No Sugar Diet Like Kartik Aryan: एक आठवडा, एक महिना, फार फार दोन महिने साखर वर्ज्य करून आहार घेणे हे आपल्याला खरे वाटू शकते. पण एका आगामी चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यनने तब्बल ३६५ दिवस म्हणजेच १ वर्षभर साखर आहारातून वगळून सगळ्यांनाच थक्क केले आहे. कार्तिकचा आगामी चित्रपट चंदू चॅम्पियनच्या शेवटच्या शॉट दरम्यान त्याने त्याची आवडती रसमलाई खाऊन आपले हे वर्षभराचे विनासाखर व्रत मोडले. दिगदर्शक कबीर खान रसमलाई भरवत असल्याचा हा व्हिडीओ कार्तिकनेच आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. “या रसमलाईने विजयाचा आस्वाद घेतला, अखेर एका वर्षभरानंतर साखर खाल्ली. आठ महिन्यांच्या शूटिंगनंतर आम्ही आज चंदू चॅम्पीयनचे शूटिंग पूर्ण करत आहोत. माझ्या आवडत्या रसमलाईसारखा हा आनंद गोड आहे. ज्याने माझ्यासाठी हा आव्हानांचा मार्ग तयार केला होता त्याच माणसाच्या हातून रसमलाई खात आहे, तुम्ही खूप प्रेरणादायी आहात सर” असे कॅप्शन देत कार्तिकने हा व्हिडीओ शेअर केला होता.
कार्तिकचा हा प्रवास पाहून तुम्हालाही जर आपण किती दिवस साखर न खाता राहू शकतो किंवा साखर खाल्लीच नाही तर काय होईल असा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही आपल्यासाठी याचे उत्तर घेऊन आलो आहोत. वर्सभरासाठी साखर न खाल्ल्याने शरीरावर याचा काय प्रभाव दिसून येऊ शकतो हे पाहूया..
साखर आहारातून काढून टाकण्याचे फायदे
अहमदाबादच्या झायडस हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के भारद्वाज यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, साखर वर्ज्य केल्याने किंवा मर्यादित केल्याने तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात. सुरुवातीला, तुम्हाला सवय बदलत असल्याने थोडे अस्वस्थ वाटू शकते परंतु कालांतराने, तुमची उर्जा पातळी स्थिर होते आणि मूड स्विंग्स कमी होतात. तुमचे चयापचय सुधारते, लठ्ठपणा आणि संबंधित आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो. मुरुमे कमी होऊन त्वचा अधिक तरूण दिसू लागते.
शिवाय, साखर कमी केल्याने रक्तदाब कमी होऊन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. भारद्वाज यांच्या माहितीनुसार, एक चमचा साखरेमध्ये 20 कॅलरीज असतात, त्यामुळे साखर कमी केल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढण्यास मदत होते आणि टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. मर्यादित साखरेचा आहार दातांचे आरोग्य चांगले ठेवतो व कीड लागणे, पोकळी आणि हिरड्यांचे आजार सुद्धा कमी होतात.
याव्यतिरिक्त, साखरेवरचे अवलंबित्व कमी झाल्यामुळे मानसिक स्पष्टता आणि कामाच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून येऊ शकते. भारद्वाज यांनी स्पष्ट केले की, साखर टाळल्याने झोपेची गुणवत्ता वाढवते आणि एकूणच आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा या काढून टाकलेल्या कॅलरीज वरदान ठरू शकतात.
पण साखर कमी केली म्हणजे साखरेच्या जागी गूळ किंवा कृत्रिम स्वीटनर वापरणे असा अर्थ होत नाही. साखर आणि गूळ या दोन्हींमध्ये समान कॅलरीज असतात. त्यामुळे अगदी साखर, गूळ, मिठाई एनर्जी ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स सर्वकाही टाळणे आवश्यक आहे.
कार्तिक आर्यन इंस्टाग्राम पोस्ट
हे ही वाचा<< ९३ वर्षांच्या खेळाडूचं शरीर अजूनही चाळिशीतच! ७३ वर्षे व्यायामही केला नाही, शेवटी अभ्यासात समोर आलं ‘हे’ गुपित
साखर वर्ज्य करणे सगळ्यांसाठी फायद्याचे आहे का?
भारद्वाज सांगतात की, पौष्टिक संतुलन राखण्यासाठी परिष्कृत (रिफाईंड) साखरेची जागा संपूर्ण अन्नाने घेणे आवश्यक आहे. एकूणच, साखरेचे सेवन मर्यादित केल्याने आरोग्याला फायदे मिळू शकतात, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. निर्णय घेण्याआधी आपण आपल्या आरोग्यस्थितीशी परिचित असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घेऊ शकता.