एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांचे आजही लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या झीनत अमान आपल्या चाहत्यांबरोबर अनेक किस्से व आठवणी शेअर करीत असतात. नुकताच झीनत अमान यांनी त्यांच्याबाबत घडलेला एक भयावह किस्सा सांगितला, जो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘डॉन’फेम अभिनेत्री झीनत यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये, एकदा रात्री औषध घेत असताना घशात गोळी अकडल्यानं त्यांची काय अवस्था झाली होती ते सांगितले आहे.
झीनत यांनी सांगितले, “त्या वेळी घरात कुत्रा आणि पाच मांजरी वगळता इतर कोणीही नव्हतं. झोपण्यापूर्वी माझं शेवटचं काम म्हणजे माझं रक्तदाबाचं औषध घेणं. मी गोळी तोंडात ठेवून, पाण्याचा एक घोट घेतला आणि नंतर माझा श्वास अडकल्याची जाणीव झाली. माझ्या घशात छोटी गोळी अडकल्याचं जाणवलं. मला ती गोळी गिळताही येत नव्हती आणि बाहेरही काढता येत नव्हती. मी श्वास घेऊ शकत होते; पण त्यामध्ये अडथळा येत होता. मी आणखी एक घोट पाणी घेतलं. ग्लास संपेपर्यंत पाणी प्यायले तरी ती गोळी अडकलेलीच होती. मी खूप घाबरले होते. मी डॉक्टरांना कॉल केला; पण त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मी झहानला (मुलगा) वेड्यासारखे कॉल केले. माझी अस्वस्थता वाढत होती. मला काही सुचत नव्हतं. मला सहज श्वास घेता येत नव्हता. शेवटी झहान घरी आला आणि मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी मला काही तास कोमट पाणी प्या आणि ती गोळी विरघळेल, असं सांगितलं.”
तुमच्याबरोबर किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर असे घडले तर काय करावे? तज्ज्ञांकडून समजून घेऊ या….
किमशेल्थ त्रिवेंद्रम येथील स्वरयंत्रशास्त्र विभागाच्या सल्लागार डॉ. रगीता बिनू कृष्णन यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “पिल डिसफॅगिया ही अशी स्थिती आहे, जिथे एखाद्या व्यक्तीला नियमित अन्न गिळण्यास त्रास होत नसला तरी गोळी गिळताना त्रास होतो. हे नेहमीच वयाशी संबंधित नसते. अशा स्थितीमध्ये स्नायू कमकुवत होणे, गिळण्यास त्रास होणे किंवा स्वरयंत्र आणि घशाचे स्नायू कमकुवत होणे किंवा अर्धांगवायू निर्माण करणारे न्यूरोलॉजिकल विकार या बाबी समाविष्ट आहेत.”
मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील औषध माहिती केंद्रातील (drug information centre) क्लिनिकल फार्मासिस्ट डॉ. कपिल अडवाणी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “ही समस्या नेहमीच गोळीमुळे होत नसते, तर समस्या अन्ननलिकेमध्ये असू शकते. जर ही अन्ननलिका अरुंद असेल किंवा अन्न खाली जाण्यास त्रास होत असेल, तर गिळणे कठीण होते.”
“जर एखादी गोळी तुमच्या अन्ननलिकेत जास्त काळ अडकली, तर त्यामुळे घशाच्या आतील भागात त्रास (irritate the lining) होऊ शकतो आणि त्याने घशात फोडदेखील येऊ शकतात. विशेषतः काही अँटीबायोटिक्स आणि कमकुवत हाडांसाठी (ऑस्टिओपोरोसिस) साठीची गोळी घशात अडकल्यास असा त्रास होऊ शकतो. अशा वेळी गोळी चुकीच्या मार्गाने अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वासनलिकेत जाण्याचा धोका असतो. त्यामुळे श्वास गुदमरणे किंवा फुप्फुसांना गंभीर संसर्ग होऊ शकतो, ज्याला अॅस्पिरेशन न्यूमोनिया म्हणतात,असे ते म्हणाले.
गोळ्या गिळताना आलेले वाईट अनुभव काही लोकांना भविष्यात औषध घेण्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
अशा स्थितीमध्ये काय करावे याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना बंगळुरू येथील एस्टर व्हाइटफील्ड हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. बसवराज एस. कुंबर म्हणाले, “अशा परिस्थितीत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही अवघड वाटत असले तरी घाबरून जाऊ नका. घशात काहीतरी अडकल्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवून वेदना होतील आणि तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटेल. त्यानंतर तोंडातून लाळ येऊ शकते आणि खोकल्याची उबळ येऊ शकते. सतत खोकला येईल. जेव्हा जेव्हा श्वास घेण्यास कोणताही त्रास होतो तेव्हा तेव्हा अडथळा बाहेर काढण्यासाठी अशा पद्धतीने शरीर नैसर्गिक प्रतिक्रिया देते.”
डॉक्टर बसवराज यांनी सांगतात की, आधी स्वत:ला शांत करा. घाबरू नका किंवा चिंताग्रस्त होऊ नका. पाणी पिऊन सुरुवात करा आणि घशात अडकलेली गोळी बाहेर काढण्याचा किंवा गोळी बाहेर काढण्यासाठी खोकण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुमच्या श्वासोच्छ्वसावर लक्ष ठेवा. अशा परिस्थितीत नेहमीच मदतीसाठी कॉल करा. त्यावेळी खोलीत वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित व्यक्ती असेल आणि जर तुम्हाला श्वास घेता येत नसेल किंवा बोलता येत नसेल, तर ते हेमलिच मॅन्युअल (Heimlich manual) करू शकतात.
हेमलिच मॅन्युअल (Heimlich manual) ही घशात अडकलेली गोळी किंवा वस्तू बाहेर काढण्याची एक विशिष्ट कृती आहे, जी वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित व्यक्ती व्यवस्थित करू शकते.
काय खबरदारी घ्यावी?
डॉ. बसवराज यांनी अशा काळात पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला. पिल एड्स, जेल किंवा पिल ग्लाइड्स नावाची उपकरणेदेखील आहेत, जी त्यांना योग्यरीत्या विरघळण्यास मदत करतात. तसेच डॉ. अडवाणी यांनी, गोळी घेतल्यानंतर लगेच झोपू नका, असेही सांगितले आहे.
“गोळ्या लहान तुकड्यांमध्ये मोडता येतात, कुस्करल्या जातात, मधात मिसळल्या जातात किंवा केळीच्या तुकड्यासह किंवा मिश्रित अन्नासह गिळता येतात. गिळताना आणखी एक प्रभावी तंत्र म्हणजे तुमची हनुवटी छातीला टेकवणे (तुमची हनुवटी तुमच्या छातीला स्पर्श करेल असे डोके वाकवणे), ज्यामुळे गिळण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते,” असे डॉ. कृष्णन पुढे म्हणाले.