रश्मी जोशी शेट्टी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ध्रुव (नाव बदललेली) आणि दुर्वाला घेऊन त्यांची आई जेव्हा क्लिनिकला आली तेव्हा जेमतेम १४ वर्षाचा ध्रुव आणि १६ वर्षाची दुर्वा मोबाईल साठी भांडण करत असल्याचं मी पाहिलं. दोघांची आई त्याच्या वादामुळे त्रस्त असल्याचं जाणवलं. थोडा मी दम दिल्यावर दोघे शांतपणे वेटिंग एरियात जाऊन बसले. त्यांची आई सांगू लागली , डॉक्टर, कोव्हिडमध्ये जेव्हा सगळं ऑनलाईन चालू झालं तेव्हापासून ध्रुवला मोबाईल शिवाय करमतच नाही. मोबाईल वर बघतच जेवण करतो. दिवसभर युट्युब वर कुठलातरी गेम खेळतो. त्याची भयंकर चिडचिड वाढली आहे. शाळेतसुद्धा जायला नको म्हणतोय . १५ दिवस झाले तो घराबाहेरही पडला नाही. आधी मित्रांना भेटायचा ते ही बंद ! बाथरूममध्ये सुद्धा मोबाईल घेऊन जातो. त्याला मोबाईल बाजूला ठेव मग जेवणाला देईन असं म्हटलं तर म्हणतो ब्लॅकमेल करतेस. तो रात्र रात्र भर जागा असतो. सकाळी ४-५ वाजता झोपतो आणि दुपारी २-३ वाजता उठतो. झोपेतही ‘मार डालो मर गए’ असं काहीतरी बडबडतो. त्याच्या बाबांनी वायफायचा पासवर्ड बदलला तर म्हणतो जीव देईन. हे सगळं आम्हाला कळण्यापलीकडे आहे.

ध्रुवला याबाबत विचारलं असता तो म्हणाला, ‘शाळा शिकून माझी आई पण घरीच आहे ना ! मग मी का शाळेत जाऊ ? त्यापेक्षा युट्युब वर गेम खेळून पैसे कमवतो’. तो त्या गेम मधे उत्तम असल्याचं म्हणाला. त्याच्या आधीच्या शाळेबद्दलच्या अभ्यासाबाबत विचारले असता कळले की तो क्लासमधे पहिल्या पाच मुलांमधे नंबर पटकवायचा. तो गेमिंग एडिक्शनमुळे येणाऱ्या तीव्र उदासिनतेचा शिकार झाला होता. शिवाय हट्टी स्वभावाचा असल्याने त्याला सावरणे कठीण झाले होते आणि ते मदतीसाठी आले होते.

आणखी वाचा-Mental Health Special: पॉर्नबद्दल मुलांशी कसं बोलाल? आणि काय बोलाल?

आपल्या सबकॉन्शियस मनाला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत. परंतु त्या गोष्टी अतिप्रमाणात केल्या तर वास्तविकतेचे भान हरपून आपण तीव्र मानसिक आजारांना बळी पडू शकतो हे ही तितकेच सत्य आहे. स्क्रीन टाईमच्या अतिवापराने आपल्यातील संयम कमी होऊन आपण चिडचिडे बनू शकतो. सोशल मीडियावर सारखे बघून आपल्यात तुलनेची भावना येऊ शकते, बॉडी इमेजचे प्रश्न निर्माण होतात, आत्मविश्वास कमी होतो, क्रिएटिव थिंकिंग कमी होते, निर्णयक्षमता ढासळते, नकारात्मक विचार येतात. रस्त्यावरील अपघात आणि सायबर क्राईम ही याचाच परिणाम आहे.

आणखी वाचा-Mental Health Special : कसं तयार होतं व्यसनाचं मॉडेल?

आता प्रॉब्लेम स्क्रीनटाईम मॅनेजमेंटचा आहे आणि त्यावर साधे सोपे उपायदेखील आहेत. आपल्या मोबाईल सेटिंग्जमध्ये स्क्रीनटाईम ट्रॅक करायचा ऑप्शन असतो. ते करायला हवं. झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी मोबाईल , टीव्ही किंवा लॅपटॅाप वापरणे टाळावे. ज्यांना स्क्रीनसमोर काम करायचे असते त्यांनी २०-२०-२० चा फॉर्म्युला वापरावा. (दर वीस मिनिटांनी वीस फूट अंतरावर वीस सेकंद बघावे). मुलांना मैदानी खेळांसाठी प्रवृत्त करावे. इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिकने २ वर्षापेक्षा लहान मुलांना कुठलाही स्क्रीन एक्सपोजर करू नये असे सांगितले आहे. २ ते ५ वर्ष वयोगटात १ तास तर ५ ते १० वर्ष वयोगटात २ तास पालकांच्या देखरेखी खालीच मोबाईल लॅपटॅाप वापरण्यास सांगितले आहे. मुलांना हिंसात्मक व्हीडिओ आणि गेम्सपासून परावृत्त करण्यासाठी हे योग्य आहे. १० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना डेटा प्रायव्हसी , सायबर क्राइम , सायबर बुलिंगची माहिती देणे आवश्यक आहे.

हेल्दी स्क्रीन टाइम आपल्यासाठी ज्ञानाचे भंडार ठरु शकतो. आपल्याला टेक्नोफ्रेंडली करु शकतो. आपली कनेक्टिव्हिटी वाढवतो. ध्रुवचे काय झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याला वास्तवात परत आणण्यासाठी औषधी द्यावयास लागल्या. त्याचे समुपदेशन चालू आहे. तो घराबाहेर जाऊ लागला आहे. परत शाळेत जायला तयार होतोय. ध्रुव लवकरात लवकर आत्मविश्वासाने वास्तविक जीवनात परत यावा म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to solve screen time addiction of children hldc mrj
Show comments