डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
Importance of Communication in Marriage पती-पत्नी नात्यामधील माधुर्य हे त्यांच्यातील मित्रत्वाच्या नात्यानेच फुलत असते. म्हणूनच पती-पत्नी नात्यातील मैत्रीची चार प्रेमसूत्रे आत्मसात करणे आवश्यक आहे.
१. जोडीदाराकडे लक्ष द्या :
बऱ्याचदा तुम्ही जोडीदाराकडे बारकाईने लक्ष ठेवून असताच, पण काळजीपूर्वक लक्ष द्यायला शिका. कारण तुम्ही जर तसे केले नाही, तर दुसरा कोणीतरी टपलेलाच असतो हे जाणून घ्या. यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. तुमची जीवनाविषयीची मानसिकता बदलणे आणि तुमची वैवाहिक जीवनाविषयीची मानसिकता बदलणे. आयुष्यात आपण कष्ट घेत असतो ते उद्याचा दिवस आनंदात जावा म्हणून. पण जेव्हा तो उद्याचा दिवस उगवतो, तेव्हा तो आनंदात न घालवता आपण पुन्हा एकदा कष्ट घ्यायला लागतो तो पुढचा ‘उद्या’ आनंदात जावा म्हणून! अशा व्यक्तींना आपण ‘वर्कोहोलिक’ म्हणतो. हेही एक दाम्पत्य जीवनावर दुष्परिणाम करणारे व्यसनच असते. अशा व्यक्ती आपल्या जोडीदारापेक्षा आपल्या बॉसचाच चेहरा जास्त काळ बघण्यात वेळ घालवतात किंवा जोडीदाराबरोबर असतानाही त्यांचे ‘मोबाइल ऑफिस’ चालूच असते. जर हे वारंवार घडत असेल तर ते पती-पत्नी नातेसंबंधाला घातकच ठरते.
‘टार्गेट ओरिएंटेड’ आयुष्य जगणाऱ्यांनी लक्षात ठेवावे तुमची कंपनी तुमच्याशिवायही चालू राहत असते, पण तुमचे वैवाहिक जीवन नाही! माझ्या माहितीतील पस्तिशीतील एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अशा ‘टार्गेट’ पूर्ण करण्याच्या धकाधकीच्या प्रयत्नांमध्ये हार्ट अॅटॅक येऊन वारला तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या कंपनीने त्याला दोन मिनिटांची श्रद्धांजली वाहून कामकाज पुढे सुरू केले, पण त्याची गरोदर पत्नी मात्र उद्ध्वस्त झाली होती…
दिवसाचे चार कप्पे
म्हणूनच दिवसाचे चार कप्पे करा. एक कप्पा स्वत:साठीचा, जो तुम्ही व्यायाम, छंद यासाठी वापरा. दुसरा कप्पा करिअरचा. तिसरा फॅमिलीसाठी आणि चौथा जोडीदारासाठीचा. यामध्ये कामजीवन, सहजीवन यासाठीचा वेळ तुम्ही काढू शकता. प्रत्येक कप्प्यासाठीचा वेळ हा कितीही कमी-जास्त ठरवू शकता. पण रोज हे चार कप्पे जगायचेच असे ठरवा. यामुळे तुम्ही धर्म, अर्थ व काम या तीनही जबाबदाऱ्या पार पाडू शकाल.
वैवाहिक जीवनात हव्यास नको
आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी नेहमीच एकतर महाग असतात, बेकायदेशीर असतात, आरोग्याला हानिकारक असतात नाहीतर दुसऱ्याशी लग्न झालेल्या असतात. वैवाहिक जीवनात मात्र ही हव्यास-मानसिकता, ग्रीड सायकॉलॉजी बदलणे समाधानी दाम्पत्य जीवनासाठी आवश्यक असते. कित्येकांना आपल्या जोडीदारापेक्षा इतरत्रच आकर्षण वाटत असल्याने वैवाहिक जीवनातील बंध कमजोर होत राहतात.
भेटवस्तूंचा परिणामकाळ
छोट्या छोट्या रोमँटिक भेटवस्तूंनी वैवाहिक जीवनाचे आयुष्य वाढत असते. प्रत्येक रोमँटिक भेटवस्तूच्या भेट-गुणाची नोंद बायकोच्या मेंदूत होत असते, हे नवऱ्याने लक्षात ठेवावे आणि आश्चर्य म्हणजे ती भेटवस्तू किती मोठी, किती महाग याचा संबंध न ठेवता तिच्याकडून प्रत्येकी एक भेट-गुण दिला जात असतो. म्हणजे एक गुलाब दिला तरी एक भेट-गुण व गुलाबांचा गुच्छ दिला तरी एकच गुण! दागदागिने, गाडी यांसारख्या भेटवस्तूंनीही प्रत्येकी एकाच भेट-गुणाची नोंद तिच्या मेंदूत होत असते. फक्त छोट्या भेटवस्तूंपेक्षा अशा गोष्टींचा ‘परिणाम काळ’ हा जरा जास्त असतो इतकेच. नोंद केल्या गेलेल्या भेट-गुणांचा संबंध नंतरच्या कामजीवनाशी जोडला जातो हेही पुरुषाने लक्षात ठेवले पाहिजे.
२. तडजोड : वास्तवाशी व स्वभावाशी
तडजोडीने जोडीदार जोडला जात असतो, न केल्यास तो तोडला जात असतो. आदर्शवाद हा कधीही वास्तववादी नसतो, पण आयुष्य मात्र वास्तववादीच असते. ‘आदर्श जोडपे’ कुठलेही नसते. अनुरूपता दिसण्यात असेल, पण वागण्यात, स्वभावात ती कधीच आढळत नसते. म्हणून आदर्श जोडीदाराच्या अपेक्षेने आपल्या जोडीदाराकडे बघणे हे निराशा निर्माण करणारेच असते.
अपेक्षा व्यवहार्य ठेवा
अपेक्षाभंग हेच कित्येक उद्वेगलेल्या जोडप्यांचे मूळ कारण असते. वैवाहिक जीवनात अपेक्षा या असतातच, किंबहुना त्या असाव्यातही; परंतु आपल्या जोडीदाराच्या मर्यादा व परिस्थितीचे वास्तव ओळखूनच त्या ठेवल्या तर अपेक्षा व्यवहार्य ठरतील. इतरत्र बघून तुलनात्मक अपेक्षा ठेवणे म्हणजे दाम्पत्य जीवनाच्या स्थिरतेला सुरुंग लावण्यासारखेच असते. जोडीदाराच्या कमजोरी स्वीकारूनच वैवाहिक आयुष्य काढणे आवश्यक असते.
अॅडजस्ट करा
लग्न करणाऱ्या दोन्ही व्यक्ती मुळात वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या असतात, त्यांचे विचार, कल्पना या पूर्णपणे भिन्नच असतात. पण लग्नसंस्थेमुळे ते एकत्र आयुष्य काढत असतात. लग्न म्हणून केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन व्यक्तिमत्त्वांचे असते. एकत्रपणामुळे जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाची नकारात्मक बाजूही प्रकर्षांने लक्षात येत असते, हे घडणारच असते. त्यामुळे निराशा, उद्विग्नता, राग, चीड यांना थारा न देता आपण एकमेकांना कसे अॅडजस्ट होऊ हे दोघांनीही पाहिले पाहिजे. एकमेकांशी चर्चा, गप्पा, संवाद हे त्यासाठी महत्त्वाचे साधन असते. गरज लागल्यास काउन्सेलिंगचा आधार घ्यावा.
३. सुसंवाद कला विकसित करा :
बहुतेक दाम्पत्यांना लग्न म्हणजे इतरांशी भांडण्यापासून दूर ठेवण्यासाठी समाजाने केलेली एक महत्त्वाची उपाय-योजनाच वाटते. सु-संवादापेक्षा वि-संवादात पती-पत्नींचा वेळ जात असतो. सुसंवाद ही एक कला असून ती विकसित करण्यासाठी विशेष कष्ट दोघांनीही घेणे गरजेचे असते. सततची भुणभुण (नॅगिंग), उगीचच चिडवणे (टीझिंग), टोमणे मारणे (टाँटिंग) आणि वाद (आर्ग्युमेंट) हे विसंवादाचे प्रकार आहेत.
वादात खूश व्हायचंय की रात्री?
बहुतेक वाद अत्यंत क्षुल्लक कारणांनी होतात हे ओळखून ते ताणले जाणार नाहीत हे बघा. वाद करताना आपण आपल्या जिवलग व्यक्तीशी तो करतोय हे नेहमी ध्यानात ठेवा. कारण वादामुळे तुम्ही मुद्दा जिंकालही, पण त्यातील जहालपणामुळे तुम्ही त्या व्यक्तीची आपुलकी गमवाल. एका बायकोने नवऱ्याच्या अशा नेहमीच्या हमरीतुमरीच्या सवयीला कंटाळून शेवटी त्याला एकदा विचारले, ‘तुला आत्ता वादात खूश व्हायचंय की रात्री?’
सुसंवाद एक कला
सुसंवादासाठी जसं आपलं म्हणणं नीट मांडण्याची गरज असते, तशीच आवश्यकता आपल्या जोडीदाराचे म्हणणे ऐकण्याची. म्हणून सुसंवाद एक कला आहे. जोडीदाराचा विचार तुमच्या विचारापेक्षा वेगळा विचार असला तरी तो योग्य असू शकतो. कोणाचेही म्हणणे बरोबर की चूक यापेक्षा त्या वेळी काय योग्य किंवा काय अयोग्य हे लक्षात घेणे आवश्यक असते. बहुतांशी गोष्टी किरकोळ महत्त्वाच्या असतात. महत्त्वाच्या मुद्द्यावर योग्य व्यक्तीचे मत घेणे वा समुपदेशन करणे जरुरीचे असते.
४. रोमँटिक व्हा :
मुळात कामजीवन हाच वैवाहिक जीवनाचा पाया असल्याने त्याला दुर्लक्षून वैवाहिक जीवन हे विफल ठरण्याची शक्यता असते. मग इतरही गुंतागुंत होऊन निराशा व उदासीनता येण्याची शक्यता असते. कामजीवनाचे शास्त्र जाणून घेऊन आपल्यामध्ये योग्य तो बदल करणे महत्त्वाचे असते, कारण जोडीदाराला एकटेपणा वाटू न देणे ही तुमची जबाबदारी असते. उदासलेल्या कामजीवनाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मधूनमधून आउटिंग किंवा मैत्री-सहल करणे पती-पत्नींच्या दृष्टीने आवश्यक असते. जवळपासच्या ठिकाणी केवळ रात्रीपुरते वा दिवसभरासाठी दोघांनी जाण्याने कित्येकदा त्यांच्या कामजीवनात श्रृंगारिकतेचा ‘स्पार्क’ यायला मदत होत असते.
‘काम’चुकारपणा नको
सेक्स हे निसर्गाचे वरदान असून वैवाहिक जीवनात हे वरदान उपभोगण्याचा हक्क आपल्या जोडीदाराला निश्चितच आहे हे जाणून घ्या. ‘काम’चुकारपणा करून तुम्ही तो त्याच्याकडून हिरावून घेणे म्हणजे वैवाहिक अशांततेला आमंत्रित करणेच. कित्येकदा पुरुष ‘काम, काम आणि काम, कामजीवनात नाही राम’ अशी वृत्ती बाळगतो. तर स्त्रीनेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की, ‘बायको कमी, आई जास्त, तर काहींना देवधर्मच वाटतो रास्त’ अशा विचारांमुळे नाते दुरावले जाते.
रोमँटिक राहा
आपण एकाच वेळी व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यही जगत असतो हे कित्येकांना लक्षात येत नाही. ऑफिसमध्ये बॉस किंवा नोकरदार जरी असाल तरी त्याच वेळी तुम्ही कुणाचा तरी नवरा/बायको हेही असता. अर्थात ही ओळख अध्याहृत असते, पण पडछायेसारखी सतत आपल्याबरोबर असते. या वैयक्तिक पडछायेत वैवाहिक ओळख ही जास्त महत्त्वाची असते. ती जिवंत ठेवण्याची कला जाणीवपूर्वक आत्मसात करा. म्हणूनच रोमँटिक राहा. वेळ काढून ‘दूरस्पर्शी संवाद’ कला वापरा. मोबाइलचा हा पॉझिटिव्ह उपयोग वैवाहिक जीवनाचा तारणहार ठरू शकतो. ‘तुझी आठवण आली म्हणून.’ ते ‘लाल ड्रेसमध्ये तू यम्मी दिसत होतीस.’ असे डायलॉग शोधा आणि करा. मग बघा ती लाल ड्रेसवाली रात्री खुशीत कुशीत शिरेल की नाही (त्या वेळी तो ड्रेस नसला तरी!).
भांडणात वेळ का दवडता?
पती-पत्नी नाते हेच प्राथमिक नाते असून समाजस्वास्थ्यासाठी ते सुदृढ असणे आवश्यक असते. हे प्रायमरी किंवा प्राथमिक नाते या वैवाहिक प्रेमसूत्रांनी मजबूत झाले तर वैवाहिक जीवनातील वादळे निश्चितच शमवता येतील. आणि ही प्रेमसूत्रे दोघांनीही, सतत व वारंवार वापरायची असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. कामजीवन हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे, तर सहजीवन हा सुखी कामजीवनाचा पाया आहे. आता प्रेम करायलाच आयुष्यात वेळ कमी उरलाय, कमी पडणार आहे, हे लक्षात ठेवून भांडणामध्ये वेळ का दवडायचा?
(चतुरंग पुरवणीमध्ये ३० मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)
© IE Online Media Services (P) Ltd