High Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्याने जगभरात अनेक नागरिक त्रस्त आहेत. कोलेस्ट्रॉल हा शरीराचा छुपा शत्रू ठरू शकतो. मेणासारखा वाटणारा कोलेस्ट्रॉल शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जमून राहिल्यास रक्त प्रवाहात अडथळा येतो व परिणामी अनेक अवयवांना धोका असतो. वेळीच लक्ष न दिल्यास खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या जीवघेण्या परिस्थिती उद्भवू शकतात. यामुळे छाती जड होणे, श्वास लागणे, जबडा दुखणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय खराब कोलेस्ट्रॉलची सुरुवातीचे लक्षणे तुमच्या डोळ्यांमध्ये सुद्धा दिसून येऊ शकतात.
डॉ लब्धी शाह, एम.एस. नेत्ररोग तज्ज्ञ आणि न्यूरो- नेत्ररोग तज्ज्ञ, आयकॉनिक आय क्लिनिक, यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या डोळ्यांच्या रंगातील बदल, पापण्यांचे स्वरूप, डोळ्यांमधील गडद रेषा हे सर्व वाईट कोलेस्ट्रॉलच्या वाढलेल्या पातळीचे लक्षण असू शकते, यामुळे तुम्हाला अंधुक दृष्टी, (कॉर्निया) डोळ्यांभोवती राखाडी, पांढरे आणि पिवळे डाग, तुमच्या डोळ्याभोवती पिवळे फोड हे सर्व उच्च कोलेस्ट्रॉलची संकेत आहेत.
डॉ लब्धी शाह सांगतात की, डोळ्यांच्या भागात कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास खालील त्रास होऊ शकतात,
झेंथेलास्मा (Xnthelasma)
उच्च कोलेस्टेरॉल असणा-या लोकांमध्ये सहसा डोळ्यांचे सामान्य बदल दिसतात ज्याला Xnthelasma म्हणतात, यामध्ये एक जाडसर पिवळसर भाग डोळ्याभोवती किंवा नाकाच्या जवळ तयार होतो. त्वचेखाली कोलेस्ट्रॉल जमा होत असल्याने असे होते. या स्थितीचा दृष्टीवर परिणाम होत नाही. झेंथेलास्मा असलेल्या जवळपास ५० टक्के लोकांमध्ये उच्च कोलेस्टेरॉल असते.
रेटिनल वेन ऑक्लूजन
डोळ्याच्या मागील बाजूस स्थित एक प्रकाश-संवेदनशील उती आहे. रेटिनल नसांद्वारे डोळ्यांना रक्त पुरवठा होतो. जेव्हा या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल साचूनरक्तांचा पुरवठ्याला अडथळा येतो, तेव्हा रेटिनल वेन ऑक्लूजन होऊन दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. डोळ्यात वेदना, अंधुक दृष्टी, काचबिंदू असे त्रास यामुळे सहन करावे लागू शकतात. साधारण पन्नाशीनंतर हा त्रास बळावण्याची शक्यता अधिक असते.
आर्कस सेनिलिस
या स्थितीत, कॉर्नियाच्याभोवती एक पांढरी, निळी किंवा राखाडी रिंग तयार होते. डोळ्याच्या किंवा बुबुळाच्या भोवती या कडा दिसून येतात. तुम्हाला असे वाटू शकते की बुबुळाचे दोन रंग आहेत, परंतु हा प्रकार तुमचे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे. याचाही दृष्टीवर परिणाम होत नाही.
हे ही वाचा<< सारा अली खानने ३० किलो वजन कमी करताना ‘या’ डाएट व व्यायामाचं केलं नेटाने पालन! म्हणते, “PCOS असताना..”
या सर्व स्थितींमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रण ही प्राथमिक गरज आहे. प्रमाण अधिक असल्यास ऑपरेशनचा सल्ला डॉक्टर देतात. तुम्हाला यातील कोणतेही लक्षण आढळून आल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या.