Which Morning Walking Routine is Best : चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे, त्यामुळे अनेक जण चांगल्या आरोग्यासाठी सकाळी नियमित चालतात. पण, तुम्ही हळू चालता की वेगाने चालता हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का सकाळी हळू चालणे अधिक फायदेशीर ठरू शकते. लेखक हॅबिट कोच आणि कंटेंट क्रिएटर अश्दिन डॉक्टर हे राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये याविषयी सांगतात.
सकाळी उपाशी पोटी हळू चालल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि स्नायू ग्लायकोजेन वापरण्यास सुरुवात करते, त्यानंतर तुमच्या स्नायूमध्ये साठवलेली साखर तुमच्या रक्तात वापरण्यास सुरुवात होते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते, असे अश्दिन डॉक्टर सांगतात.
ते पुढे सांगतात, “सकाळी चालताना व्हिटॅमिन डी मिळते. शरीराला रक्तातील साखरेच्या प्रक्रियेबाबत संवेदनशील बनवते, जेणेकरून रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यास किंवा घटल्यास शरीर लगेच प्रतिक्रिया देते, ज्यामुळे रक्तातील साखरेची योग्य पातळी राखली जाते. या एका सवयीचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी हा एक सर्वात महत्त्वाचा फायदा मानला जातो.”
द इंडियन एक्स्प्रेसनी याविषयी तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेतला.
मुंबईच्या परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अनुप खत्री सांगतात, “उपाशी पोटी हळू चालणे हा दिवसाची सुरुवात करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. अनेक लोक तीव्र प्रकारचा व्यायाम आणि शारीरिक हालचालीसाठी तयार नसतात. त्यांना हलके व्यायाम करायला आवडते. अशा वेळी हळू चालणे अधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे रक्ताभिसरण सुधारू शकते, तसेच सांध्यांवर दबाव न येता तुमची ऊर्जा पातळी वाढू शकते; यासह अनेक फायदे होऊ शकतात.”
चालण्यासाठी कोणत्याही विशिष्ट सेटअपची आवश्यकता नाही.
“तुम्हाला फक्त घरातून बाहेर पडून सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये, टेरेसवर, ड्रॉईंग रूममध्ये किंवा जवळच्या गार्डनमध्ये जावे लागेल. पार्कमध्ये सकाळी फिरण्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटू शकते. सकाळी चालताना सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे शरीरात पुरेसे व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते. व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे,” असे डॉ. खत्री पुढे सांगतात.
डॉ. खत्री सांगतात की, हळू चालण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते, पण त्याबरोबरच तणावसुद्धा कमी होतो आणि एकूण मूड सुधारण्यास मदत होते. हळू चालणे ही एक चांगली फायदेशीर सवय आहे, जी अगदी सोपी आहे आणि सर्व वयोगटातील लोक ही सवय अंगीकारू शकतात.