– डॉ. राजेश पवार, नेत्रतज्ज्ञ

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये माणसाला स्वत:कडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नाही. अगदी काही दुखायला-खुपायला लागले की मग धावपळ चालू होते. आणि मग अतिशय क्षुल्लक लक्षणाचे रूपांतर मोठ्या आजारात होते. आणि आजारपण आले की मग मात्र पर्याय नसल्यामुळे बरे वाटेपर्यंत खूप वेळ द्यावा लागतो. कामाचा खोळंबा होतो. या सर्वांचा परिणाम म्हणून आरोग्य, वेळ आणि पैसा या सर्वच गोष्टींचा अपव्यय होतो. म्हणून आपल्या भारत देशात भौगोलिक रचनेनुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे जे तीन महत्त्वाचे ऋतू येतात, त्या त्या ऋतूंमध्ये आरोग्याच्या काळजीसोबत डोळ्यांचीदेखील काळजी आपण व्यवस्थित घेऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळा :

प्रखर उन्हामुळे आणि उष्णतेमुळे विविध नेत्रविकार संभवतात. यात डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, डोळ्यांत खुपल्याप्रमाणे वेदना होतात. यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी उन्हामध्ये जाताना गॉगल्स वापरावेत.

हेही वाचा – खराब कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यासाठी दिवसाला किती बदाम खावे? डॉक्टरांनी सांगितले, “प्रत्येक जेवणाआधी…”

  • वारंवार थंड पाण्याने डोळे धुवावेत. अथवा थंड पाण्याच्या कापडी पट्ट्या ठेवाव्यात.
  • हल्ली ड्राय आइस असलेले फ्रीजमध्ये ठेवता येणारे गॉगल उपलब्ध असतात, ते डोळ्यांवर बाहेरून ठेवून डोळे मिटून शांत बसावे.
  • प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे.
  • उन्हाळ्यामध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढून त्याचा डोळ्यांमध्ये रक्तस्राव होऊन अंधत्व येऊ शकते. तेव्हा आपल्या सर्वच आजारांची योग्य ती औषधे चालू ठेवावीत.

पावसाळा :

पावसाळ्यामध्ये एकूणच आजारांचे प्रमाण वाढलेले असते. पाणी आणि पाण्यापासून होणारे आजार उद्भवतात. यात डोळ्यांमध्ये जंतूचा संसर्ग होऊन डोळे येणे, डोळे लाल होणे, खाजणे इत्यादी लक्षणे उद्भवतात.

  • यासाठी डोळ्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्यास पुन्हा डोळे साध्या पिण्याच्या पाण्याने धुवावेत.
  • डोळ्यांत चिकटपणा, घाण येत असल्यास मात्र नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आणि वेळेतच योग्य तो औषधोपचार करावा.

पावसाळ्यामध्ये पापण्यांवर रांजणवाडीचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात येते. रांजणवाडी झाल्यास कोमट पाण्यात कापूस किंवा स्वच्छ कापड बुडवून त्या गरम कापसाने रांजणवाडीची गाठ शेकावी. त्याचप्रमाणे इतर कोणतेही घरगुती उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधे वापरावीत.

हिवाळा :

हा ऋतू सर्वतोपरी आरोग्यदायी असतो. आजारांचे प्रमाण कमी असते. काही व्यक्तींमध्ये थंडीमुळे सर्दी, खोकला आणि त्या अनुषंगानुसार घसा दुखणे याच्यासोबत डोळ्यांतून सतत पाणी वाहते.

हेही वाचा – अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? खरंच वाढतो हृदयविकाराचा धोका? जाणून घ्या

  • यासाठी प्रामुख्याने रात्री झोपतेवेळी गरम पाण्याची वाफ नाकाद्वारे हुंगावी. असे केल्यास डोळ्यांच्या नाकाकडील कोपर्‍यांमधून नाकामध्ये पाणी उतरणारी फ्रेश नलिका जी थंडीमुळे अर्धवट बंद असते, ती उघडण्यास मदत होते. आणि पाणी डोळ्याबाहेर न वाहता पूर्ववत मार्गस्थ होते.
  • अतिथंड हवा डोळ्यांना लागल्यामुळेदेखील डोळ्यांतून पाणी येते. यासाठी संरक्षण गॉगल वापरावा. अशा प्रकारे तिन्ही ऋतुंमध्ये डोळ्यांची काळजी घेतल्यास या महत्त्वाच्या अवयवासाठी फार चिंता करत बसण्याची वेळ येणार नाही.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to take care of eyes according to season dc ssb