पॉर्न मुलांपर्यंत चोहोबाजूंनी पोहोचतं आहे ही वस्तुस्थिती आहे. मग पालक, शिक्षक किंवा मोठ्यांच्या जगाने लहान मुलांशी किंवा किशोरवयीनांशी संवाद साधायचा कसा हा महत्वाचा प्रश्न आहे. इथे एक मुद्दा लक्षात घ्या, सेक्स, पॉर्न, किशोरवयात शरीरात होणारे बदल याबाबत बोलणं हे पालकांना आणि शिक्षकांनाही अनेकदा कठीण जातं. त्यांना अवघडल्यासारखं होतं. पण तसं करुन चालणार नाही. एकतर आपल्या अवघडलेपणावर काम करावं लागेल किंवा मग मुलांना या गोष्टी नीट समजावून देऊ शकतील अशा तज्ज्ञांची मदत तरी घ्यावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Mental Health Special: टीनएज मुलं पॉर्न अ‍ॅडिक्ट कशी होतात? ते रोखण्यासाठी काय करावं? 

पॉर्न मुळे मनामेंदूत नेमकं होतंय काय?
‘द ब्रेन दॅट चेंजेस’ या पुस्तकात मानसोपचारतज्ञ नॉर्मन डोईज नमूद करतात, “सतत कॉम्प्युटरसमोर बसून पोर्नोग्राफी बघणाऱ्यांच्या मेंदूतले ‘ब्रेनमॅप्स’ बदलायला लागतात. बराच वेळ सातत्याने स्क्रीनसमोर बसून पोर्नोग्राफी बघितल्यामुळे मेंदूतल्या न्यूरॉन्सचं वायरिंग बदलायला लागतं. समोर हलणारी आणि आनंद देणारी चित्रं, व्हिडीओ क्लिप्स यांचं कनेक्शन थेट मेंदूतल्या ‘प्लेजर सेंटर’ किंवा ‘सुख केंद्रा’शी होतं. तिथून हॅपी हार्मोन डोपामाईन वाहायला लागतं. जेव्हा जेव्हा लैंगिक भावना चेतवणाऱ्या क्लिप्स, व्हिडीओ बघितले जातात, जेव्हा जेव्हा ऑर्गझमचा अनुभव मिळतो.”
वयाच्या दहाव्या वर्षी जर मुलांच्या आयुष्यात पॉर्न येणार असेल तर ही नुसतीच काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीये, तर ही अत्यंत गंभीर बाब का आहे हे लक्षात घ्या. आजवर मुलांबरोबर काम करताना मला जाणवलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉर्न कन्टेन्ट बघणारी मुलं हळूहळू याविषयीची संवेदनशीलता गमावून बसतात. लैंगिक अवयव बघणं, लैंगिक क्रिया बघणं, एरॉटिक्स बघणं, लैंगिक छळ आणि हिंसा बघणं, रेप सीन्स बघणं या सगळ्याच गोष्टी “न्यू नॉर्मल” होतात. लैंगिक संबंधांमध्ये मानवी नात्यांची असणारी महत्त्वाची भूमिका, कन्सेंट, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीराचा ‘आदर-इच्छा-सन्मान-स्वीकार’ या गोष्टी अनेकदा बाजूला पडतात आणि ‘शरीर सुख’ ह्या एकाच मुद्द्याभोवती सगळं घुटमळत राहतं. लैंगिक हिंसा बघतानाही आपण जे बघतोय ते चुकीचं आहे असा विचार मनात येणं हळूहळू बंद होतं जातं आणि पोर्नबद्दल मन काहीसं बधिर बनतं.

आणखी वाचा: Mental Health Special: डेटा सेक्युरिटी सायबर पालकांना बळकट करणार?
‘इंडिया टुडे’मध्ये १० जून २०१५ला प्रसिद्ध झालेल्या ‘रायझिंग पॉर्न ॲडिक्शन इन इंडियन युथ वरींग एक्सपर्ट्स’ या लेखात लैंगिकता आणि वर्तणूक विज्ञान तज्ञांनी मुलं लहान वयात पॉर्न साईट्स का बघतात याविषयी मतं मांडली आहेत. हा लेख जुना असला तरी यात तज्ज्ञांनी जे काळजीचे मुद्दे मांडले होते त्यातल्या अनेक गोष्टी आज काम करताना ठळकपणे दिसून येतात. या लेखानुसार किशोरावस्थेतली मुलं त्यांच्या जगण्यातल्या अनाकलनीय गोष्टींची उत्तरं शोधायला सेक्स आणि सेक्सशी संबंधित मटेरियल बघण्याकडे वळतात. मात्र बर्‍याचदा खरी आणि योग्य उत्तरं न मिळता, सगळा शोध अश्लीलतेच्या दिशेने सुरू होतो आणि मुलं त्यात अडकत जातात.
शरीर संबंधांचं नाट्य
आपण जे बघतोय ते वास्तव आहे की नाट्य हेही अनेकदा अनेकांच्या लक्षात येत नाही. सिनेमा, कार्टून्स बघताना त्यांना हे नाट्य आहे, खरं नाहीये हे ठाऊक असतं; तरीही त्याचे अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या विचारांवर, वर्तनावर, समजुतींवर होत असतात. पॉर्नमध्ये तर समोर जे काही चालू आहे ते नाट्य आहे हेच अनेकदा मुलांना माहीत नसतं. स्त्री पुरुषांमध्ये, स्त्री-स्त्रीमध्ये किंवा दोन पुरुषांमध्ये सुरू असलेल्या शरीर संबंधांचं नाट्य, ‘स्क्रिप्टेड’ आहे याचा विचार त्यांच्या मनात अनेकदा नसतो. त्यामुळे समोर दिसणाऱ्या स्त्री पुरुषांचे देह, त्यांच्या लैंगिक अवयवांचे आकार, एकमेकांना आनंद देण्याच्या पद्धती, लैंगिक छळ करण्याच्या पद्धती, लैंगिक छळाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या शिव्या, एकमेकांची शरीरं हाताळण्याची पद्धत या सगळ्याच गोष्टी खऱ्या वाटण्याची दाट शक्यता असते. ज्यातून पुढे जाऊन स्वतःच्या शरीराविषयीच्या अवाजवी अपेक्षा निर्माण होऊ शकतात. हे अतिशय गुंतागुंतीचं आहे. समोर दिसणाऱ्या पॉर्न ॲक्टर्सप्रमाणे आपला बांधा असला पाहिजे याचा प्रचंड ताण मुलामुलींवर असतो.
यातही, मुलांचे ताणाचे विषय आणि मुलींचे ताणाचे विषय काहीसे निराळे आहेत.
मुलांना ताण असतो तो लैंगिक अवयवांच्या आकाराचा आणि परफॉर्मन्सचा. मुलींच्या बाबतीत बॉडी इमेजचा संघर्ष मोठ्या प्रमाणावर पॉर्नमुळे तयार होतो. पॉर्न इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अभिनेत्रींचे देह, त्यांच्या अवयवांचे आकार, शरीराची वळणं या सगळ्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ताण मुलींवर असतो.
पालक/शिक्षकांनी काय करायला हवं?
१) पॉर्न मुलांपर्यंत पोचतंय, आपण ते रोखू शकत नाही. घरी मोबाईल दिला नाही म्हणजे मुलांपर्यंत मोबाईल पोहोचत नाही या भ्रमात राहू नये. मुलांपर्यंत हे सगळं पोहोचणार आहेच.
२) मूल पॉर्न बघतंय किंवा दहाव्या, बाराव्या वर्षी हस्तमैथुन करतंय असं लक्षात आल्यावर आरडाओरडा करु नका. त्यांना पॉर्न बघितल्याबद्दल मारु नका. शिक्षा करु नका. त्याने विसंवाद होईल.
३) वर दिलेले मुला मुलींच्या ताणाचे विषय लक्षात घेऊन त्यांच्याशी बोला. बोलताना आपला आवाज चढणार नाही, रागराग व्यक्त होणार नाही याची काळजी घ्या.
४) लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शरीरसंबंधांचं शिक्षण नाही. शरीराची ओळख, स्वच्छता, गुड टच, बॅड टच इथपासून ऑनलाईन शेअरिंगचे धोके मुलांना सांगायला हवेत. ऑनलाईन जगात गुड टच बॅड टच नसतो. तिथे कुणीच कुणाला स्पर्श करत नाही, तरीही लैंगिक छळ आहे. त्यामुळे मुलांशी अधिक सजग आणि संवेदनशील पद्धतीने बोलायला हवं.
५) किशोरवयीन मुलांमध्ये एकमेकांबरोबर न्यूड्स शेअर करण्याचा ट्रेंड प्रचंड आहे. अशावेळी मुलांकडे कुणी त्यांचे न्यूड्स मागितले तर ते का द्यायचे नाहीत, कुणाकडे न्यूड्स का मागायचे नाहीत तेही सांगायला हवं.
६) सतत पॉर्न बघणाऱ्या मुलांचा फोकस जातो अनेकदा, याची जाणीव करु द्यायला हवी.
७) किशोरवयीन मुलामुलींशी प्रेम-आकर्षण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मुद्यांबद्दल मोकळेपणाने बोललं पाहिजे. त्यांच्या मनात येणाऱ्या शंकांना उत्तर देण्याची तयारी ठेवली पाहिजे.
८) ‘याच साठी दिलाय का मोबाईल?’, ‘हे आपल्या घरातले संस्कार आहेत का?’, ‘आम्ही हेच शिकवलं का तुला?’ अशा प्रकारचे संवाद करु नका. अमर्याद ऍक्सेस असलेलं गॅजेट त्यांच्या हातात आहे. त्याचा वापर ते पालक/शिक्षकांना विचारुन करणार नाहीयेत. आजच्या काळात आपण किशोरवयीन असतो तर आपणही विचारायला गेलो नसतो हे समजून घेणं आवश्यक आहे.