How to Vaccinate Dog : काही महिन्यांपासून कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार होऊ शकतो. त्यामुळे त्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. कधी व कोणता कुत्रा आपल्याला चावेल, हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे कुत्र्यांचे लसीकरण केलेले असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. पाळीव कुत्र्यांचे लसीकरण कसे करतात, याविषयी अकोला येथील ‘पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी अॅण्ड ॲनिमल सायन्स’चे सहअधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी ‘लोकसत्ता‘शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
पाळीव कुत्र्याचे लसीकरण कसे करतात?
डॉ. धनंजय दिघे सांगतात, “रेबीज आजाराचे गांभीर्य समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. या आजारावर वेळेवर योग्य ते उपचार केले नाहीत, तर माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अशा वेळी कुत्र्याचं लसीकरण करणं आवश्यक आहे. पाळीव कुत्र्याचं लसीकरण करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना, सरकारी दवाखाना, शहरामध्ये काही खासगी दवाखानेसुद्धा असतात किंवा महापालिकेचे दवाखाने असतात तिथे लसीकरण केलं जातं.
“लसीकरणाचा प्रभाव हा तीन वर्षांसाठी असतो; पण आपल्या देशामध्ये रेबीज हा आजार खूप सामान्य असल्यामुळे प्रत्येक वर्षी लसीकरण करणं गरजेचं आहे. प्रत्येक पाळीव प्राण्याचं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांचंही लसीकरण करणं गरजेचं आहे.”
हेही वाचा : कुत्रा चावल्यानंतर तातडीने काय करावे? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
कुत्र्याचे लसीकरण झाले की नाही हे कसे ओळखायचे?
डॉ. दिघे सांगतात, “कुत्र्याचं लसीकरण झालं की नाही हे ओळखता येणार नाही. पाळीव कुत्र्याला जर आपण खासगी दवाखान्यात किंवा सरकारी दवाखान्यात लसीकरणासाठी नेले, तर लसीकरण केल्याबाबत ते एक पुस्तक किंवा प्रमाणपत्र देतात. अशा प्रकारे प्रमाणपत्राच्या साह्यानं आपण सांगू शकतो की, कुत्र्याचं लसीकरण झालं आहे; पण रस्त्यावरच्या कुत्र्यांचं लसीकरण केलं असेल, तर जो कोणी त्यांचा केअरटेकर असतो किंवा या कुत्र्यांची काळजी घेणारे असतात त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल. ते लोक आपल्याला सांगू शकतात की, या कुत्र्यांचं लसीकरण केलं आहे की नाही.”
डॉ. दिघे पुढे सांगतात, “खरं तर आपल्या देशामध्ये एवढ्या सोई-सुविधा नसल्यामुळे रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचं लसीकरण केलं जाण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे भटका कुत्रा चावतो तेव्हा गृहीतच धरावं की, हा लसीकरण न केलेला कुत्रा आहे. अशा वेळी कुत्रा चावल्यानंतर लसीकरण आणि उपचारांचा कोर्स पूर्ण करावा.”
लसीकरणाचा खरेच फायदा होतो का?
कुत्र्यांचे लसीकरण किती गरजेचे आहे याविषयी सांगताना डॉ. दिघे म्हणतात, ” एखाद्या कुत्र्याचं लसीकरण झालं आहे आणि त्यानंतर तो कुणाला चावला, तर त्यामुळे होणाऱ्या रेबीज आजाराचा धोका कमी होतो. कुत्र्याचं लसीकरण केल्यामुळे १०० टक्के फायदा होतो. चावण्याचा आणि लसीकरणाचा काहीही संबंध नाही. पिसाळलेला कुत्रा असो किंवा त्याला कोणी कुत्र्याला डिचवलं, तर कुत्रा हल्ला करणार; पण कुत्रा चावल्यानंतर आपण स्वत: काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.”