Benefits of Quitting Sugar : गोड पदार्थांशिवाय तुम्ही किती दिवस राहू शकता? तुम्ही कधी विचार केला का, जर काही दिवस साखरेचे सेवन केले नाही तर काय होईल. स्टँडअप कॉमेडियन सुमुखी सुरेशने नुकताच हा प्रयोग करून पाहिला आहे. तिने १४ दिवस साखरेचे सेवन न करण्याचे आव्हान स्वीकारले होते. ३७ वर्षीय सुमुखी सांगते, “साखर ही एक्स प्रियकर किंवा प्रेयसीसारखी आहे, जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा तुम्हाला आठवण येत नाही, पण रात्री १० नंतर तुम्हाला तुमच्या एक्स प्रियकर किंवा प्रेयसीप्रमाणे साखरेचे सेवन करावे वाटते.”

या आव्हानादरम्यान ती साखरेचा समावेश नसलेले पदार्थ खरेदी करण्यासाठी एका सुपरमार्केटला गेली.
दिवसभरात साखरेची क्रेव्हिंग निर्माण होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करण्याचे तिने ठरवले. काही दिवसांनंतर तिला जाणवले की तिची साखरेची क्रेव्हिंग कमी झाली आहे. ती सांगते, “प्रत्येक गोष्ट साखरेसारखीच चवदार नसते, पण प्रत्येक पदार्थाला चव असते. जसे की मला माहीत नव्हते की कॉफी इतकी चांगली असते.”

या आव्हानाच्या शेवटच्या दिवशी ती सांगिते की, “मी वेळेवर उठते, व्यवस्थित व्यायाम करते, आता मला साखरेची क्रेव्हिंग होत नाही.”
सुमुखीने सांगितल्याप्रमाणे झांड्रा हेल्थकेअरमधील डायबिटोलॉजीचे प्रमुख डॉ. राजीव कोविल यांनी साखरेला जगातील सर्वात मोठे व्यसन म्हटले आहे. ते सांगतात, “दोन आठवडे साखर सोडल्याने तुमच्या शरीरात आणि आरोग्यात लक्षणीय बदल दिसून येईल.”

डॉ. कोविल सांगतात की, साखर सोडणे सुरुवातीला आव्हानात्मक वाटू शकते पण दोन आठवड्यांत त्याचे आरोग्यदायी फायदे दिसून येतील.

फायदे

रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते : १४ दिवस साखरेचे सेवन न करण्याचे आव्हान स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर होते, ज्यामुळे ऊर्जा स्थिर राहते आणि साखरेची क्रेव्हिंग कमी होते. तसेच इन्सुलिनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे फॅट कमी होण्यास मदत होते आणि ऊर्जेची पातळी सुधारते.

ऊर्जा स्थिर राहते आणि मूड सुधारतो: साखरेचे प्रमाण कमी केल्यानंतर ऊर्जा स्थिर राहते आणि मूड स्विंग कमी होतात. साखरेचे सेवन कमी केल्याने सतर्कता वाढते आणि एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येते.

जळजळ कमी होते : साखर सेवन कमी केल्याने जळजळ कमी होते, सांधेदुखीचा त्रास दूर होतो, तसेच चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात.

आरोग्याच्या समस्या दूर होतात : सुरुवातीला डोकेदुखी, थकवा किंवा चिडचिडपणा जाणवू शकतो, पण काही दिवसांत या समस्या कमी होतात.

वजन कमी होते : साखरेचे सेवन कमी केल्याने शरीरातील फॅट कमी होते. विशेषतः पोटाभोवतीचा घेरसुद्धा कमी होतो.

आतड्यांचे आरोग्य सुधारते : साखरेचे कमी सेवन केल्याने आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते. पोट फुगणे आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.

डॉ. कोविल सांगतात, जास्त काळ हे आव्हान टिकवून ठेवणे कठीण आहे, कारण शरीरात घरेलिन हार्मोन सक्रिय होतो, ज्यामुळे क्रेव्हिंग वाढते, म्हणूनच आहारात केलेला बदल १५ ते २० आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही.

Story img Loader