डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
Effects of Conflict and Stress on Relationships health अबोला ही वादाची प्रतिक्रिया असते, दिवस-दिवस नाही तर आठवडा -आठवडा पती-पत्नी एकमेकांशी वादच काय संवादही करीत नाहीत. त्यांच्यातील नाते ‘हँग’ होत असते. नातेसंबंधाचा कॉम्प्युटर ‘रिस्टार्ट’ करण्यासाठी ‘कंट्रोल, आल्टर, डिलीट’ची तीन बटणे वापरत वादावर ‘पडदा टाकण्याची’ तीच वेळ असते. याची सवय करायला हवी.
थंडावलेले कामजीवन
दोघेही उच्चशिक्षित होते. माझ्यासमोरच तो सांगत होता, ‘सारख्या सारख्या वादामुळे कामजीवनच थंडावले आहे आमचे. छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप टोकाचे वाद होतात आणि माझा सगळा मूड जातो. कालचीच गोष्ट सांगतो. मी डोक्यातील इतर सर्व विषय बंद करून केवळ रोमँटिक विचार करीत बेडरूममध्ये तिची वाट पाहत बसलो होतो. हिने आल्या आल्या कुठला विषय काढला असेल, उद्या ब्रेकफास्टला काय करायचं. मी म्हटलं, मला आवडणारे पोहे कर. ती म्हणाली, नको बरेच दिवस शिरा केला नाही तर तेच करीन. मी म्हटलं, नको. साखर आता कमी करायचं मी ठरवलंय. तू पोहेच कर. तरीही ही म्हणाली, नको. कमी साखरेचा शिरा करते. जवळजवळ पंधरा मिनिटे या वादात आम्ही घालवली. जोरदार वाद केला. ‘तू तुझंच खरं करायचा प्रयत्न करतोस, तू नेहमीच मला हवं त्याच्या विरुद्धच ठरवतेस’, वगरे एकमेकांना बोलून रोमँटिक मूड घालवून झोपलो. सकाळी उठून बघतोय तर हिने ब्रेकफास्टला काय केले तर उपमा. डॉक्टर, वैताग येतो हो या सगळ्या गोष्टीचा. काउन्सेलिंग हवंय आम्हा दोघांनाही.’
होत्याचे नव्हते!

रोमँटिक मूडचे आणि वादविवादाचे नाते हे कापूर आणि काडेपेटीची पेटलेली काडी यांच्यासारखेच आहे. कामजीवनाचे क्षणार्धात ‘होत्याचे नव्हते’ करणारी ‘वाद’ ही बाब पती-पत्नी नात्याचा अविभाज्य भाग आहे, ही गोष्ट वादातीत आहे. म्हणून ‘वाद’ परिस्थिती टाळता येत नसली तरी ती आटोक्यात आणणे ही एक कला असून प्रत्येक विवाहिताने ती मोठ्या कष्टाने आत्मसात केली पाहिजे.

वादातील सिंहाचा वाटा

नव्वद टक्के वादांना आपला जोडीदारच कारणीभूत असतो, असे एक ‘त्रिकालाबाधित सत्य’ प्रत्येक जण डोक्यात ठेवूनच वागत असतो. प्रत्येक वादप्रसंगात आपला ‘सिंहाचा वाटा’ असतो हे प्रत्येकानेच लक्षात ठेवले पाहिजे. वादामध्ये आपला वाटा ‘खारीचा वाटा’च राहील इतपत वागायचा प्रयत्न प्रत्येक नवरा-बायकोने केला पाहिजे. नाही तर प्रसिद्ध आंग्ल लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आयुष्यातील खरा आनंद लग्नानंतरच कळला..पण तोवर वेळ निघून गेली होती!’ अशी मन:स्थिती होईल.

…तर भडका उडणार नाही

वरील उदाहरणाप्रमाणे काही वाद जरी ‘आ बैल मुझे मार’ अशा बेसावधपणे स्वनिर्मित असले तरी वाद होण्याचे मूळ कारण म्हणजे पती-पत्नींमध्ये असणारी मतभिन्नता. दोघेही वेगवेगळ्या वातावरणातून आपले विचार, आपली मते आणि आपल्या कल्पना घेऊनच विवाह-बंधनात अडकतात. थोडक्यात लग्न मुळातच दोन व्यक्तींचे नसून दोन व्यक्तिमत्त्वांचे असते आणि केवळ लग्नसंस्थेमुळे ही दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे एका छताखाली राहायला लागतात. पण आपल्यात मतभिन्नता असणारच हे गृहीत धरून जर दोघांनीही संवादाचा प्रयत्न केला तर वादाचा ‘भडका’ उडणार नाही किंवा तो कमीत कमी राहील. वादाचा भडका होण्याचे कारण केवळ मतभिन्नता नसून ‘आपली मते जोडीदारावर लादायचा होणारा प्रयत्न’ हे असते.

‘कान-बंद कला’

उपजत ‘ईगो’ प्रवृत्तीमुळे माणसाच्या मनात नेहमीच एक वाक्य असतं, ‘तू कोण मला शिकवणार. मला काही अक्कल नाही?’ आणि याचमुळे पती-पत्नी नात्यात कुठल्याही संवादामध्ये लगेचच बंडाची भिंत उभी राहते. या ‘ईगो-बंडा’मुळे कान बंद होतात आणि नात्यातील श्रवणशक्ती कमी होत जाते. काही नवऱ्यांना असे वाटते की, आदर्श नवरा तोच जो बायको बोलत असताना शांत राहून केवळ मान डोलावण्याचे काम करत असतो. आणि मग ते ‘कान-बंद कला’ आत्मसात करतात. परंतु विधायक, सकारात्मक वैवाहिक जीवनाला असे हानीकारक असते हे लक्षात ठेवा. कारण त्या वेळच्या स्थितीमधील स्फोटकता टाळली तरी जोडीदाराशी संवाद कलाच विकसित न केल्याने नातेच कच्चे राहत असते. आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे टाळणेच जरुरीचे असते.

(१३ एप्रिल २०१३ रोजी चतुरंग पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला हा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)