these easy tips check out dha