एकदा एका टीनजर्सच्या वर्कशॉपमध्ये मुलांना विचारलं, रविवारी घरी काय जेवलात? पानात कुठले पदार्थ होते, त्यांचे रंग, चव इत्यादी गोष्टी सांगा. अनेकांना हा तपशील सांगता आला नाही. काही जणांना आपण काय जेवलो तेच आठवत नव्हतं. काहींना अर्धवट आठवत होतं. मला हे फार काळजी करणारं वाटलं आणि त्यासाठी मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये.. कारण अगदी लहानपणापासून जेवताना समोर टीव्ही किंवा मोबाईल देण्याची सवय आईबाबा-आजीआजोबा किंवा घरातले इतर मोठे मुलांना लावतात. जागतिक आरोग्य संघटनेने ज्या ‘स्क्रीन टाइम’ गाईड लाईन्स जाहीर केल्या आहेत त्यानुसार वर्षाच्या मुलांच्या डोळ्यासमोर कुठलाही मोबाईल असण्याची गरज नाहीये. पण आपल्याकडे चित्र बरोबर उलट आहे.
आणखी वाचा: Mental Health Special: शाळकरी मुलांहाती मोबाईल: फायद्यापेक्षा दुष्परिणामच अधिक!
मूल जन्माला आल्याबरोबर त्याच्या डोळ्यासमोर स्क्रीन येतोय. ते बसायला आणि रांगायला लागण्याआधी मोबाईल बघायला शिकतं. चिऊमाऊच्या गोष्टी सांगण्यापेक्षा मोबाईलवर गाणी, बडबड गीतं लावून देऊन जेवायला घातलं की मुलं पटापट, कुठलीही कटकट न करता जेवतात आणि भरपूर जेवतात हे पालकांच्या लक्षात यायला लागल्यावर कसलाही विचार न करता सरळ मुलांना टीव्ही नाहीतर मोबाईलच्या स्क्रीन समोर बसवून जेवणं सुरु झालं. यालाही आता बऱ्याच पिढ्या झाल्या आहेत. गेल्या काही पिढ्या या अशाच स्क्रीनसमोर जेवत वाढलेल्या आहेत. जेवायचं असेल तर स्क्रीन लागतो, असला पाहिजे हे गणित या मुलांच्या डोक्यात पक्कं आहे.
आणखी वाचा: सर्फिग : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा
आता गंमत अशी आहे की मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा आईबाबा, आजीआजोबा त्यांच्या सोयीसाठी मुलांना स्क्रीनसमोर बसवतात. पण मुलं जशी टीनएजर होतात याच आईबाबांच्या आणि आजीआजोबांच्या अपेक्षा बदलायला लागतात. आता त्यांना वाटायला लागतं मुलांनी स्क्रीन वापरू नये, आणि याचं कारण फक्त शाळेतले मार्क असतात. स्क्रीनच्या अतिवापरामुळे आपल्या मुलाला/मुलीला परीक्षेत कमी मार्क मिळाले तर? बाकी स्क्रीनचे जे काही इतर परिणाम असतात त्याविषयी पालकांनी अनेकदा साधा विचारही केलेला नसतो. कारण माध्यम शिक्षण नाही. अशावेळी मग जेवताना फोन बाजूला ठेवा असं म्हटलं की या मुलांना राग येतो. आवडत नाही कारण आजवरच्या त्यांच्या जगात आईबाबांनीच त्यांना सतत स्क्रीनसमोर बसवलेलं असतं आणि आता ते तो काढून घेतायेत म्हटल्यावर मुलं चिडतात. रागावतात.
आज प्रत्येक घरात जर आईबाबा आणि टीनएजर मुलं/मुली यांच्यात भांडणं होत असतील तर त्यातला एक महत्वाचा मुद्दा असतो मोबाईल. स्मार्टफोन हे आधुनिक काळातल्या महत्त्वाच्या तीन क्रांतींपैकी एक मानले जातात. इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्मार्टफोन या आधुनिक काळातल्या महत्त्वाच्या तीन क्रांती मानल्या जातात. या तिन्ही गोष्टींमुळे आपलं जगणं अंतर्बाह्य बदललं आहे. आपण ज्या पद्धतीनं विचार करतो, ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया देतो; त्यात बदल झाले आहेत. इतकंच कशाला पण सर्वसाधारणपणे मनाच्या तळाशी दडवून ठेवलेल्या गोष्टींना अचानक वर येण्याची संधी देणं याच क्रांतीमुळे शक्य झालं आहे. आता इतक्या मोठ्या बदलाचे बरेवाईट परिणाम होणारच.
कुठल्याही हॉटेलमध्ये जा एक चित्र हमखास दिसतं, आई-बाबा त्यांच्या-त्यांच्या फोनमध्ये डोकं घालून बसलेले असतात आणि मुलांच्या हातांत त्यांचे टॅब्ज आणि मोबाईल असतात किंवा आईबाबा गप्पा मारत असतात आणि मुलं एकेकटी आई-बाबांचे फोन घेऊन त्यात गेम्स खेळत असतात. हॉटेलमध्ये, लग्नाकार्यात, पर्यटनाला गेल्यानंतर, जेवताना मुलांनी दंगा करू नये म्हणून त्यांनी एकाच जागी बसून राहावं; यासाठी टीव्ही, मोबाईल, टॅब्ज यांचा सर्रास वापर अनेक पालक करतात.
आता यात गैर काय आहे असं काही लोकांना वाटेलही… अडचण एकच आहे; या सगळ्यात मुलांचा अन्नाशी संबंधच येत नाही. कनेक्ट तुटतो आहे. पदार्थांचे रंग, वास, चव या याच्या नोंदी मेंदू घेतो का? ज्या भांड्यांमध्ये अन्न तयार होतं, ज्या भांड्यांमधून वाढलं जातं त्याच्याशी तरी ओळख उरते का? सततच्या मोबाईलच्या वापराचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक परिणाम आहेतच पण त्याच बरोबर ‘भवताल भान’ नाहीसं होणं हा एक मोठा धोका आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अन्नाशी संपर्क तुटणं ही काही फारशी चांगली गोष्ट नाही; कुणाचसाठी, मुलांच्यासाठी तर नाहीच नाही. टीव्हीच्या, मोबाईलच्या, टॅबच्या स्क्रीनकडे बघत मूल जेवतं; तेव्हा त्या जेवणाकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं. टीव्हीसमोर मुलांनी जेवू नये म्हणून अनेक पालक टीव्ही बंद करतात; पण मुलांचं ताट वाढतात आणि स्वतः मात्र मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात. मुलं जेवत असताना त्यांच्याशी बोलणं, केलेल्या भाजीविषयी त्यांना माहिती देणं, गप्पा मारणं यांतून अन्नाविषयी त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देणं; त्यांना एखादी भाजी आवडत नसेल, तर ती का आवडत नाही हे जाणून घेणं; त्यांनी ती का खाल्ली पाहिजे हे समजावून सांगणं या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. शाळेत विज्ञानाच्या तासाला कुठल्या भाजीत काय असतं हे मुलांना जरूर शिकवलं जातं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव सकाळ-संध्याकाळ देण्याची उत्तम संधी पालकांच्या हातांत असते…पण स्मार्टफोनमध्ये अडकलेले पालक त्यांच्या मुलांना थेट माहिती पुरवण्याच्या या संधी सोडून देतात. एकत्र जेवताना होणाऱ्या गप्पा मनावरचा ताण नाहीसा करतात. टीनएजर मुलांशी कनेक्ट होणं सोपं जाऊ शकतं. त्यांच्या जगात नक्की काय सुरु आहे हे माहिती होऊ शकतं. मुलामुलींची अन्नाशी, स्वयंपाकघराशी, जगण्याशी दोस्ती होणं आवश्यक आहे. तेव्हाच ऑफलाईन जगातली गंमत त्यांना समजेल. ही संधी आपण देणार का?