नैराश्य हा एक मानसिक आजार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. नैराश्याबाबत विविध प्रकारची माहिती आपण नेहमी वाचतो, ऐकतो किंवा पाहतो. त्यामध्ये नैराश्य येते म्हणजे नक्की काय होते? नैराश्य आल्यानंतर व्यक्तीने काय केले पाहिजे? नैराश्यातून बाहेर कसे पडले पाहिजे, हे आपल्याला थोडेफार समजते. पण एखाद्या व्यक्तीला नैराश्य आले असेल, तर त्याच्या कुटुंबीयांनी, मित्र-मैत्रिणी किंवा सहकाऱ्यांनी त्याच्याशी कसे वागले पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे याबाबतची माहिती अनेकांना नसते. आपल्या आसपासच्या व्यक्तीला जेव्हा नैराश्य येते तेव्हा त्यांच्याशी संवाद साधणे, त्याला समजावणे, त्याच्याशी बोलणे अत्यंत अवघड होऊन जाते. अनेकदा नैराश्य आलेल्या व्यक्तीच्या आसपासच्या किंवा जवळच्या लोकांना याबाबत काहीच कल्पना नसते. त्यामुळे नैराश्य आलेल्या व्यक्तीला अनेकदा समजून घेतले जात नाही आणि या सर्व परिस्थितीचा त्याला जास्त त्रास होत असतो. असे घडते कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना नैराश्य आलेल्या व्यक्तीबरोबर कसे वागावे याबाबत काहीही माहीत नसते. याबाबत मुंबईतील अंधेरी येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी-शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ला सविस्तर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या जवळच्या किंवा कुटंबातील व्यक्तीला नैराश्य आले आहे की नाही हे समजण्यासाठी आधी आपल्याला नैराश्य येते म्हणजे नक्की काय होते हे माहीत असले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला नैराश्य आले हे कसे ओळखावे हे माहीत पाहिजे. त्याबाबत डॉ. जोशी सांगतात, “आजच्या काळात लोकांमध्ये एकाकीपणा वाढत चालला आहे. धावपळीच्या जगामध्ये जेव्हा तुमच्याशी बोलायला किंवा ऐकायला कोणी नसेल तेव्हा एखाद्याल्या नैराश्य येऊ शकते. आपल्या आसपासचे लोक जे आपल्याला नेहमी भेटतात, बोलतात अशा व्यक्तीचे वागणे जेव्हा अचानक बदलते तेव्हा त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. नेहमी बोलणारी व्यक्ती जर कोणाशीच बोलत नसेल, अचानक शांत राहत असेल किंवा खूप चिडचीड करीत असेल तर आपल्याला प्रश्न पडतो की, ‘ही अशी का वागते आहे?’ किंवा ‘याला काय झालेय?’ अनेकदा आपण यामागे नोकरीचा ताण असेल, ऑफिस किंवा कॉलेजमध्ये किंवा घरात काहीतरी झाले असेल, असा समज करून घेतो आणि त्यांच्या वागण्याकडे सहज दुर्लक्ष करतो. एखादा व्यक्ती त्याच्या स्वभावाविरुद्ध विचित्र वागत असेल, तर त्याला नैराश्य आलेले असू शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.”

आपल्या जवळच्या किंवा कुटुंबातील व्यक्तीला नैराश्य आले हे कसे ओळखावे? याबाबत डॉ. जोशी यांनी खाली काही उदाहरणे दिली आहेत.

सौम्य आणि मध्यम नैराश्याची लक्षणे

  • एखादी व्यक्ती त्याचा स्वभाव नसताना अचानक खूप चिडचीड करीत असेल.
  • लहान मुलांचा खेळताना होणारा आवाज नको वाटत असेल
  • आधीपासून ज्या गोष्टी करत आहोत त्या करणे
  • लोकांबरोबर संपर्क टाळत असेल.
  • स्वभाव नसताना अचानक कोणी काही बोलले तर रडू येते म्हणजे अतिसंवेदनशील होणे.
  • अचानक रात्री झोप न येणे, वाईट स्वप्न पडणे.
  • अचानक भूक कमी होणे
  • मूड उदास होणे, निराश वाटणे, सतत मूड बदलणे किंवा कशातच मन न लागणे.
  • खूप झोप येणे किंवा झोप कमी होणे.
  • खूप भूक लागणे किंवा भूक कमी होणे

गंभीर नैराश्याची लक्षणे

  • कामामध्ये लक्ष केंद्रित न होण्यामुळे कामात पूर्वीपेक्षा जास्त चुका होणे ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.
  • लहान मुलांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होणे, खूप कमी मार्क येणे
  • दात घासणे, अंघोळ करणे अशा दैनंदिन गोष्टी वेळच्या वेळी न होणे किंवा दैनंदिन दिनक्रम विस्कळित होणे.
    लोकांना नैराश्याबाबत माहिती नसल्यामुळे या सौम्य आणि मध्यम नैराश्यकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर नैराश्यामध्ये रूपांतर होऊ शकते. वरीलपैकी सर्व लक्षणांशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये अशा व्यक्तींच्या मनात आत्महत्येचे किंवा मृत्यूचे विचार येऊ लागतात. अशा व्यक्तींना तातडीने मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाणे आणि त्यांच्यावर शक्य तितक्या लवकर उपचार सुरू करणे आवश्यक असते.

हेही वाचा – “मुलांना नव्हे, आधी स्वत:ला शिस्त लावा”; आजच्या पिढीच्या पालकांचे नक्की चुकतंय कुठे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

तुमच्या जवळच्या व्यक्तीला नैराश्य आले, तर काय करावे?

डॉ. जोशी सांगतात, “जेव्हा तुमच्या आसपासची व्यक्ती, मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईक अशा प्रकारे वागत असतील, तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. आजकाल लोक इतरांच्या प्रायव्हसी जपण्याला फार महत्त्व देतात; पण जर तुम्हाला सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असतील, तर प्रायव्हसीचा विचार न करता त्यांच्याशी जाऊन बोलले पाहिजे. “तुला काही त्रास होतोय का? तुला काही मदत हवी आहे का?” हे विचारले पाहिजे. तरीही तुम्हाला अशा व्यक्तीचे वर्तन वेगळे वाटत असेल, तर त्याचे आई-वडील, बहीण-भाऊ, जवळचे मित्र वा मैत्रिणी यांच्यापैकी कुणाला तरी त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत कल्पना दिली पाहिजे. सौम्य ते मध्यम नैराश्याची लक्षणे दिसत असतील, तर मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञांची लवकर मदत घेणे फायदेशीर ठरू शकते. प्रत्येक वेळी समुपदेशकाची मदत घ्यावी लागेलच, असे काही नाही. जर एखाद्य व्यक्तीला सौम्य नैराश्य आले असेल, तर त्याच्या जवळच्या व्यक्तीबरोबर संवाद साधून, मन मोकळे केल्यावर ही लक्षणे कमी होऊ शकतात.”

हेही वाचा – रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणानंतर बीट का खाल्ले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 

नैराश्य येण्याची कारणे

  • काही लोकांमध्ये आनुवंशिकतेमुळे नैराश्य आलेले असू शकते. एखाद्या घरात पूर्वी कोणाला नैराश्य आले असेल, तर त्यांना आनुवंशिक नैराश्य येऊ शकते.
  • काही लोकांनी बालपणी काही धक्कादायक गोष्टी अनुभवलेल्या असू शकतात. कधी एखादी हिंसात्मक घटना पाहिली असेल किंवा स्वत:बरोबर तशी काही घटना घडली असेल किंवा कुटुंबात आई-वडिलांना व्यसन असेल, तर अशा घटनांचा त्यांच्या मनावर परिणाम होऊन नैराश्य येऊ शकते.
  • अनेकदा काही लोकांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो; उदा. पूर येणे, भूकंप होणे अशा घटनांमुळे नंतर नैराश्य येऊ शकते.
  • अनेकदा घरातील वाद किंवा मालमत्तेचे वाद किंवा अचानक आर्थिक संकट आले असेल, तर एखाद्याला नैराश्य येऊ शकते.
  • एखाद्याला आपल्या घरातील किंवा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नैराश्य येऊ शकते.
  • अनेकदा काही लोकांना कोणतीही गोष्ट मिळवली तरी समाधान वाटत नाही. त्यांना नेहमी आणखी मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा असते जेव्हा तसे होत नाही तेव्हा अशा लोकांना नैराश्य येऊ शकते.
  • अनेकदा काही लोक अत्यंत संवेदनशील असू शकतात. त्यांना थोडे जरी बोलले तरी ते दिवस-रात्र त्याचा विचार करीत बसतात अशा लोकांनाही नैराश्य येऊ शकते.
  • डॉ. जोशी सांगतात, “काही लोक असे असतात की, जे मनात कितीही वाईट किंवा चुकीचे काही येत असेल तरीही जे नेहमी हसतमुख असतात त्यांनाही नैराश्य येऊ शकते. अशा व्यक्तींना नैराश्य आले आहे हे ओळखणे अत्यंत कठीण असते. म्हणूनच तुम्ही कितीही काहीही करीत असाल तरी एक तरी अशी व्यक्ती तुमच्या संपर्कात असली पाहिजे की, जिच्याजवळ जाऊन तुम्ही मनातील सर्व काही बोलू शकता किंवा तुमचे मन मोकळे करू शकता. नैराश्यामध्ये संवाद साधल्याने फायदा होऊ शकतो.”
    “नैराश्य येण्यामागे अशी अनेक कारणे असू शकतात. मुख्य म्हणजे नैराश्य कोणालाही येऊ शकते. गरीब व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत, बेरोजगारापासून नोकरी करणाऱ्या व्यक्तीपर्यंत, लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत नैराश्य कोणालाही येऊ शकते.” असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

नैराश्य आलेल्या व्यक्तीबरोबर कसे वागावे?

“अनेकदा असे होते की, नैराश्य आलेल्या व्यक्तीबरोबर संवाद साधणे किंवा त्याला समजून घेणे त्याच्या कुटुंबीयांसाठी खूप अवघड असते.

  • नैराश्य आलेल्या व्यक्तीला सांभाळण्यासाठी तुम्ही स्वत: तयार नसता, तेव्हा थोडा वेळ त्यांना आणि स्वत:लाही थोडा वेळ द्या.
  • नैराश्य आलेल्या व्यक्तीबरोबर शक्य तितक्या प्रेमाने वागा.
  • नैराश्य आलेल्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • नैराश्य आलेल्या व्यक्तीशी वाद घालू नका. जर एखादी गोष्ट त्यांना नको असेल, तर ती करू नका.
  • नैराश्यात गेलेल्या व्यक्तीची होणारी चिडचीड किंवा त्याचे वर्तन हे मुद्दाम केले जात नाही हे लक्षात घ्या.
  • नैराश्य आलेल्या व्यक्तीचा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्या व्यक्तीची मदत घ्या कारण- त्या व्यक्तीद्वारे मदत घेऊन त्याला समजावणे सोपे होऊ शकते.
  • नैराश्य आलेल्या व्यक्तीला एकटे वाटू देऊ नका. तुम्ही त्यांच्याबरोबर आहात याची जाणीव त्यांना करून द्या.
  • डॉ. जोशी सांगतात, “तुमच्या मित्र-मैत्रीण किंवा सहकाऱ्याला नैराश्य आले असेल, तर त्याच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन तुम्ही त्यांना कल्पना देऊ शकता किंवा डॉक्टर अथवा मानोसपचार तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. पण, तरीही अशा व्यक्तींना सांभळण्यासाठी एक तरी अशी व्यक्ती बरोबर असली पाहिजे; जी अत्यंत प्रेमाने त्याला समजावेल, त्याच्या औषधाच्या गोळ्या त्याला वेळच्या वेळी देईल. अशी व्यक्ती सोबत असेल, तर नैराश्यग्रस्त व्यक्तींना मदत करणे सोपे होते.”
  • “कुटुंबीयांनीदेखील मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन याबाबत मोकळेपणाने बोलले पाहिजे; जेणेकरून नैराश्य आलेल्या व्यक्तीबरोबर कसे वागावे हे समजून घेता येईल. घरातील वातावरण अगदी सामान्य असले पाहिजे. फार लाड करू नये आणि फार दुर्लक्षही करू नये. त्याचे संतुलन कसे साधायचे यासाठी योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकता.”

नैराश्यावर उपचार घेण्यासाठी त्या व्यक्तीला कसे तयार करावे?

नैराश्य आलेल्या व्यक्तीवर उपचार नक्की कशा प्रकारे केले जातात याबाबत डॉ. जोशी सांगतात, “जेव्हा नैराश्य आलेली व्यक्ती काहीही सांगत नसेल किंवा ऐकत नसेल, तर अशा वेळी त्याला अत्यंत शांतपणे समजावले पाहिजे. त्याला विश्वासात घेऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्यासाठी तयार केले पाहिजे. त्यांना असे सांगितले पाहिजे की, आपण फक्त चर्चा करण्यासाठी जाऊ या. कारण- बऱ्याचदा चर्चेमधून नैराश्य आलेल्या व्यक्तीमध्ये सुधारणा होऊ शकते किंवा बऱ्याचदा चर्चेतून असेही लक्षात येते की, एखाद्या व्यक्तीला बरे करण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे किंवा काही औषधे द्यावी लागणार आहेत. हा काळ निरीक्षणात्मक असू शकतो. काही लोकांना सहा महिने, एक वर्ष किंवा दीड वर्ष इतका वेळ बरे होण्यासाठी लागू शकतो. अनेकदा गोळ्या खाल्ल्यानंतर बरे वाटते आणि गोळ्या बंद करताच पुन्हा तशी लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी त्यांना बरे होण्यासाठी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो. अनेक प्रकरणांमध्ये योग्य मार्गदर्शन घेतले आणि व्यवस्थित गोळ्या घेतल्या, तर व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते, असे दिसून आले आहे.”

हेही वाचा – दूध आणि मासे एकत्र खाऊ का नये? मध खाल्यानंतर गरम पाणी का पिऊ नये? ‘विरुद्ध आहारा’बाबत काय सांगते आयुर्वेद, जाणून घ्या

नैराश्यावर उपचार कसे केले जातात?

उपचारांबाबत माहिती देताना डॉक्टर जोशी यांनी सांगितले, “नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी व्यक्तीला स्वत:वर लक्ष केंद्रित कसे करावे हे शिकवले जाते. स्वत:साठी रोज काहीतरी करायला सांगितले जाते. स्वत:ची काळजी घेण्यासाठी योगा करणे, रोज फळे कापून खाणे अशा गोष्टी करायला त्यांना शिकवाव्या लागते. कारण- बराच काळ त्यांनी या गोष्टी केलेल्या नसतात. त्यानंतर हळूहळू त्यांचा दिनक्रम पुन्हा सुरळीत केला जातो. या उपचारांमध्ये स्वत:ची काळजी घ्यायला शिकवले जाते. हा पहिला टप्पा असतो. त्यानंतर पुढच्या टप्प्यात छंद जोपासण्यास शिकवले जाते. पुस्तक वाचणे, योगा करणे, डान्स करणे, कुठेतरी फिरायला जाणे अशा गोष्टी करायला शिकवल्या जातात. अशा व्यक्तीसाठी संतुलित आहार घेणे, नियमित पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.”

जेव्हा एखादी व्यक्ती खूप राग राग करीत असेल, तोडफोड करीत असेल किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशा वेळी काळजीपोटी कुटंबीय अशा व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्यासाठी परवानगी देऊ शकतात. अशा वेळी त्यांना इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी किंवा ‘ईसीटी’ द्यावी लागू शकते. जे वापरासाठी अत्यंत सुरक्षित आहे. “

नैराश्याकडे पाहण्याची लोकांची मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. कारण- अनेकदा एखादी व्यक्ती नैराश्य आले आहे हे मान्य करीत नाही किंवा कुटुंबातील लोकही नैराश्य वगैरे काही नसते, असा विचार करतात. हा चुकीचा दृष्टिकोन बदलणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नैराश्याबाबतची योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. तसेच आपल्या आसपासच्या लोकांबरोबर संवाद साधून किंवा चर्चा करून हा दृष्टिकोन बदलता येऊ शकतो. अशा वेळी तज्ज्ञ व्यक्ती किंवा डॉक्टरांची मदत घेता येऊ शकते. नैराश्य आले म्हणजे काहीतरी गंभीर आजार झाला, असे काही नाही. या आजारावर उपचार घेऊन तो पूर्णपणे बरा होतो; पण जर तो वेळीच बरा झाला नाही, तर तो धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to recognize symptoms of depression in your family how to support loved one experiencing depression these symptoms know what expert says itdc snk
Show comments