How to stay protected during the flu season : राज्यभरात काही प्रमाणात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. उकाडा कमी झाल्याने ही थंडी काहीशी आल्हाददायक वाटत असली तरी त्याचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये शरीराचे तापमान योग्य राहावे यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा. काय काळजी घ्यावी? यांसारखे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात. तेव्हा काय काळजी घ्यावी याच संदर्भात दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पुण्याच्या मदरहूड हॉस्पिटल आहारतज्ज्ञ सल्लागार, डीटी इंशारा महेदवी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
या ऋतूमध्ये आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतारांमुळे विषाणू आणि आजार नेहमीपेक्षा वेगाने पसरणे सोपे होते. या काळात लहान मुले आणि प्रौढांना अनेकदा खोकला, ताप, फ्लू आणि संसर्ग यांसारख्या हंगामी आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते, असे आहारतज्ज्ञ इंशारा महेदवी यांनी सांगितले.
दिल्लीच्या सी. के. बिर्ला हॉस्पिटलचे संचालक पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विकास मित्तल म्हणाले, “फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होतो, जो लहान मुले, प्रौढ आणि वृद्धांसह सर्व वयोगटांतील लोकांना प्रभावित करतो. फ्लूची लक्षणे सहसा सामान्य सर्दीसारखी दिसतात; परंतु रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो. पाच वर्षांखालील मुले आणि ६० वर्षांवरील प्रौढ – फ्लूमुळे न्यूमोनियासारखी गुंतागुंत होऊ शकते, जी जीवघेणी ठरू शकते.”
फ्लूपासून सुरक्षित राहण्यासाठी सावधगिरीच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्या खालीलप्रमाणे :-
१. शारीरिक अंतर राखणे : गर्दीच्या ठिकाणी इतरांपासून किमान सहा फूट अंतर ठेवा.
२. हाताच्या स्वच्छतेचा चांगला सराव करा : आपले हात नियमितपणे धुवा; विशेषत: चेहरा, नाक किंवा तोंडाला स्पर्श करण्यापूर्वी.
३. तोंड आणि नाक झाकून घ्या : खोकताना किंवा शिंकताना टिश्यू किंवा रुमालाचा वापर करा.
४. मास्क वापरा : एखाद्या व्यक्तीला सर्दी किंवा फ्लूची लक्षणे असल्यास, मास्क घातल्याने विषाणूचा प्रसार रोखता येतो.
त्याशिवाय प्रतिकारशक्ती मजबूत करणेही महत्त्वाचे आहे, असे डॉ. मित्तल यांनी सांगितले.
दैनंदिन पौष्टिक आहार घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होऊ शकते, जी या आरोग्यविषयक गुंतागुंतीविरुद्ध लढण्यासाठी एक ढाल म्हणून काम करू शकते. दैनंदिन आहारात विशेषतः रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे पोषक पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१. शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे.
२. रोगप्रतिकार शक्तीला आधार देण्यासाठी पुरेशी झोप घेणे.
३. तणावाचे प्रभावी व्यवस्थापन.
४. भरपूर उबदार द्रव्य पिऊन हायड्रेटेड राहणे.
५. वायुप्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करणे; ज्यामुळे श्वसनाच्या समस्या वाढू शकतात.
हे उपाय फ्लूच्या हंगामात लक्षणीय आहेत, जे सामान्यतः ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे फ्लू आणि त्याची संभाव्य गुंतागुंत होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.