What will happen to your brain if you do not use smartphone: स्मार्टफोनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याचा वापर खूपच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दशकांमध्ये स्मार्टफोनच्या या अतिवापरामुळे होणाऱ्या विपरीत अशा शारीरिक, सामाजिक व मानसिक परिणामांवर चर्चा केली जात आहे. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, जर तुम्ही काही दिवस स्मार्टफोन वापरणे थांबवले, तर काय होईल? ‘कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून स्मार्टफोन वापरणाऱ्या २५ तरुणांवर ७२ तास स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घालण्याचे परिणाम तपासण्यात आले.

उत्सुकतेपोटी indianexpress.com ने आरोग्य तज्ज्ञांशी याबाबत संपर्क साधला आणि तीन दिवस स्मार्टफोन न वापरण्यामुळे मेंदूला काय होते, हे समजून घेतले.

डॉ. शौनक अजिंक्य, कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई, यांनी सांगितले की, हे आपल्या मेंदूला रीसेट करण्याचा, एकाग्रता वाढवण्याचा आणि एकूणच आरोग्य सुधारण्याचा प्रभावी मार्ग आहे. “डिजिटल उपकरणांपासून नियमित ब्रेक घेण्यामुळे वास्तविक जगातील नातेसंबंध आणि भावनिक बुद्धिमत्ता सुधारू शकते. कारण- लोक अशाब्दिक (नॉनव्हर्बल) संकेतांकडे अधिक लक्ष देतात आणि चांगले सक्रिय ऐकण्याचे कौशल्य विकसित करतात.”

ही बाब माणसाला समोरासमोर संवाद साधण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे आपली भावनिक जागरूकता वाढते आणि कुटुंब, मित्र आणि अगदी परक्या लोकांशी अधिक घट्ट संबंध निर्माण होतो. त्यांनी हेही सांगितले की, स्मार्टफोनचा जास्त वापर मेंदूवर परिणाम करतो.

डॉ. अजिंक्य यांनी ‘फोन डिटॉक्स’चा आणखी एक महत्त्वाचा परिणाम सांगितला तो म्हणजे चांगली झोप. “२०२३ मध्ये झालेल्या एका अभ्यासात, ‘डिजिटल डिटॉक्स रिसर्च’मध्ये असे दिसून आले की, जे लोक रात्री स्मार्टफोनचा जास्त वापर करतात, त्यांना झोप लागण्यात अडचण येते. मात्र, त्यात महत्त्वपूर्ण सुधारणा दिसून आली. हे फोन स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्ल्यू लाइटमुळे आहे, जे मेलाटोनिन उत्पादनात अडथळा आणते आणि शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात विघ्न आणते,” असे त्यांनी indianexpress.com सोबत शेअर केले.

डॉ. अजिंक्य यांनी सांगितले की, पूर्ण तीन दिवसांचा डिटॉक्स नेहमी शक्य नसला तरी, फोनचा वापर कमी केल्यामुळे मोठे फायदे मिळू शकतात.

त्यांनी छोटे आणि साधारण उपाय सुरू करण्याचा सल्ला दिला: (How to avoid Phone)

फोनमुक्त वेळ ठरवा: दिवसाच्या काही ठरावीक तासांना, जसे की जेवणाच्या वेळी किंवा झोपण्याच्या आधी, फोनमुक्त वेळ ठरवा.

डू नॉट डिस्टर्ब मोड वापरा: नोटिफिकेशन्स कमी करा, ज्यामुळे तुमची फोन सतत तपासण्याची इच्छा कमी होईल.

ऑफलाइन अ‍ॅक्टिव्हिटिज करा: स्क्रीनवर वेळ घालण्याऐवजी वाचन, व्यायाम किंवा बाहेर वेळ घालणे यांसारख्या अ‍ॅक्टिव्हिटिजमध्ये सहभागी व्हा.

सोशल मीडिया ब्रेक घ्या: स्क्रीन टाइम कमी करून किंवा अ‍ॅप्स तात्पुरते डिलीट करून सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा.

झोपेची योग्य दिनचर्या ठरवा: झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास स्क्रीनपासून दूर राहा, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारेल.