Chewing Gum Side Effects : अनेकांना च्युइंगम चघळण्याची सवय असते. कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अनेकांमध्ये ही सवय पाहायला मिळते. यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होत ताजा श्वास घेता येतो तसेच एकाग्रता वाढते. पण, लॉस एंजेलिसमधील (UCLA) च्या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका संशोधनातून असे दिसून आले की, चघळत असलेल्या प्रत्येक च्युइंगमच्या तुकड्यातून नकळत तुम्ही हजारो लहान प्लास्टिकचे तुकडे गिळत आहात. हे मायक्रोप्लास्टिक्स शरीरात जाऊन तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतात.
पूर्वी झाडाच्या रसापासून तयार केले जाणारे मूळ च्युइंगम मिळायचे, पण आता मिळणारे च्युइंगम हे अनेकदा प्लास्टिकचे आहेत. यात आजकाल बहुतेक च्युइंग गममध्ये पॉलिथिलीन आणि पॉलीव्हिनिल एसीटेटसारखे सिंथेटिक पॉलिमर असते, जे बहुतेकदा प्लास्टिकच्या पिशव्या आणि गममध्ये वापरले जाते. तुम्ही च्युंइगम चघळता तेव्हा घर्षण आणि लाळेमुळे त्यात मिसळलेल्या फ्लेवर्सचे विघटन होते, ज्यानंतर त्यातील हजारो लहान प्लास्टिकचे कण तुमच्या तोंडात जातात. हे कण लाळेत मिसळतात आणि शरीराद्वारे गिळले जातात किंवा शोषले जातात, असे गुरुग्राम येथील आर्टेमिस हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी आणि सायबरनाइफचे संचालक डॉ. आदित्य गुप्ता म्हणाले.
सध्या च्युइंगममधील प्लास्टिक कणांवर फारसे संशोधन झालेले नसले तरी मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात आल्यानंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात गेल्यास मेंदूच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. मायक्रोप्लास्टिक आतड्यातील अस्तर तसेच काहीवेळा रक्तवाहिन्या आणि मेंदूतील अवयवांमध्ये अडथळा निर्माण करते. तसेच मज्जासंस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होण्याचीदेखील शक्यता असते.
संशोधनातून आली धक्कादायक माहिती
आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, प्रत्येक एक ग्रॅम च्युंइगममधून १०० मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडते. काही च्युंइगमच्या प्रति एक ग्रॅममधून ६०० मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडते. म्हणजे जर च्युंइगमचा तुकडा मोठा असेल तर त्यातून १,००० पेक्षा जास्त मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडू शकते, जे आपण अनेकदा गिळतो, त्यामुळे ही चिंताजनक बाब आहे.
मायक्रोप्लास्टिक्स मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?
मायक्रोप्लास्टिक्समध्ये शरीरात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करण्याची क्षमता असते, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत जळजळ जाणवू शकते. तसेच मेंदूमध्ये त्रास जाणवू शकतो, अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो. मायक्रोप्लास्टिक्सच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडेटिव्ह ताणदेखील वाढू शकतो, ही प्रक्रिया मज्जातंतूंच्या पेशींना हानी पोहोचवते आणि मेंदूचे वृद्धत्व वाढवते. कालांतराने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे न्यूरोलॉजिकल आजार वाढू शकतात.
काही च्युंइगममधील मायक्रोप्लास्टिक हे मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. याचा मूड, आकलनशक्ती आणि अगदी स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. च्युंइगममधून निघणारे मायक्रोप्लास्टिकचे दीर्घकालीन परिणाम सर्वांनाच माहीत असतील तर त्याच्या सततच्या वापराने मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो.
मायक्रोप्लास्टिक्सच्या दीर्घकाळ संपर्कात राहणे किती हानिकारक आहे?
मज्जासंस्था हा खूप संवेदनशील भाग मानला जातो, ज्याच्यावर बाहेरील गोष्टींचा लवकर परिणाम होतो. प्राण्यांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात आल्याने आकलनशक्ती, स्मरणशक्ती आणि मोटर कौशल्यांवर परिणाम होऊ शकतो. मानवी संशोधनात प्रगती होत असली तरी संभाव्य धोक्यांबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे, विशेषतः ज्यांना सतत च्युंइगम चघळण्याची सवय आहे.
च्युंइगममुळे शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात हे ओळखण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे, पण प्लास्टिक-आधारित च्युइंगमचा वापर कमी करणे ही एक चांगली कल्पना असू शकते.
गम पर्यायांबद्दल काय?
वनस्पतींच्या रेझिन, चिकलपासून बनवलेल्या नैसर्गिक च्युंइगमचा वापर करा, यामुळे मायक्रोप्लास्टिकच्या कमी संपर्कात याल.