Sleep : झोप हा माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे. चांगली झोप झाली असेल तर माणसाचे आरोग्यही निरोगी आणि चांगले राहते. असे अनेकदा म्हटले जाते की माणूस अन्नाशिवाय जगू शकतो पण झोपेशिवाय नाही.
अपूर्ण झोपेमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात आणि आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ञ सांगतात.
Know Your Body series या ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या खास सिरीजमध्ये जेवणाबरोबर झोपेचे महत्त्व सांगितले आहे.
मुंबईच्या नानावती मॅक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधील आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ उषाकिरन सिसोदिया सांगतात, “हे खरंय. माणूस अन्नाशिवाय झोपेच्या तुलनेत अधिक काळ जीवंत राहू शकतो. सिसोदिया सांगतात, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की माणूस अपुरी झोप ही उपासमारीपेक्षा जास्त शरीरासाठी आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा आपण उपाशी असतो तेव्हा आपले शरीर आपल्या शरीरात साठवलेल्या ग्लुकोजचा वापर करते आणि शरीरातील फॅटी अॅसिड आणि प्रोटीन्स शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतात. एखाद्याद्या व्यक्तीला ऊर्जा कमी पडू शकते पण भरपूर पाणी प्यायल्यानंतर माणूस न जेवण करता अनेक आठवडे जगू शकतो.
हेही वाचा : सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो? वाचा, तज्ज्ञ …
सिसोदिया पुढे सांगतात, झोपेला कोणताही पर्याय नाही. कमी झोपेमुळे शरीरावर गंभीर परिणाम पडू शकतात आणि माणसाची प्रतिकारशक्तीसुद्धा कमकुवत होऊ शकते. जितका वेळ झोप होणार नाही त्या काळात माणसाला शारीरिक समस्या, सतत मुड बदलणे, भास होणे आणि एवढंच काय तर मृत्यूचाही धोकाही वाढतो. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी चांगली झोप अत्यंत गरजेची आहे.
झोपेविषयी अधिक जाणून घेऊ या-
हैद्राबाद येथील कामिनेनी हॉस्पिटलचे वरिष्ठ सामान्य चिकीत्सक डॉ. जे हरीकिशन सांगतात, “झोप हा आरामाचा काळ नसतो. या कालावधीत शरीरात प्रक्रिया सुरू असते. जे शरीर repair, regenerate आणि restore करण्याचा प्रयत्न करते.”
डॉ. जे हरीकिशन पुढे सांगतात, “झोपेदरम्यान शरीरातील टिश्यूंची वाढ होणे आणि खराब झालेले टिश्यू सुधारणे, हार्मोन्सचे नियमन, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आणि स्मरणशक्ती एकत्र करुन अधिक मजबूत करणे, इत्यादी अनेक बायोलॉजिकल प्रक्रिया सुरू असतात. या सर्व प्रक्रिया शरीराला चांगले प्रकारे काम करण्यास मदत करतात.”
हेही वाचा : जर एक महिना साखर खाल्ली नाही तर तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
माणूस झोपेशिवाय नाही तर अन्नाशिवाय जास्त काळ जीवंत राहू शकतो, हे विधाने जरी अतिशयोक्ती वाटत असले तरी ते खरे आहे. डॉ हरिकिशन यांविषयी सांगतात, माणूस जेवण न करता दीर्घकाळ टिकू शकते पण झोपेशिवाय नाही. यामागे त्यांनी काही कारणे सांगितली आहेत. चला तर जाणून घेऊ या.
ऊर्जा संवर्धन (Energy conservation): जेव्हा एखादा व्यक्ती दिर्घकाळ जेवण करत नाही तेव्हा जीवंत राहण्यासाठी शरीरातील साठवलेले ग्लुकोज आणि फॅट्सचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जातो.
चेतना पुनर्संचयित करणे ( Vitality restoration): झोपेदरम्यान शरीरात प्रक्रिया सुरू असते ज्यामुळे शरीरात चेतना पुनर्संचयित करण्यास मदत होते. झोप अपूर्ण झाल्यामुळे शरिराची कार्यक्षमता मंदावते.
अशक्तपणा (Cognitive impairment): अपूर्ण झोपेमुळे शरीरात अशक्तपणा खूप वाढतो. एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमतेवरही याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. जास्त काळ झोपशिवाय राहिल्याने अपघात होणे, छोट्या मोठ्या चुका होणे आणि कार्यक्षमता मंदावणे , असे दुष्परिणाम दिसू शकतात.
मानसिकदृष्ट्या निरोगी (Psychological well-being): मानसिक आरोग्य आणि भावनांवर नियंत्रण साधण्यासाठी झोप ही महत्त्वाची आहे. दीर्घकाळ झोप न घेतल्यामुळे स्ट्रेस वाढतो आणि माणूस ड्रिप्रेशनचा शिकार होऊ शकतो ज्यामुळे मानसिक आजार होण्याचा धोका सुद्धा वाढतो.
हेही वाचा : Monsoon Health : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करावे? तज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स!
डॉ. हरिकिशन सांगतात की चांगल्या आरोग्यासाठी आणि झोपेसाठी काही गोष्टी फॉलो करायला पाहिजे.
झोपेची वेळ : प्रोढ व्यक्तींना ७ ते ९ तास रात्रीच्या झोपेची आवश्यकता असते. तर किशोरवयातील आणि लहान मुलांना त्यापेक्षा जास्त झोपेची गरज असते. तुमच्या झोपेची गरज पूर्ण करा आणि त्यामध्ये सातत्य ठेवा.
कमी झोप टाळा : आपण सर्वांनी झोपेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. दैनंदिन दिनचर्येला महत्त्व द्या. झोपेत अडथळा निर्माण करणाऱ्या सवयी सोडा. कॅफिनचे अति सेवन करू नका, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा आणि सर्वात महत्त्वाचे झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, टाळा.
डॉक्टरांशी संपर्क साधा – जर तुम्हाला झोपेसंबंधीत समस्या जसे की झोप न येणे, अति झोपणे इत्यादी गोष्टींचा त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.