How You Climb Stairs : स्वयंचलित जिने, लिफ्ट यांच्यामुळे सध्या पायऱ्या चढणे-उतरणे अनेकांचे कमी झाले आहे. पण, असे असले तरीही काही ठिकाणी मात्र पायऱ्यांचा वापरच करावा लागतो. अशावेळी आपण दम लागेल म्हणून फास्ट चढत जातो, तर कधी मजा-मस्तीत एक पायरी सोडून थेट तिसऱ्या पायरीवर पाय ठेवतो. तर कधी अगदी रमत-गमत चढतो. पण, तुम्हाला माहिती आहे का? चुकीच्या पद्धतीने पायऱ्या चढल्या व उतरल्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. याचबद्दल या बातमीतून जाणून घेऊया…

पायऱ्या चढणे ही एक नियमित क्रिया (regular activity) आहे. पण, जर ती योग्यरित्या केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात; असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. इन्स्टाग्राम रीलमध्ये, ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर राजीव राज चौधरी यांनी चुकीच्या पद्धतीने पायऱ्या चढण्याच्या आसनामुळे सांध्यांवर कसा ताण येऊ शकतो हे दाखवून दिले आहे. त्यामध्ये “पायऱ्या चढताना अर्धा पाय पायऱ्यांवर ठेवण्याऐवजी, पूर्ण पाय ठेवणे महत्त्वाचे आहे” असे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच पायऱ्या चढताना पायाच्या बोटांना कोणतेही वजन जाणवू देऊ नये. पायऱ्या चढताना रेलिंगचा आधार घेणेदेखील चांगले आहे. वर चढताना मजबूत पाय आधी ठेवा, तर पायऱ्या उतरताना नेहमीच कमकुवत पाय आधी ठेवा. कारण चुकीच्या पद्धतीने चढ-उतार केल्याने सांधेदुखी होऊ शकते, विशेषतः गुडघ्यांमध्ये; असे डॉक्टर चौधरी म्हणाले आहेत.

याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही परळ, मुंबईच्या ग्लेनीगल्स हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्सचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर अनुप खत्री यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी डॉक्टर चौधरी यांच्या मताशी सहमती दर्शविली आणि सांगितले की, पायऱ्या चढताना सरळ चढणे-उतरणे महत्त्वाचे असते. बहुतेक लोक पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करताना घाई करण्याचा प्रयत्न करतात. घाई करण्याऐवजी हळू चाला, यामुळे तुमच्या गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते; असे डॉक्टर खत्री म्हणतात.

जर तुमचे गुडघे कमकुवत असतील किंवा गुडघ्याशी संबंधित जुनाट समस्या असतील तर पायऱ्या चढताना आधारासाठी रेलिंग वापरणे उपयुक्त ठरू शकते. शक्य असल्यास, चढताना जास्त भार किंवा वजन वाहून नेणे टाळा, कारण त्यामुळे तुमच्या गुडघ्यांवर आणि कंबरेवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे ताण पडून वेदना निर्माण होऊ शकतात; असे डॉक्टर खत्री म्हणाले आहेत.

तसेच डॉक्टरांनी योग्य, उच्च दर्जाचे शूज वापरण्याचा सल्ला दिला आहे. ज्या शूजला आतून चांगले कुशन केलेले असेल आणि त्याच्यामध्ये चांगली पकडसुद्धा असते असे शूज वापरा. जर तुम्हाला पायऱ्या चढताना तुमच्या सांध्यांमध्ये वेदना जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ते विविध अंतर्निहित आरोग्य समस्या दर्शवू शकते. जर या समस्यांना किरकोळ म्हणून दुर्लक्ष केल्यास तुमच्या वेदनेत आणखी वाढ होऊ शकते; असे डॉक्टर खत्री म्हणाले आहेत.

लक्षात घेण्याजोग्या गोष्टी…

डॉक्टर खत्री यांनी निदर्शनास आणून दिले की, ४५ मिनिटे शारीरिक हालचाली किंवा कसरत केल्याने तुमचे गुडघे मजबूत होण्यास मदत होते. तसेच इतर आरोग्यदायी फायद्यांचाही यात समावेश आहे. सतत हालचाल केल्याने गुडघ्यांमध्ये रक्त प्रवाह वाढण्यास मदत होऊ शकते. गंभीर दुखापतीनंतर जलद बरे होण्यासाठी हे प्रभावी ठरू शकते. जर तुमची हालचाल मर्यादित असेल तर तुमच्या गुडघ्यांना अस्थिबंधनाचे (ligament) नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. जर तुम्ही तुमचा गुडघा हलवू शकत नसाल किंवा प्रत्येक वेळी हालचाल करताना वेदना होत असतील तर तज्ञांचा सल्ला घ्या; असे डॉक्टर खत्री म्हणाले आहेत.