Raw Eggs: हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही नवनवीन पदार्थांचे विचित्र कॉम्बिनेशन पाहून नेहमीच आश्चर्य वाटते. ज्यात कधी गुलाबजाम डोसा तर कधी गुलाबाची भजी अशा अतरंगी पदार्थांचा समावेश असतो. पण, अशा विचित्र कॉम्बिनेशनचे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती योग्य आहेत? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये कच्च्या अंड्यापासून आईस्क्रीम रोल बनवण्यात आला आहे.
पण, हा पदार्थ खाणं आरोग्यासाठी किती योग्य आहे? याच्या तळाशी जाण्यासाठी, ‘इंडियन एक्स्प्रेस’ने तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे.
श्री बालाजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी श्रीराम यांनी सांगितले की, “कच्चे अंडे साल्मोनेला नावाच्या जीवाणूसाठी मोठी जोखीम निर्माण करू शकते. याला साल्मोनेलोसिस म्हणूनही ओळखले जाते. यामुळे अतिसार आणि उलट्या होऊ शकतात, तसेच गंभीर आरोग्य समस्याही निर्माण होऊ शकतात. कोंबडीमध्ये नैसर्गिकरित्या साल्मोनेला असते, जे अंडी दूषित करते.”
गुडगावातल्या झाल हेल्थकेअरच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट हरलीन गिल यांनी या प्रश्नावर सहमती दर्शवत सांगितले की, “कच्च्या अंड्याचा वापर ज्या पदार्थांमध्ये केला जातो ते पदार्थ शिजवल्यानंतर लगेच खा, तसेच अंड्याचे कवच फोडताना त्यात कवचाचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी घ्या, कारण त्यामुळे आरोग्यासाठी अधिक धोका निर्माण होऊ शकतो.”
“कच्ची अंडी आणि शिजवलेली अंडी आरोग्याला एकसारखे फायदे देतात. परंतु, पूर्ण शिजवलेल्या अंड्यांमध्ये साल्मेलाचा धोका नसतो. अंडी शिजवल्यानंतर त्यातील जीवाणू नष्ट होतात. कारण, ते उष्णतेमध्ये टिकू शकत नाहीत,” असं गिल म्हणाले.
गिल म्हणाले की, “कच्ची अंडी खाणे सामान्यतः सुरक्षित असतात, पण हे क्वाचितच लागू होते.”
हेही वाचा: टिफिनमध्ये मांसाहारी पदार्थ घेऊन जाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
तुम्ही ही जोखीम कशाप्रकारे कमी करू शकता?
- एक्सपायरी डेट पार पडलेली अंडी कधीही खरेदी करू नका.
- तडकलेली किंवा घाणेरडी अंडी वापरणे टाळा.
- दूषित होण्यापासून वाचण्यासाठी अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
- कच्च्या अंड्यांचा वापर ज्या पदार्थांमध्ये केला जातो ते पदार्थ तयार केल्यानंतर लगेच खा.
गिल म्हणाले, “गर्भवती महिला, वृद्ध आणि रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या लोकांनी कच्ची अंडी खाणं टाळलं पाहिजे.”