ऑफिस, तिथलं कामाचं वाढतं स्वरुप, रोजच्या रोज येणारे ताण या सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमीच्याच असतात. पण तरीही कधी कधी सवय असूनही या गोष्टींचा अत्याधिक येतो. अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम करणं आदी सर्व गोष्टी आणि बिघडलेल्या जीवनशैलीचे थेट परिणाम शरीरावर होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच ९ ते १२ तासांच्या शिफ्टनंतर व्यायामशाळेत जाणं अनेकांसाठीच आव्हान असतं. परिणामी, अरे पोट सुटलंय, पाठ दुखतेय, अंगदुखी आहे… अशा अनेक समस्या घेऊन आपल्यापैकी अनेकांचं दररोजचं रडगाणं सुरूच असतं. पण, ऑफिसमध्ये ग्रुपने काही व्यायाम तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच रिलॅक्स वाटेल. ऑफिसमध्ये थोडा वेळ काढून व्यायाम केल्यानं डायबिटीजचा धोका कमी होतो, असं निरीक्षण एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. हा कॉर्पोरेट जगतातील सर्वांत मोठं सर्वेक्षण केलेल्या अहवालांपैकी एक आहे.
‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ने पाच राज्यांमधील ११ ऑफिसेसमध्ये सर्वेक्षण केले आणि त्यातून काही बाबी समोर आल्या असून, सामूहिक व्यायाम किंवा कामाच्या ठिकाणी चालणे यामुळे उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, लठ्ठपणा व डायबिटीज यांसारख्या समस्या कमी झाल्या आहेत. ऑफिसच्या वेळेत चालणे किंवा सामूहिक व्यायाम केल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी तीन महिन्यांत सामान्य (नॉर्मल) झाल्याचं यातून समोर आलं आहे.
सर्वे ठरणार फायदेशीर
डायबिटीज स्पेशॅलिस्ट डॉ. व्ही. मोहन यांच्या मते, आहारामध्ये पौष्टिक अन्नाचा समावेश केला पाहिजे. कामाच्या ठिकाणी कॅन्टीनमध्ये अन्ननिवडीला, तसेच शारीरिक हालचालींवर जोर दिला पाहिजे. दररोज फक्त चालल्याने उच्च रक्तदाब १५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. ते पुढे म्हणाले. “हा अभ्यास आता भारतीय कंपन्यांसाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक व फायदेशीर ठरू शकतो.”
१०१ दशलक्ष लोक डायबिटीजने ग्रस्त
डॉ. मोहन यांच्या मते, भारतात १०१ दशलक्ष लोक डायबिटीज आणि ३१५ दशलक्ष लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. कंबरेचा घेर, रक्तदाब, रक्तातील कोलेस्टेरॉल व वजन यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या ११ विविध ऑफिसमध्ये केल्या गेल्या. त्यामध्ये एकूण सहा हजार २६५ कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली असता, १० पैकी नऊ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये लठ्ठपणा आढळून आला. याचा अर्थ तपासण्यात आलेल्यांपैकी निम्म्या व्यक्तींना डायबिटीज होण्याचा मोठ्या प्रमाणात धोका होता; तर एकाला उच्च रक्तदाबाचा धोका होता. तपासणीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय ४६ असून, त्यामध्ये ७७ टक्के प्रामुख्याने पुरुष होते.
हेही वाचा – Exercise Tips: वयानुसार कसे असायला हवे व्यायामाचे प्रमाण? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
डायबिटीजचा धोका साडेचार पटीने कमी
डॉ. डी. प्रभाकरन यांच्या मते, “जेव्हा वजन नियंत्रणात असते तेव्हा डायबिटीजचा धोका साडेचार पटींनी कमी होतो. कामाच्या ठिकाणी थोडासा ब्रेक घेऊन चालणं खूप फायदेशीर ठरू शकतं.”
भारतात डायबिटीज रुग्णांसंबंधीच्या ठळक बाबी
- गेल्या दोन दशकांमध्ये मोठ्याप्रमाणात डायबिटीज रुग्णांमधये वाढ.
- डायबिटीजबद्दल कमी जागरूकता.
- तारुण्यात डायबिटीजचा धोका वाढण्याच्या प्रमाणात वाढ
- हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांमध्ये गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.
- मूत्रपिंड निकामी होणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतूंचे नुकसान